पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्याच्या ठिकाणी डोंगराला सुरक्षा जाळी लावण्याचे काम सोमवारी हाती घेण्यात आले. अध्र्या डोंगराला जाळ्या लावून या भागातील धोकादायक दगड सुरुंग लावून पाडण्यात येणार आहेत. याकरिता खंडाळा घाटातील मुंबईकडे जाणारी वाहतूक आजही जुन्या महामार्गावरून वळविण्यात आली होती. तर पुण्याकडे येणाऱ्या  मार्गावरील एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी वापरण्यात आली होती. पुढील काही दिवस वाहतुकीमध्ये हाच बदल कायम ठेवण्यात येणार आहे.
खंडाळा एक्झीट जवळ आयआरबीच्या वतीने या एका मार्गिकेकरिता वाहतुकीला वळण्यासाठी मार्ग देण्यात आला आहे. याकरिता इशारा देणारे दिवे व दिशादर्शक रेडियम लावण्यात आले आहेत. तसेच खंडाळा बोगद्याच्या तोंडाजवळ जेथे जाळी लावण्याचे काम सुरू आहे त्याठिकाणी काम करताना रस्त्यावर येणारे संभाव्य दगड मुंबई-पुणे मार्गिकेवर जाऊ नये याकरिता रस्ता दुभाजकाजवळ लाकडी खांब उभे करून त्यावर सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. खंडाळा महामार्ग व बोरघाट पोलीस दिवसभर ज्या ठिकाणी वाहनांना डायव्हर्शन दिले आहे तेथे तनात होते. आडोशी बोगद्याजवळील काही सल झालेले व धोकादायक दगड आज काढण्यात आले, तर दहाजणांचे पथक खंडाळा येथील डोंगरावर जाळी ओढण्याचे काम करत होते.