औद्योगिक मंदीसह अन्य कारणांमुळे टाटा मोटर्सच्या िपपरी प्रकल्पातील उत्पादन घटले असून त्याचा थेट फटका िपपरी महापालिकेला बसला आहे. कंपनीकडून स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) स्वरूपात महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत आहे. महिन्याकाठी सरासरी २२ कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीकडून महापालिकेला मिळत होते. जूनमध्ये मात्र जेमतेम १६ कोटी एवढेच उत्पन्न मिळाल्याने सहा कोटी रुपयांचा फटका महापालिकेला बसल्याचे चित्र आहे.

उद्योगनगरी म्हणून िपपरी-चिंचवडची ओळख आहे. टाटा मोटर्स ही औद्योगिकदृष्टय़ा शहरातील महत्त्वाची कंपनी असून अनेक लहान-मोठे उद्योग या कंपनीवर अवलंबून आहेत. त्या माध्यमातून महापालिकेला भरघोस उत्पन्न मिळते. एकटय़ा टाटा मोटर्स कंपनीकडून महापालिकेला महिन्याकाठी सरासरी १८ ते २२

कोटी रुपये याप्रमाणे वर्षांकाठी जवळपास २५० कोटी रुपये उत्पन्न मिळते, अशी महापालिकेची आकडेवारी सांगते. गेल्या आर्थिक वर्षांतील आकडेवारीनुसार, एप्रिल २०१५ मध्ये २३ कोटी, मे- २० कोटी, जून- १९ कोटी, जुलै- २० कोटी, ऑगस्ट- १९ कोटी, सप्टेंबर- २० कोटी, ऑक्टोबर- १८ कोटी, नोव्हेंबर- १९ कोटी, डिसेंबर- २० कोटी एवढे उत्पन्न मिळाले. जानेवारी २०१६ मध्ये- १९ कोटी, फेब्रुवारी- २५ कोटी, मार्च- २२ कोटी रुपये उत्पन्न टाटा मोटर्सकडून मिळाले आहे. चालू आर्थिक वर्षांत एप्रिल २०१६ मध्ये २५ कोटी, मे- २१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले. मात्र, जून २०१६ मध्ये १६ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. सरासरी उत्पन्नाचा विचार केल्यानंतर जूनमध्ये जवळपास सहा कोटी रुपयांची घट आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

औद्योगिक मंदीचे वातावरण आहे. कंपनीने िपपरी प्रकल्पातील उत्पादन कमी करून काही प्रकल्प अन्यत्र स्थलांतरित करण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. काम कमी होत

असल्याने वर्षभरातील काही दिवस ‘ब्लॉक क्लोजर’ म्हणून निश्चित करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीतील दोन महत्त्वपूर्ण विभाग सलग २७ दिवस बंद ठेवावे लागले, त्याचा फटका कंपनीला बसला. एकूणच कंपनीतील उत्पादन कमी झाल्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत असल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.