बनारस घराण्याचे रितेश-रजनीश मिश्रा यांची बहारदार मैफल आणि श्रीकृष्णाची बासरी हाती घेतलेल्या देबोप्रिया-सुचिस्मिता या भगिनींचे मंत्रमुग्ध करणारे बासरीवादन अशा कलाकारांच्या जोडीने सादर केलेल्या आविष्काराची गोडी रसिकांनी गुरुवारी अनुभवली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात युवा कलाकारांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. संगीतमरतड पं. जसराज यांच्या गायनाने गुरुवारच्या सत्राची सांगता झाली.

ज्येष्ठ गायक पं. राजन-साजन मिश्रा जोडीतील पं. राजन यांचे पुत्र रितेश आणि रजनीश यांच्या सहगायनाने गुरुवारच्या सत्राचा प्रारंभ झाला. आम्ही एकत्र गायन करावे ही आमचे आजोबा पं. हनुमान प्रसाद मिश्रा आणि पं. गोपाल मिश्रा यांची इच्छा होती. एकत्र राहू तर, प्रेम वाढेल आणि कलेचा आनंदही द्विगुणीत करता येईल अशी त्यांची धारणा होती, असे रितेश मिश्रा यांनी सांगितले. आमच्यामध्ये स्पर्धा नाही. तर, परस्परांचा आदर करून गायन करताना एकमेकांना अवकाश देता येतो आणि रसिकांनाही दुहेरी आनंद देता येतो, अशी भावना रजनीश मिश्रा यांनी व्यक्त केली. मी नऊ वर्षांचा आणि रजनीश सात वर्षांचा असताना १९८५ मध्ये आम्ही बनारसमध्ये पहिल्यांदा गायलो होतो. पं. राजन-साजन मिश्रा यांना तानपुऱ्यासह गायनसाथ करताना खूप काही शिकता आले. या महोत्सवात दुसऱ्यांदा गायन करताना दडपण होते. पण, गुरुजनांचा आशीर्वाद आणि रसिकांच्या प्रेमाने गायन करणे सहजसोपे झाले, असे रितेश यांनी सांगितले.

मधुर सुरांची बरसात करणाऱ्या देबोप्रिया आणि सुचिस्मिता यांच्या बासरीवादनाने रसिकांना आनंदाची अनुभूती आली. सरस्वतीचे माहेरघर असलेल्या या महोत्सवाच्या व्यासपीठावरून कला सादर करताना उदयोन्मुख कलाकारांना मंदिरामध्ये आल्यासारखे वाटते, अशी भावना या दोघींनी व्यक्त केली. आमचे आई-वडील गायनाच्या क्षेत्रातील आहेत. बासरीवादन हे कष्टप्रद असल्याने मुलींनी सतार वाजवावी, नृत्य करावे किंवा गायन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, पं. हरिप्रसाद चौरासिया यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १८ वर्षांत आम्ही बासरीवादन शिकलो. यापूर्वी त्यांच्या मैफलीत तानपुऱ्याची साथ केली होती. पण, आता स्वतंत्रपणे वादन करताना आनंद झाला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आम्ही येथून जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

महोत्सवात आज

  • ब्रजेश्वर मुखर्जी (गायन)
  • डॉ. म्हैसूर मंजुनाथ आणि म्हैसूर नागराज (व्हायोलिन)
  • पूर्वाधनश्री (भरतनाटय़म)
  • पं. उल्हास कशाळकर (गायन)