प्रवासी व मालवाहतुकीतील वाहनांचे परवाना शुल्क व विलंब शुल्कामध्ये राज्य शासनाने मोठय़ा प्रमाणावर वाढ केली असल्याने त्याचा फटका वाहतूकदारांसह नागरिकांनाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुल्कवाढीमुळे खासगी कॅब, बस, टुरिस्ट टॅक्सी आदींचा प्रवास महाग होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रिक्षा व टॅक्सी चालकही भाडेवाढीसाठी मागणी मांडण्याच्या विचारात आहेत. मात्र, यापूर्वी हे वाढीव शुल्क लागूच होऊ नये, यासाठी प्रयत्न होत असून, वाहतूकदारांचे कंबरडे मोडणारी ही शुल्कवाढ तातडीने रद्द करण्याची मागणी करून बंदचा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रवासी वाहतुकीत असणाऱ्या वाहनांच्या करामध्ये पाच ते सहा वर्षांपूर्वी मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यात आली होती. वाहतूकदार या करवाढीतून सावरले असतानाच शासनाने आता परवाना शुल्कामध्येही भरमसाठ वाढ केली आहे. १० फेब्रुवारीपासून ही वाढ लागू करण्यात आली आहे. मीटर टॅक्सी व रिक्षा परवाना शुल्क दोनशेवरून थेट एक हजार करण्यात आले आहे. मीटर नसलेल्या कॅब, मॅक्सी कॅब, कंत्राटी परवाना बस, टप्पा वाहतुकीतील वाहने, खासगी प्रवासी वाहने आदींचे परवाना शुल्क चारशे रुपयांवरून हजार रुपये करण्यात आले आहे. टुरिस्ट टॅक्सीचे परवाना शुल्क सहाशे रुपयांवरून थेट दोन हजार रुपये करण्यात आले आहे, टुरिस्ट कॅबचे शुल्क चारशे रुपयांवरून तब्बल पाच हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आले आहे.
खासगी बससाठी लागणारा तात्पुरता परवाना शंभर रुपयांवरून हजार रुपये, तर रिक्षाच्या परवान्याचे विलंब शुल्क प्रतिमहिना शंभर रुपयांवरून पाच हजार रुपये करण्यात आले आहे. प्रवासी वाहतुकीतील वाहनांबरोबरच माल वाहतुकीतील वाहने व राष्ट्रीय परवाना असलेल्या वाहनांच्या परवाना शुल्कातही मोठय़ा प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
शासनाने केलेल्या या शुल्कवाढीला रिक्षा संघटना व वाहतूकदारांनी जोरदार विरोध केला आहे. शासनाच्या या निर्णयाचा फटका राज्यातील आठ लाख रिक्षा चालक, सहा लाख टॅक्सी चालक व सुमारे दीड लाख बस चालकांना तसेच ट्रक चालकांना बसणार असल्याचे महाराष्ट्र राज्य वाहन चालक, मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले. या निर्णयाच्या विरोधात सोमवारी मुंबईत एक दिवसांचा बंदही ठेवण्यात येणार असून, पुढे राज्यभर हे आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शिंदे यांनी दिला आहे.
शासनाने ही शुल्कवाढ रद्द न केल्यास वाहतूकदारांना अतिरिक्त खर्च सोसावा लागणार आहे. त्याचा काही भार वाहतूकदारांकडून प्रवाशांवरही टाकला जाण्याची शक्यता असल्याने टुरिस्ट टॅक्सी, खासगी बस, टुरिस्ट कॅब, मीटर नसलेल्या कॅब व इतर प्रवासी वाहनांची तातडीने भाडेवाढ होऊ शकते. रिक्षा व टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून जिल्हा परिवहन प्राधिकरणाकडे भाडेवाढ मागितली जाऊ शकते. त्यामुळे सर्वच प्रकारातील प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.