दहावीच्या निकालाच्या अफवांना आलेला ऊत आता पालक, विद्यार्थी यांच्याबरोबरच राज्यमंडळालाही डोकेदुखी ठरला आहे. विविध संकेतस्थळांवर आणि समाज माध्यमांवर सध्या दहावीचा निकाल गाजतो आहे. अखेर अफवांवर विश्वास ठेवू नका, असे निवेदन प्रसिद्ध करण्याची वेळ राज्यमंडळावर आली आहे.
राज्यमंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता आता शिगेली पोहोचली आहे. समाज माध्यमे, निकाल प्रसिद्ध करणारी संकेतस्थळे, व्हॉट्सअ‍ॅप यांच्या माध्यमातून निकालाच्या नव्या नव्या तारखा समोर येत आहेत. आतापर्यंत निकालाच्या किमान चार ते पाच तारखा विविध संकेतस्थळांच्या माध्यमातून समोर येत आहेत. ३१ मे, १ जून, २ जून, ६ जून, ८ जून अशा तारखा सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. याच दिवशी दहावीचा निकाल ‘खात्रीपूर्वक’ जाहीर होणार असल्याचे प्रत्येक संकेतस्थळ सांगत आहे. निकाल कसा पाहाल, कुठे पाहाल, त्यासाठीची संकेतस्थळे असे तपशीलही जोडीला पुरवण्यात आले आहेत. निकाल किती टक्के लागणार याचे अंदाजही देण्यात आले आहेत. काही संकेतस्थळांनी निकाल जाहीर होण्यास काहीच तास राहिले असल्याचेही नमूद केले आहे. या पुढे पाऊल टाकत काही संकेतस्थळांनी निकाल जाहीर झाल्याचेही म्हटले आहे. दरवर्षी ऑनलाईन निकाल पाहता येणाऱ्या संकेतस्थळांशी साधम्र्य असलेली संकेतस्थळे आणि राज्यमंडळाचे बोधचिन्ह यांमुळे गोंधळ अधिकच वाढला आहे. काही संकेतस्थळांनी ‘राज्य निवड
आयोग’ म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि दहावीची परीक्षा या दोन्हीची ओळख एसएससी असल्यामुळे त्यातही गोंधळ घातला आहे.
या सगळ्या गोंधळाने पालक आणि विद्यार्थी बेजार झाले आहेत. सतत येणाऱ्या नव्या संदेशांनी आणि तारखांनी विद्यार्थीही तणावात आले आहेत. पसरणाऱ्या अफवांना आवर कसा घालायचा असा प्रश्न राज्यमंडळाला पडला आहे. एरवी अमुक दिवशी निकाल जाहीर होईल, असे निवेदन प्रसिद्ध करणाऱ्या राज्यमंडळावर ‘आम्ही अद्याप निकालाची तारीख जाहीर केलेली नाही,’ असे निवेदन जाहीर करण्याची वेळ आली आहे.

राज्यमंडळाचे निवेदन
‘राज्यमंडळामार्फत मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाची तारीख मंडळाने आजमितीस जाहीर केलेली नाही. काही प्रसार माध्यमांमार्फत मंडळाचे बोधचिन्ह (लोगो) वापरून दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा अनधिकृतपणे प्रसारित करण्यात येत आहेत. त्या अनधिकृत तारखांवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये. निकालाची तारीख प्रसार माध्यमे आणि मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल,’ असे निवेदन राज्यमंडळाने दिले आहे.