महिनाभरात सहा जणांचा धरणात बुडून मृत्यू; धरणालगतच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी

उन्हाळय़ामुळे सध्या खडकवासला धरण परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. शनिवारी आणि रविवारी तर खडकवासला भागात पर्यटकांची झुंबड उडते. या पर्यटकांनी धरण परिसरात उच्छाद मांडला आहे. धरणालगत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी थाटलेली दुकाने, अरुंद रस्त्यावर होणारी वाहनांची कोंडी आणि वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे खडकवासला परिसरातील शांततेचाही भंग होत आहे. गेल्या महिनाभरात खडकवासला धरणात बुडून सहा जणांचे मृत्यू झाले आहेत.

गेल्या काही वर्षांत खडकवासला धरण भागात बेकायदेशीररीत्या चौपाटी निर्माण झाली आहे. हा भाग पाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. सुरुवातीला या भागात खाद्यपदार्थ विक्रीच्या गाडय़ांची संख्या कमी होती. खडकवासला भागात मजुरी करणाऱ्या अनेकांनी या परिसरात बेकायदेशीररीत्या गाडय़ा लावल्या. खडकवासला ग्रामपंचायत त्यांच्याकडून कर घेत नाही. त्यामुळे ही चौपाटी पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ही चौपाटी निर्माण होण्यामागे सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. धरणाच्या काठालगत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी त्यांची दुकाने थाटली आहेत.

आठवडय़ात शनिवारी आणि रविवारी या भागात प्रचंड गर्दी असते. या दिवशी मोठय़ा संख्येने पुणेकर सिंहगडावर फिरायला जातात. सिंहगडावरून परतीच्या वाटेवर खडकवासला धरणालगतच्या रस्त्यावर दुतर्फा गाडय़ा लावल्या जातात. त्यामुळे या भागात कोंडी होती. मोटारी, दुचाकी दुतर्फा लावल्यामुळे या रस्त्यावरून वाट काढणे अवघड होते. ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून आठवडय़ातून दोन दिवस तेथे पोलीस नेमावेत. हवेली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी या भागात शनिवारी आणि रविवारी खाद्यपदार्थाच्या गाडय़ा लावण्यास मनाई केली होती. गाडय़ा न लावता रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी बैठा व्यवसाय करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे या भागातील शनिवारी आणि रविवारी होणारी कोंडी कमी झाली होती आणि वाहतुकीला शिस्त आली होती. मात्र त्या उपाययोजना कायम राहिलेल्या नाहीत.

धरणाच्या भिंतीचे काम अर्धवट

धरणातील पाण्याचा पुरवठा शहर आणि जिल्हय़ातील नागरिकांना करण्यात येतो. धरणात अंघोळ करणे तसेच पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. पर्यटकांनी धरणात उतरू नये म्हणून भिंत बांधण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या माध्यमातून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. भिंतीचे काम अर्धवट राहिल्याने पर्यटक पाण्यात उतरतात. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या महिनाभरात धरणात बुडून सहा जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. या भागात सहकुटुंब फिरायला येणारे तसेच महाविद्यालयीन तरुणांची संख्या मोठी आहे. धरणात उतरण्यास मनाई करण्यात आल्याचे फलक लावून देखील पर्यटक दुर्लक्ष करतात. हे दुर्लक्ष जीवावर बेतते.

उन्हाळय़ात खडकवासला धरणालगत गर्दी होती. पोलिसांकडून या परिसरात बंदोबस्त ठेवण्यात येतो. बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस नेमण्यात येतात. पोलिसांच्या वाहनांवरील ध्वनिवर्धकांवरून पर्यटकांना सूचना देण्यात येतात, मात्र पोलिसांच्या सूचनांकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होते किंवा दुर्घटना घडतात.

कैलास पिंगळे, पोलीस निरीक्षक, हवेली पोलीस ठाणे</strong>