विभक्त कुटुंबपद्धती आणि घरातील दोघेही नोकरी करणारे असल्यामुळे श्राद्धाचा स्वयंपाक आयता घेण्याकडे कल वाढला आहे. परंपरा जपताना पितरांच्या संतुष्टीसाठी केटररकडूनच अन्नपदार्थ मागवून दिवस साजरा केला जात असल्याने अशा पद्धतीचा स्वयंपाक करणारे घरगुती आचारी सध्या मागणी पुरविण्याच्या गडबडीमध्ये आहेत.

पुण्यामध्ये वर्षभर श्राद्धाचा स्वयंपाक करून घरपोच सेवा देणारे आचारी कार्यरत आहेत. मात्र, सध्या पितृ पंधरवडा असल्याने त्यांच्या कामामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भरडाचे वडे, तांदळाची खीर आणि रवा-बेसन लाडू हे या स्वयंपाकातील तीन महत्त्वाचे घटक असतात. मात्र, हे सारे पदार्थ करण्यासाठी सध्या कोणाकडे वेळ नसल्यामुळे आयता स्वयंपाक करून घेण्याकडे लोकांचा कल असल्याचे ‘सरपोतदार केटर्स’चे किशोर सरपोतदार यांनी सांगितले. माझ्याकडे दररोज किमान चार ते पाच कुटुंबांची आयत्या स्वयंपाकासाठी मागणी असते. काहींना घरपोच स्वयंपाक हवा असतो तर, काहीजण वाढपी कामासाठी पैसे मोजण्यास तयार असतात. एका व्यक्तीच्या भोजनाचे किमान दोनशे रुपये असा सध्या श्राद्धाच्या स्वयंपाकाचा दर आकारला जातो, असेही सरपोतदार यांनी सांगितले.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

श्राद्धाच्या स्वयंपाकातील पदार्थ ठरलेले असले तरी विभक्त कुटुंबपद्धतीमुळे प्रत्येक गृहिणीला सारा स्वयंपाक करणे शक्य होत नाही. अशा वेळी घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करणाऱ्याचा शोध घेतला जातो, अशी माहिती शेखर घाणेकर यांनी दिली. तीन-चार दिवस आधी किती माणसांचा स्वयंपाक हवा हे कळविल्यानंतर यजमानांना त्यांच्या ठरलेल्या वेळेत घरपोच स्वयंपाक पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. सेवा म्हणून हे काम करीत असलो तरी या व्यवसायातून पुरेसा नफा मिळतो, याकडे घाणेकर यांनी लक्ष वेधले.

सध्या ‘रेडिमेड’चा जमाना असल्यामुळे अनेकजण आयता स्वयंपाक घेण्यासाठी अनुकूल असतात. कोणताही त्रास न घेता घरपोच सेवा मिळत असल्यामुळे आयत्या स्वयंपाकाची मागणी वाढत असल्याची माहिती हेमंत पुराणिक यांनी दिली.

देणगी देणाऱ्यांमध्ये वाढ

पितृ पंधरवडय़ाचे औचित्य साधून काही प्रागतिक विचारांची मंडळी असल्या कर्मकांडामध्ये अडकून राहण्यापेक्षा सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला काही रक्कम देणगी देणे पसंत करीत आहेत. त्यामुळे घरामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने स्वयंसेवी संस्थेला देणगी देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भविष्यामध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता सरपोतदार यांनी व्यक्त केली.