पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक झालेल्या वयोवृद्ध निवृत्त शिक्षकाने सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहे. पिंपरी चिंचवडमधील जटील प्रश्नासबंधी गेल्या दोन दिवसांपासून ६९ वर्षीय आजोबा  पिंपरी येथील आंबेडकर चौकात बसून सर्व सामान्याचे लक्ष वेधून घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जून २०१६ रोजी ‘मन की बात’मध्ये पिंपरी चिंचवड मधील निवृत्त शिक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांचं कौतुक केलं होतं. याच कुलकर्णी यांनी आता भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचं आणि त्यावर लावण्यात येणारा शास्तीकर माफ करण्याचं दिलेलं आश्वासन सरकारने न पाळल्यानं त्यांनी सरकारवर टीका केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील आंबेडकर चौकात त्यांनी गेल्या दोन दिवसापासून आंदोलन सुरु केलं आहे. मागण्या मान्य केल्याच लेखी पत्र  दिल्यानंतरच आंदोलन मागे घेणार, असा पवित्रा कुलकर्णी यांनी घेतला आहे. आंदोलनाच्या निर्णयाविषयी कुलकर्णी म्हणाले की,  पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना अनधिकृत बांधकाम नियमित करण्याचे आणि शास्तीकर माफ करण्याचे भाजपने आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यानंतर या आश्वासनाची पूर्तता केली नाही.  यासंदर्भात  मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवलं होते. मात्र, त्यांनी काहीच निर्णय घेतला नसल्यानं आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे.

कुलकर्णी यांनी निवृत्ती वेतनातून स्वच्छ भारत अभियानाला २ लाख ६० हजाराची आर्थिक मदत केल्यानं पंतप्रधानांनी २६ जून २०१६ च्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून त्यांचं कौतुक केलं होतं. एवढेच नाही तर पुण्यात आल्यानंतर मोदी यांनी कुलकर्णी यांची खास भेट घेऊन त्यांचा सत्कार देखील केला होता. चंद्रकांत कुलकर्णी हे विश्व हिंदू परिषदेचे आजीवन सदस्य आहेत. तसेच पाचव्या वर्षापासून त्यांनी संघाचे धडे घेतले आहेत. पठाणकोट हल्ल्यात शहिद झालेले जवान गुरुसेवक यांच्या कुटुंबियांना ते मदत करत आहेत. गुरुसेवक यांच्या पत्नी जसप्रीत कौर यांची भेट घेऊन त्यांनी  मुलीचा पालनपोषणाची खर्च उचलला आहे.  गुरुप्रीत हिच्यासाठी कुलकर्णी महिन्याला ३ हजार शंभर रुपयांचा धनादेश देत आहेत.त्यानंतर स्वत:ला समाज कार्यात झोकून दिलेल्या कुलकर्णी यांनी आता पिंपरी चिंचवडच्या नागरिकांच्या मागण्यांसाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. यावेळी त्यांनी येथील नागरिकांनी पाठिंबा द्यावा, अशी भावना देखील व्यक्त केली. जोपर्यंत अनाधिकृत बांधकाम आणि शास्तिकर याविषयी निकाल लागत नाही, तोपर्यंत माझा असाच लढा सुरू राहिल असंही सांगितले.