काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेनेचा बहिष्कार, पंतप्रधान मोदी आज पुण्यात

स्मार्ट सिटी प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून सुरू झालेले राजकारण चांगलेच तापले असून या कार्यक्रमावर काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि शिवसेनेने बहिष्कार घालण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. महापौरांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यामुळे त्यांचा अपमान झाल्याचे कारण बहिष्कारासाठी देण्यात आले आहे. दरम्यान, हा सर्व राजकीय स्टंट असून स्मार्ट सिटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना पुणेकर जाब विचारतील, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

स्मार्ट सिटी मिशनच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (२५ जून) पुण्यात येत असून या कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत महापौरांचे नाव नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या प्रकाराचा गुरुवारी निषेध करण्यात आला होता. त्यापुढे जाऊन आता महापौरांच्या अपमानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा या कार्यक्रमावर बहिष्कार असल्याचे पक्षातर्फे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर प्रशांत जगताप पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत करतील, मात्र ते कार्यक्रमाला जाणार नाहीत, असेही सांगण्यात आले.

‘विरोध राजकीय भूमिकेतून’

स्मार्ट सिटी प्रकल्प उद्घाटनाचा कार्यक्रम केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने आयोजित केला आहे. या निमंत्रण पत्रिकेत कोणाची नावे असायला हवीत यासंबंधी जे शासकीय शिष्टाचार आहेत त्यानुसार नावे आहेत. पालकमंत्र्यांचेही नाव या पत्रिकेत नाही. त्यामुळे इतर पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालणे योग्य नाही. महापौर जगताप यांना कार्यक्रमात व्यासपीठावर पंतप्रधानांशेजारची जागा देण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रमाला केवळ राजकीय भूमिकेतून विरोध केला जात आहे. त्याचा जाब सत्ताधाऱ्यांना पुणेकर नक्कीच विचारतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे महापालिकेतील गटनेता गणेश बीडकर यांनी व्यक्त केली.

महापौरांचा अपमान झाल्याच्या प्रकाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निषेध केला असून महापौरांचा अपमान झाल्यामुळे मनसे या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असे मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे यांनी जाहीर केले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प उद्घाटनाच्या कार्यक्रमावर जो कोटय़वधींचा खर्च होणार आहे त्याला शिवसेनेचा विरोध असून पक्षाचा या कार्यक्रमावर बहिष्कार असल्याचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी गुरुवारी जाहीर केले. नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम भाजप करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमात शिवसेना सहभागी होऊ इच्छित नाही, असे निम्हण यांनी सांगितले.

काँग्रेसचे आंदोलन

नागरिकांना दिलेली कोणतीही आश्वासने पूर्ण न केल्याच्या निषेधार्थ शहर काँग्रेसतर्फे शनिवारी बालेवाडी येथे आंदोलन केले जाणार असून शहराध्यक्ष रमेश बागवे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. महागाई, मंत्र्यांचे भ्रष्टाचार यासह अनेक मुद्यांवर हे आंदोलन केले जाणार आहे.

पोलिसांकडून नोटीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी बालेवाडी येथे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्घाटन होणार असून, त्या ठिकाणी निदर्शने करण्याचा इशारा शहर काँग्रेसने दिला असल्याने पोलिसांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान आपण कार्यकर्त्यांसह निदर्शने करणार असल्याने त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण निदर्शने केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.