पाचशे व हजारच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचा फटका स्वेटर व अन्य उबदार कपडय़ांची विक्री करणाऱ्या व्यवसायाला बसला आहे. एकीकडे हजार व पाचशेच्या नोटांवर बंदी तर दुसरीकडे सुटय़ा पैशांची कमतरता, यामुळे आठवडाभरापासून ग्राहकांनी उबदार कपडय़ांच्या खरेदीकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. उबदार कपडय़ांच्या विक्रीमध्ये ७० टक्क्यांनी घट झाली असून रस्त्यावर स्वेटर विक्री करणाऱ्यांचे त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.थंडीलासुरुवात होण्याच्या आधीच उबदार कपडे विक्रीसाठी बाजारात येतात. यंदा देखील दिवाळीच्या आधीपासून उबदार कपडय़ांची विक्री सुरू झाली आहे. शहरातील लक्ष्मी रस्त्यावर पसतीसहून अधिक स्वेटर विक्रेत्यांचे स्टॉल आहेत. या स्टॉलवर स्वेटर, शाली, टोपी, जॅकेट, मफलर, हातमोजे व पायमोजे यांची विक्री केली जाते. हिवाळ्यात येथे उबदार कपडय़ांच्या खरेदीसाठी गर्दी होते. नेपाळहून आलेले वीसहून अधिक विक्रेते हा व्यवसाय करतात. सत्तर, ऐंशीजण या व्यवसायात काम करतात. कामगार बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी भागातू आले आहेत.  थंडी सुरू झाल्यामुळे स्वेटर व अन्य उबदार कपडय़ांच्या विक्रीने जोर धरला होता. मात्र नोटांसंबंधीच्या निर्णयानंतर व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या आठवडय़ापासून विक्री थंडावली आहे. बाजारात विक्रीस असलेल्या स्वेटरच्या किमती ३०० पासून ८०० पर्यंत आहेत, तर जर्किनची व जॅकेटची किंमत ४०० पासून दोन ते अडीच हजारांपर्यंत आहे. ग्राहकांना सुटय़ा पैशांची चणचण भासत असल्याने खरेदी करणे टाळले आहे.

थंडीला सुरुवात झाल्यामुळे उबदार कपडय़ांच्या विक्रीचा व्यवसाय चांगला सुरू होता. परंतु पाचशे-हजारांच्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर व्यवसाय खूप कमी प्रमाणात होत आहे. विक्रीत साठ ते सत्तर टक्क्यांनी घट झाली आहे.

उदयकुमार सिंह, विक्रेते