लोहगाव विमानतळासाठी संरक्षण खात्याची ८४ एकर जमीन देण्यात आली असून डिसेंबपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल. मात्र, पुण्याला खासगी विमानतळाची आवश्यकता असून पुढील तीन-चार वर्षांचा विचार करता त्यासाठीचे प्रयत्न आत्ताच सुरू करा, असे आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात केले.
कोंढव्यातील लुल्लानगर येथील उड्डाणपुलाचे पुलाचे भूमिपूजन पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. पुणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महापौर प्रशांत जगताप, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, उपमहापौर मुकारी अलगुडे, खासदार अनिल शिरोळे, शिवाजी आढळराव, आमदार योगेश टिळेकर, माधुरी मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, आयुक्त कुणाल कुमार, भाजपचे पालिकेतील गटनेता गणेश बीडकर, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, नंदा लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
र्पीकर म्हणाले, पुण्याला खासगी विमानतळाची आवश्यकता असून पुढील तीन-चार वर्षांचा विचार करता त्यासाठीचे प्रयत्न आत्ताच सुरू करा. सुरक्षेच्या दृष्टीने लष्करासमोर असलेल्या अडचणी सांगता येत नाहीत. मात्र १५ ऑगस्टपर्यंत घोरपडी मधील उड्डाण पुलाच्या संदर्भातील अंतिम मंजुरी लष्कराकडून दिली जाईल. त्यासाठी जेवढय़ा गोष्टी मला करता येतील त्या मी पूर्ण करेन.
जावडेकर म्हणाले, अनेक शहरांमध्ये संरक्षण खात्याच्या जमिनी आहेत. नागरी विकासासाठी जिथे संरक्षण खात्याच्या जागेशिवाय पर्याय नाही, अशा जमिनी देण्याचे धोरण बनवले पाहिजे. पुण्याच्या दृष्टीने लकरात लवकर पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होणे आवश्यक असून ते निश्चितपणे सुरू केले जाईल.
पवार म्हणाले की, १५ कोटी खर्च करून पूल होत आहे. मात्र, या पुलाने संपूर्ण वाहतूक कोंडी संपणार नाही. पूल बनविताना तो चौकात न उतरवता आणखी दोनशे मीटर पुढे उतरविण्यात यावा. यामुळे वाहतूक सुरळीत होईल.