भाजप नेत्यांकडून घेतला आढावा

पिंपरी पालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत युतीची ‘रडतखडत’ बोलणी सुरू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी युती कराच, अशी ठाम भूमिका घेतली आहे. जागावाटपाच्या चर्चेची माहिती घेत या संदर्भात काही सूचनाही संघाने भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.

भाजप-शिवसेना युती व्हावी, अशी भूमिका ठेवून संघाने बराच पुढाकार घेतला आहे. दोन्ही पक्षातील कोंडी फोडण्याचे काम संघानेच केले. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. आतापर्यंत चार ते पाच स्वतंत्र बैठका संघाने घेतल्या असून शनिवारीही त्यांनी भाजपच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना चिंचवडला बोलावून घेतले. शिवसेना नेत्यांशी आतापर्यंत युती संदर्भात झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी घेतली. कोणत्या जागा शिवसेनेला सोडण्यात येणार व कोणत्या भाजपकडे ठेवण्यात येणार, याविषयी चर्चा केली. उमेदवारी वाटप करतानाचे निकष, मित्र पक्षांच्या जागा, नव्या व जुन्यांना संधी अशा अनेक मुद्दय़ांवर त्यांनी चर्चा केली. निष्ठावंतांवर अन्याय न करण्याची भूमिका त्यांनी घेतली. युती झाली पाहिजे, त्यादृष्टीने सकारात्मक भूमिका घेण्याच्या सूचना त्यांनी केल्याचे सांगण्यात आले. तथापि, भाजप नेत्यांना संघाचा इतका हस्तक्षेप फारसा रुचला नसल्याचे समजते.

चर्चेची गाडी अडली

वाकडला झालेल्या युतीच्या बैठकीत शिवसेनेने भाजप ५८, शिवसेना ५५ व मित्र पक्ष १५ असा प्रस्ताव दिला आहे. तथापि, तो भाजपला मान्य नाही. त्यामुळे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी चर्चा करण्याचे कारण देऊन भाजपने वेळ मागून घेतली. दोन दिवसांनंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे शुक्रवारी पत्रकारांना सांगण्यात आले होते. मात्र, दोन दिवसात संयुक्तपणे दोन्हीकडील पदाधिकारी बसले नाहीत. त्यामुळे चर्चेची गाडी पुढे सरकू शकली नाही. युती होणार की नाही, या विषयी संभ्रमावस्था आहे. युतीच्या बैठका होत नसल्याने आघाडीच्या युतीसंदर्भात बैठक होत नसल्याचे सांगण्यात आले.