पिंपरी-चिंचवड शहर हागणदारीमुक्त व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना सुरू असताना, त्याचाच एक भाग म्हणून शहरभरात २४४ ‘पोर्टेबल टॉयलेट’ बसवण्यात आली आहेत. पालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांत मिळून उघडय़ावर शौचास बसण्याची ५२ ठिकाणे शोधण्यात आली होती, त्या ठिकाणी या तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून हागणदारीमुक्त शहरासाठी विविध उपक्रमांचे आयोजन सुरू आहे. महापालिकेच्या वतीने आतापर्यंत साडेसात हजार वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी, यासाठी सहआयुक्त दिलीप गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथक कार्यरत आहे. उघडय़ावर नागरिक शौचास बसतात, अशी शहरभरातील ५२ ठिकाणे या पथकाने शोधून काढली आहेत. रेल्वे स्थानक परिसर, रस्ते, मोकळ्या जागा, नाल्यांच्या जवळ, झोपडपट्टय़ा आदी ठिकाणी नागरिक शौचास बसतात. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरते. आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी उघडय़ावर न बसता शौचालयांचा वापर करावा, यासाठी महापालिकेने विविध पातळीवर प्रयत्न सुरू केले. त्याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी ‘पोर्टेबल टॉयलेट’ बसवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात ५०, ‘ब’ मध्ये – ४४, ‘क’ मध्ये – ६५, ‘ई’ मध्ये – ४५ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात अशी ४० तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये उभारली आहेत. तात्पुरत्या शौचालयांचा वापर व्हावा म्हणून तीन महिने प्रयोग करण्यात आला. त्यानंतर नागरिकांना शौचालयांची सवय लागल्याचे निरीक्षण महापालिकेने नोंदवले आहे.