धूर फवारणी करुन घेण्यास नागरिक उदासीन

पावसाला अधूनमधून सुरूवात झाल्याबरोबर डेंग्यूसदृश रुग्णांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार जूनमध्ये आतापर्यंत ८६ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच १९ रुग्णांना डेंग्यू झाल्याचे तपासण्यांवरुन निश्चित झाले आहे. डास नियंत्रणासाठी पालिकेद्वारे घराघरात केल्या जाणाऱ्या धूर फवारणीला (फॉगिंग) यंदाही नागरिक विरोधच करताना दिसत आहेत.

गेल्या चारच दिवसांत शहरात २७ डेंग्यूसदृश रुग्ण आणि ८ डेंग्यूरुग्णांची नोंद झाली आहे. मे मध्ये ३० डेंग्यूसदृश रुग्ण व ९ डेंग्यूरुग्ण आढळले होते. पावसाच्या सरींनी हजेरी दिल्यानंतर जूनमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. चिकुनगुनियाचेही ३० रुग्ण, तर मलेरियाचे २ रुग्ण या महिन्यात आढळले आहेत.

डेंग्यूच्या डासांची वाढ साठवून ठेवलेल्या स्वच्छ पाण्यात होत असल्यामुळे हा डास घराच्या आतच अधिक वेळा आढळतो. फ्रिजच्या खालचा ट्रे किंवा वातानुकूलित यंत्रणेत पाणी साठून डासांची पैदास झाल्याचे अनेकदा दिसून येते. घरांमध्ये धूर फवारणीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र नागरिकांकडून घरात येण्यासही अटकाव होत असल्याचे पालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाच्या प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘घराच्या आत ठिकठिकाणी साठणाऱ्या पाण्यात हा डास अधिक प्रमाणात आढळताना दिसतो. नागरिक इमारतींच्या पॅसेजमध्ये धूर फवारणीस तयार होतात, परंतु घराच्या आत फवारणीस नाराज असतात. घरातच डासांची पैदास असू शकेल हे अनेकांना मान्यच होत नाही. कुठेही डासांची पैदास झालेली आढळल्यास तसेच डेंग्यूसदृश लक्षणांचा रुग्ण सापडल्यास नागरिकांनी आणि डॉक्टरांनीही पालिकेस किंवा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवणे आवश्यक आहे. वेळीच डासांच्या वाढीबद्दल माहिती कळल्यास डास नियंत्रणासाठी त्याचा उपयोग होईल.’’