महिन्यानुसार देवतांची रेखाचित्रे असलेले नेपाळी भाषेतील इसवी सन १६४५ मधील ‘प्रतिष्ठा-लक्षण-सार-समुच्चय’ हे दुर्मीळ हस्तलिखित सापडले आहे. सध्या ते काठमांडू येथील राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये असून नेपाळ-जर्मनी जतन ग्रंथालयामध्ये संग्रहित आहे.

भारतीय उपासना परंपरेमध्ये ३३ कोटी देव असल्याचे सांगितले जाते. अशा दैवतांच्या शेकडोंनी पितळी मूर्ती पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामधील नामदेव पायरीच्या वरच्या भागात होत्या. त्याला तेहतीस कोटी देव मंदिर असे संबोधिले जात असे. पुढे तेथे खोदाई झाली आणि खाली २० फूट मंदिराचे पायाभूत बांधकाम मिळाले. आता त्या मूर्ती सभामंडपात रामदासांच्या हनुमान मंदिरामध्ये कुलूपात आहेत. अशाच हिंदूू दैवतांच्या असंख्य मूर्तीचे रेखाचित्र असलेले ‘प्रतिष्ठा-लक्षण-सार-समुच्चय’ हे दुर्मीळ हस्तालिखित सापडले आहे. त्याचा काळ इसवी सन १६४५ असा दिला आहे. या हस्तलिखितावर चित्रकाराचे नाव नाही. नेपाळी शैलीतील वस्त्ररहित परंतु आयुधासह अनेक देवता या हस्तलिखितावर पाहावयास मिळतात. हिंदूू नववर्ष हे चैत्र महिन्यापासून सुरू होते. या हस्तलिखितामध्ये चैत्रापासून ते बारा महिन्यांच्या देवतांचा समावेश असला तरी वर्षांची सुरूवात ही मार्गशीष महिन्याने केली आहे. कदाचित ‘मासानां मार्गशीषारेहम्’ म्हणून ती असावी. या दैवतांमध्ये केशव, नारायण, माधव, गोविंद, विष्णवे, मधुसूदन या सहा दैवतांची चित्रे गदाधारी आहेत, अशी माहिती हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी दिली.

मूळच्या जर्मनीच्या परंतु भारतामध्ये दैवतशास्त्राचा अभ्यास केलेल्या डॉ. गुद्रुन ब्युनेमान यांनी जपान सरकारच्या शिष्यवृत्तीच्या आधारे आणि प्रा. मुसशी ताचिकारा यांच्या साहाय्याने हे हस्तलिखित प्रकाशात आणले आहे. विशेष म्हणजे या हस्तलिखितामध्ये चैत्रादि बारा महिन्यांच्या दैवतांची रेखाचित्रे आहेत. ग्रह, राशी यांच्याबरोबर नक्षत्रांच्याही आकृती देण्यात आल्या आहेत. अश्विनी (घोडा), कृत्तिका (बोकड), रोहिणी (सर्प), मृग (घोडा) आणि आद्र्रा (कुत्रा) अशा प्रकारे २७ नक्षत्रांची रेखाचित्रे समाविष्ट आहेत. भारतीय दैवत उपासनेमध्ये मंत्र, तंत्र, पूजा, नैवेद्याचे पदार्थ, दैवतांना अर्पण करावयाची पाने-फुले या गोष्टी जपल्या आहेत. या साऱ्याच्यापलीकडे जाऊन देवतांच्या मूळ रूपाविषयी किंवा रेखाचित्रांविषयी कधीच चर्चा झाली नव्हती. पण, साडेतीनशे वर्षांपूर्वी नेपाळी कलाकारांना आमच्या देवता कशा भासल्या त्याचे चित्रण या हस्तलिखितामध्ये पाहावयास मिळते. ही माहिती भारतीयांना होण्याच्यादृष्टीने हे हस्तलिखित महत्त्वाचे आहे. नेपाळमधील या ग्रंथालयामध्ये असलेल्या एक लाखांहून अधिक हस्तलिखितांमध्ये भारतीय आणि संस्कृत भाषेतील हस्तलिखितांची संख्या अधिक आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील दुर्मीळ हस्तलिखितांचे मायक्रोफिल्मिंगही या संस्थेमध्ये असल्याचे मंजूळ यांनी सांगितले.