पालिका अधिकाऱ्यांचे कानावर हात; पोलीस म्हणतात, तपास सुरू आहे!

पिंपरी पालिकेच्या आकुर्डीतील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील मगरी चोरीला गेल्याच्या प्रकरणाचे गूढ वाढत चालले आहे. या संदर्भात परस्परविरोधी दावे केले जात असून काहीही करून हे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आटापिटा सुरू आहे. या संदर्भात सुरू असलेल्या घडामोडी पाहता मगरी बेपत्ता झाल्या नसून त्यांची तस्करी करण्यात आल्याचा संशय व्यक्त होऊ लागला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले असून पोलीस अधिकारी तपास सुरू असल्याचेच सांगत आहेत. दरम्यान, २७ मार्चला वन अधिकाऱ्यांचे पथक प्राणिसंग्रहालयात तपासणीसाठी येणार आहे.

आकुर्डीत सात एकर जागेत पालिकेचे प्राणिसंग्रहालय आहे. योग्यप्रकारे निगा राखली जात नसल्याने घोणस, नाग, धामीण, दिवड, तस्कर जातीच्या विविध २० सापांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण नोव्हेंबर २०१६ मध्ये उजेडात आल्याने एकच खळबळ उडाली होती. काही वर्षांपूर्वी ‘किंग कोब्रा’ गूढरीत्या चोरीला गेल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. पशुपक्षी गायब होत असल्याच्या आणि त्यांची योग्यप्रकारे काळजी घेतली जात नसल्याच्या तक्रारी नवीन नाहीत, असा ‘लौकिक’ असलेल्या प्राणिसंग्रहालयातून गेल्या पाच महिन्यांत काही मगरी आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झाल्या असून काही मृत्युमुखी पडल्या आहेत. सुरुवातीला याबाबतची माहिती दिली जात नव्हती. लोकसत्ताने ‘आकुर्डी प्राणिसंग्रहालयातील मगरी गायब’ हे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली. त्यानंतर मात्र, चार मगरी मृत्युमुखी पडल्या आणि चार चोरीला गेल्या आहेत, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली. ऑक्टोबर २०१६ मध्ये प्राणिसंग्रहालयात १६ मगरी होत्या, अशी पालिकेकडे नोंद होती. २३ नोव्हेंबरला मगरीची चार पिले चोरीला गेली आणि एक ते १७ डिसेंबर या कालावधीत चार मगरी मृत्युमुखी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. मगरी चोरीला गेल्यानंतर निगडी पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचा पालिकेचा दावा पोलिसांनीच नंतर खोडून काढला होता. मात्र, आता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या म्हणण्यानुसार २४ नोव्हेंबर २०१६ ला मगरी चोरीला गेल्याचा तक्रार अर्ज पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी दिला होता. अर्ज दिल्यानंतर अपेक्षित पाठपुरावा पालिकेने केला  नाही, हे पुरते उघड झाले आहे. मृत मगरींचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे पालिका अधिकारी ठामपणे सांगतात. मात्र, त्यांच्या मृत्यूचे खरे कारण जाहीर करण्यात आले नाही. एकूणच या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल आहे. या मगरी चोरीला गेल्या किंवा मृत्युमुखी पडल्या आहेत, या विषयीचा शंका घेतली जात असून मगरींची तस्करी झाल्याचा संशय बळावत आहे. हे प्रकरण वाढू नये म्हणून अधिकारी वर्ग कामाला लागला आहे. या प्रकरणात काहीही नाही, उगीचच उकरून काढू नका. बातम्या आल्यानंतर गेलेल्या मगरी परत येणार आहेत का, असा सल्ला एका मोठय़ा अधिकाऱ्यांनी काही पत्रकारांना दिला आहे. तर, या प्रकरणात काहीही ‘काळेबेरे’ नाही, असा दावा करत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यास या प्रकरणी फिर्याद दाखल केली जाईल, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे

आकुर्डी प्राणिसंग्रहालयातील १० पैकी चार मगरी चोरीला गेल्याविषयीचा तक्रार अर्ज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. सर्व शक्यता तपासून घेतल्या जातील. तपासात जे निष्पन्न होईल, त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

– गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त

प्राणिसंग्रहालयातील मगरीची पिले चोरीला गेल्यानंतर सर्व संबंधितांना कळवण्यात आले होते. २७ मार्चला या प्रकरणाच्या चौकशीसाठी वनअधिकाऱ्यांचे पथक येणार आहे. तस्करीचा प्रकार वाटत नाही. मात्र, ही घटना दुर्दैवी आहे. यापुढे अधिक खबरदारी घेऊ.

– डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी