शिवसेना शहरप्रमुखांचे नाव भाजप नेत्यांनी नाकारले

‘स्मार्ट सिटी’साठी स्थापन करण्यात येणाऱ्या विशेष उद्देश वहन (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) कंपनीच्या संचालक मंडळात समाविष्ट करण्यावरून पिंपरी भाजप-शिवसेनेत वादाचा पुन्हा तडका उडाला आहे. शिवसेनेने शहरप्रमुख राहुल कलाटे यांना संचालक करण्याचा निर्णय घेत तसे पत्र दिले असताना भाजप नेत्यांनी मात्र त्यांचा पत्ता कापण्याची खेळी केली.

कंपनीच्या १५ जणांच्या संचालक मंडळात महापौर नितीन काळजे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांना यापूर्वीच प्रतिनिधित्व मिळालेले आहे. जे राजकीय पक्ष संचालक मंडळात प्रतिनिधित्व करत आहेत, ते वगळून अन्य दोन राजकीय पक्षांना संख्याबळाच्या उतरत्या क्रमानुसार प्रत्येकी एक याप्रमाणे दोन सदस्यांची निवड करण्याचा विषय मंगळवारी सभेपुढे होता. त्यानुसार, शिवसेना व मनसेच्या एका सदस्याची वर्णी लागणार होती. पिंपरी पालिकेत सचिन चिखले हे मनसेचे एकमेव नगरसेवक आहेत, त्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. शिवसेनेत या जागेसाठी तीव्र चुरस होती. शिवसेनेच्या मुख्यालयातून राहुल कलाटे यांना संधी देण्यात येत असल्याचे पत्र सचिव विनायक राऊत यांनी पाठवले होते. तथापि, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कलाटे यांचे नाव स्वीकारण्यास नकार दिला आणि शिवसेनेच्याच प्रमोद कुटे यांची वर्णी लावली.

भाजप नेत्यांच्या या कृतीस कलाटे यांच्यासह विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे लक्षात घेऊनच ही निवड झाली पाहिजे, अशी भूमिका बहल यांनी मांडली. तथापि, भाजपचे गटनेते एकनाथ पवार यांनी मात्र शासन निर्णयात असा कोठेही उल्लेख नसल्याचे सांगत त्यास नकार दिला. भाजप नेते ठरवून आपले नाव स्वीकारत नसल्याचे लक्षात आल्याने कलाटे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यासंदर्भात, त्यांनी पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासह भाजप पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.