विद्यापीठ टिळक यांचेच, ते चालवणाऱ्या संस्थेचे अध्यक्षही टिळकच, विश्वस्त मंडळातील सदस्यही कुटुंबातलेच.. त्यामुळे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे नियमबाह्य़ नियुक्ती झालेले कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांना पगाराखेरीज दरमहा ७५ हजार रुपये देण्याचा आणि आलिशान गाडी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शुल्क हेच प्रमुख उत्पन्न असणाऱ्या या विद्यापीठाला आता हा पगार द्यायचा कसा, असा प्रश्न भेडसावत आहे.
हे विद्यापीठ सार्वजनिक ट्रस्टचे आहे. या ट्रस्टमधील सहा पैकी तीन सदस्य हे ‘टिळक’ घराण्यातीलच आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक हेच ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचेही अध्यक्ष आहेत. याशिवाय डॉ. गीताली टिळक-मोने, प्रणिती टिळक या विश्वस्त मंडळाच्या सदस्य आहेत. दोन महिन्यांपूर्वी विश्वस्त मंडळाच्या झालेल्या बैठकीत डॉ. दीपक टिळक यांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला. सध्या डॉ. टिळक यांना महिन्याला जवळपास १ लाख ८० हजार रुपये वेतन विद्यापीठाकडून दिले जाते. याशिवाय आतापर्यंत त्यांच्या जीवन विम्याचा ९ लाख ४ हजार ५३८ रुपये वर्षांला विद्यापीठाकडून हप्ता देण्यात येत होता. मात्र, डॉ. टिळक यांच्या विम्याची मुदत संपली आहे आणि विमा उतरवण्यासाठी वयाचे बंधन असल्यामुळे नवा विमा उतरवता येणार नाही. त्यामुळे दरमहा डॉ. टिळक यांना ७५ हजार रुपये पगाराव्यतिरिक्त देण्यात यावेत असा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. याशिवाय त्यांना त्यांच्या पसंतीची नवी गाडी विद्यापीठाच्या खर्चाने देण्यात यावी, असाही निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून मिळणारे शुल्क आणि अनुदान हे विद्यापीठाच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. ट्रस्टमार्फत विद्यापीठाला काहीच मिळत नाही. त्यामुळे   हा वाढलेला पगार द्यायचा कसा, असा प्रश्न विद्यापीठ प्रशासनाला पडला आहे.