पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ ऑक्टोबरपासून रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पहिला टप्पा एक किलोमीटर ऐवजी दीड किलोमीटरचा करण्यात आला असून, त्यासाठी सतरा रुपये भाडे राहणार आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ११ रुपये ६५ पैसे भाडे राहणार आहे. या निर्णयामुळे रिक्षात बसल्यानंतर किमान सतरा रुपये भाडे द्यावे लागणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सध्या पहिल्या किलोमीटरसाठी अकरा रुपये, तर त्यानंतरच्या पुढील टप्प्यासाठी दहा रुपये दर आहे. प्रवाशांना मोठय़ा सामानासाठी प्रत्येक नगास तीन रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. प्रवाशांसाठी आनंदाची बाब म्हणजे रात्री बारानंतरच्या प्रवासासाठी मूळ भाडय़ाच्या पन्नास टक्क्य़ांऐवजी आता २५ टक्केच भाडे आकारणी रिक्षाचालकांना करता येणार आहे. रिक्षा चालकांनी सुधारित भाडय़ाच्या मीटरचे पुनप्र्रमाणीकरण ४५ दिवसांच्या आत  करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. मुदतीमध्ये मीटरमध्ये बदल न केल्यास त्यांना व्यवसाय करता येणार नाही, असे आरटीओच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
रिक्षाची दरवाढ दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. त्यानंतर सीएनजी आणि पेट्रोलच्या दरात वाढ झाल्यामुळे रिक्षाच्या भाडय़ातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी रिक्षा संघटनांकडून करण्यात येत होती. त्याबाबत प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी यांची मते जाणून घेतली होती. त्यानुसार शनिवारी झालेल्या बैठकीत रिक्षाच्या भाडय़ात दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वीस वर्षे झालेल्या रिक्षांची नोंदणी रद्द होणार
पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती कार्यक्षेत्रातील मूळ नोंदणी दिनांकापासून वीस वर्षे पूर्ण होणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीची नोंदणी १ जानेवारी २०१४ पासून रद्द करणे बंधनकारक करण्यात आले आहे. वीस वर्षे पूर्ण झालेल्या रिक्षा व्यवसाय करताना परिवहन विभाग, पोलीस विभाग आणि इतर शासकीय विभागात आढळून आल्यास त्या भंगारात विकून वसूल होणारी रक्कम शासकीय महसुलात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.