तेचतेच आपले नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर कुंटे चौकाजवळ असलेल्या ‘रसराज’ला आवर्जुन भेट द्या. इथे मिळणारा कोणताही पदार्थ घ्या; पण चटणी रोल घ्यायला मात्र विसरू नका..

काही हॉटेलांची, दुकानांची, काही फास्ट फूड सेंटरची नावं इतरांपेक्षा खूप वेगळी असतात. त्यामुळे ती लक्षातही राहतात आणि त्यांच्याबद्दल कुतूहलही वाटायला लागतं. लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकाजवळ असलेलं ‘रसराज’ हे असंच फास्ट फूड सेंटर. हल्ली सकाळी सात ते दहा या वेळात व्यवसाय करणारी अनेक फास्ट फूड सेंटर पुण्यात खूप ठिकाणी बघायला मिळतात. पण ‘रसराज तसं नाही. त्याचं स्वरूप फास्ट फूड सेंटरचं असलं तरी ते सकाळी साडेआठ ते रात्री नऊ असं जवळजवळ बारा तास सुरू असतं. तर मुख्य विषय नावाचा होता. ‘रसराज’ हे नाव तसं इतरांपेक्षा वेगळं वाटतं. त्यामुळे आणि तिथे मिळणाऱ्या काही आगळ्या वेगळ्या पदार्थामुळे ‘रसराज’ची वारी न चुकता करावीच लागते. मिलिंद शेटे यांनी चौदा वर्षांपूर्वी हा व्यवसाय वडा-पाव, पोहे अशा पदार्थाच्या विक्रीपासून सुरू केला. गेल्या चौदा वर्षांत शेकडो ग्राहक ‘रसराज’शी जोडले गेले आहेत. लक्ष्मी रस्त्यावर खरेदी करायची आणि ‘रसराज’मध्ये निवांतपणे पदार्थाचा आस्वाद घ्यायचा असा कित्येकांचा शिरस्ताच आहे.

तुम्ही इथे सकाळी सकाळी म्हणजे अगदी ‘रसराज’ उघडताना गेलात तर गरम गरम कांदे पोहे किंवा उपमा किंवा इडली चटणी किंवा उडीद वडा हे पदार्थ नुकतेच तयार झालेले दिसतील. शिवाय पोह्य़ांबरोबर आणि उपमाबरोबर दिलं जाणारं खास सांबार हेही इथलं एक वैशिष्टय़ आहे. अर्थात पोहे, उपमा हे पदार्थ खायचे तर इथे सकाळी अकरा पर्यंतच जायला हवं. कारण सकाळी साडेनऊ-दहा नंतर अन्य पदार्थाच्या आगमनाला सुरुवात होते. त्यांची चव घ्यायची असेल तर ‘रसराज’मध्ये जायची सकाळी साडेदहा-अकराची वेळ एकदम उत्तम. या वेळेपासून पुढे केव्हाही आपण तिथे गेलो तर आपल्यासमोरच गरमागरम पदार्थाचे ट्रे आतून भरभरून येताना दिसतात आणि मग खवय्यांना काय काय घ्यायचं असा प्रश्नच पडतो.

‘रसराज’मध्ये नव्याने जाणाऱ्यांना तर काय घ्यायचं असा प्रश्न नक्कीच पडेल. अशा वेळी मग तिथल्या पाटय़ांवर नजर टाका. या पाटय़ांवर केलेलं पदार्थाचं वर्णन आपलं औत्सुक्य अधिकच वाढवतं. गरम गरम वडापाव, स्पेशल चटणी रोल, झकास व्हेज कटलेट, टेस्टी मटार करंजी, कुरकुरीत मटार पॅटिस, रुचकर मका पॅटिस, खमंग पोहे, मस्त मेदूवडा चटणी, हलकी फुलकी इडली चटणी.. पदार्थाचं असं हे वर्णन वाचता वाचता आपणही मग काही पदार्थ मनात नक्की करतो. अर्थात ‘रसराज’ची ही यादी इथेच संपत नाही. हॉट डॉग प्रकारातील बटर पनीर रोल, मॉन्चुरियन रोल, पनीर मसाला रोल शिवाय सामोसा, पट्टी सामोसा हेही इथले पदार्थ सतत मागणी असणारे असेच. शिवाय दुपारी बारा-साडेबारानंतर भेळ आणि भेळेशी संबंधित सर्व डिश म्हणजे ओली-सुकी भेळ, पाणीपुरी, रगडा पुरी, शेवपुरी, फरसाण भेळ, एसपीडीपी, सामोसा चाट, कटलेट चाट हेही पदार्थ रात्री उशिरापर्यंत इथे आपण घेऊ शकतो.

मटारच्या भाजीचे सारण, त्याला वरून बटाटय़ाचे आवरण आणि शेवया लावून तळून दिला जाणारा चटणी रोल आणि मका पॅटिस ही ‘रसराज’ची खासियत. शिवाय हे इथल्या विविध पदार्थाचा दर दहा रुपयांपासून ते तीस रुपयांपर्यंत असा असल्यामुळे थोडक्या पैशांत इथे मस्त, चविष्ट आणि भरपेट असा पदार्थाचा आस्वाद घेता येतो. असा मस्त नाश्ता झाला की थंड काही पदार्थ हवे असतील तर कोकम सरबत, आवळा सरबत, मसाला ताक, लस्सी, जिरा मसाला असेही अनेक पर्याय इथे आहेत. ते नको असतील तर छान दाण्याचा लाडू किंवा पौष्टिक लाडू किंवा खोबऱ्याची वडीही तोंडात टाकता येते.

लक्ष्मी रस्त्यावरील अनेक दुकानांमधील सेल्समन सकाळी नाश्ता करतात तो ‘रसराज’मध्येच. मग इतर कार्यालयांमधल्या कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची गर्दी इथे सुरू होते. मग बाजारपेठेत खरेदीला येणाऱ्यांचीही गर्दी इथे होते. सदैव मिळणारे ताजे आणि गरम पदार्थ ही रसराजची खासियत. त्यामुळेच इथे सदैव गर्दी असली तरी येणाऱ्यांचं आतिथ्य करायला आणि तुमच्याशी गप्पा मारायला मिलिंद शेटे सदैव तत्परतेने उभे असतात, हेच तर इथलं खास वैशिष्टय़ं आहे.

कुठे आहे?

लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौकाजवळ

कॉसमॉस बँक इमारतीच्या दारात