विद्यापीठ अनुदान आयोगाकडून ‘वित्तीय साक्षरता अभियाना’चे आयोजन

शहरातील बाजारपेठांमध्ये ‘डिजिटल मनी’बाबत जागृती करण्याची जबाबदारी आता विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली असून ‘वित्तीय साक्षरता अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांना या अभियानात सहभागी होण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने पत्र पाठवले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शिक्षणसंस्थेतील सर्व व्यवहार हे रोख विरहित करण्याच्या  सूचनाही दिल्या.

रोख रकमेविना, डिजिटल मनीचा वापर करून अधिकाधिक व्यवहार व्हावेत, यासाठी शासनाकडून जागृती अभियान राबवण्यात येत आहे. आता ही जागृती करण्याची जबाबदारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यासाठी ‘वित्तीय साक्षरता अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकरवी हे अभियान राबवण्यात येणार आहे. १२ डिसेंबर ते १२ जानेवारी २०१७ या कालावधीत हे अभियान होणार आहे.

विद्यार्थ्यांनी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाच्या जवळ असलेली बाजारपेठ, मंडई असा परिसर निश्चित करायचा आहे. या परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक यांचे व्यवहार रोख विरहित व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी व्यावसायिकांना असे व्यवहार करण्याचे प्रशिक्षणही विद्यार्थ्यांनी द्यायचे आहे. परिसरातील घरांमध्ये फिरूनही विद्यार्थ्यांनी रोख विरहित व्यवहार करण्याबाबत जागृती करायची आहे. त्याचबरोबर योजना यशस्वी होते आहे का याची खातरजमा करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांची असणार आहे.