खासदार राजू शेट्टी यांचा आरोप

शेतकऱ्यांची शेती तोटय़ात आणून शेतक ऱ्यांना बेदखल करण्याचा शासनाचा डाव असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केला. शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आत्मक्लेष यात्रेदरम्यान लोणावळ्याजवळील कार्ला फाटा येथे खासदार शेट्टी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी सरकारवर हा आरोप केला. कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला.

‘निवडणुकीच्या काळात मोदींनी अच्छे दिन हवे असतील तर भाजपला बहुमत द्या, असे खोटे आश्वासन दिले होते. त्याला आम्हीदेखील बळी पडलो. मात्र, याची जाणीव झाल्यामुळेच आत्मक्लेष यात्रा काढली आहे. राज्यातील शेतक ऱ्यांना बेदखल करून त्यांची जमीन अकृषक कारणांसाठी घेऊन ती इंचात विकण्याचा या सरकारचा डाव आहे. या लबाडांना गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही,’ अशा शब्दांत खासदार शेट्टी यांनी भाजप सरकारला इशारा दिला.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

‘गेल्या वर्षभरात राज्यभरातील साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे अर्ज जमा केले आहेत. येत्या ३० मे रोजी राज्यपालांची भेट घेऊन हे सर्व अर्ज त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात येणार आहेत. मावळातील शेतकऱ्यांनी देखील त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारावा,’ असे आवाहन खासदार शेट्टी यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन बेदखल करत त्यांच्या जमिनी हडप करण्याचा या शासनाचा डाव आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही, अशा शब्दांत खासदार शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाला विरोध दर्शविला.