शहरातील लोकसंख्या लक्षात घेता राज्याच्या विविध भागांमध्ये रिक्षांची संख्या वाढविण्यासाठी नवे परवाने देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रामध्ये तीन हजारांहून अधिक नव्या रिक्षांची भर पडणार आहे. शहरांतर्गत प्रवासाची वाढती गरज लक्षात घेता रिक्षांची आवश्यकता आहे, मात्र शहराच्या विविध भागांत आजही भाडेआकारणीसाठी रिक्षाचा मीटर वापरला जात नाही. त्याचप्रमाणे भाडे नाकारण्याचे प्रकारही सुरूच आहेत. त्यामुळे केवळ रिक्षांची संख्या वाढवून प्रवाशांचे प्रश्न सुटणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सरसकट २५ टक्के रिक्षांची संख्या वाढविण्याचे नियोजन पूर्वी करण्यात आले होते. मात्र, त्याला विरोध झाल्यानंतर ही संख्या कमी करण्यात आली. नव्या निर्णयानुसार पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ३,२०८ नवे रिक्षा परवाने देण्यात येणार आहे. त्यासाठी बॅजधारकांकडून ऑनलाइन अर्जही मागविण्यात आले असून, लॉटरी पद्धतीने परवाने देण्यात येणाऱ्यांची निवडही करण्यात आली आहे. सध्या अर्जदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन सुमारे दोन ते तीन महिन्यांमध्ये नव्या रिक्षा शहराच्या रस्त्यांवर धावणार आहेत.
शासनाने फेब्रुवारी २०१४ मध्ये पुणे जिल्हय़ामध्ये रिक्षांचे १७०० परवाने वाढविले होते. आता नव्याने तीन हजारांहून अधिक नवे परवाने दिले जाणार आहेत. पुणे व िपपरी-चिंचवड शहराचा विचार केल्यास सध्या ४६ हजारांहून अधिक अधिकृत रिक्षा शहरात आहेत. नव्या रिक्षांमुळे ही संख्या पन्नास हजारांच्याही पुढे जाणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी रिक्षांचे परवाने वाढविण्याचा निर्णय झाला असला, तरी त्या वाढवून खरोखरच प्रवाशांची सोय होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराचा मुख्य भाग वगळता उपनगरांमध्ये बहुतांश रिक्षाचालकांकडून मीटरनुसार भाडेआकारणी केली जात नाही. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये अभावानेच काही रिक्षाचालक मीटरचा वापर करतात, तेही मुख्य रस्त्यांवरच. त्यामुळे प्रवाशांकडून काही रिक्षाचालक प्रवाशांकडून मनमानी पद्धतीने भाडय़ाची वसुली करतात. नाडलेला प्रवासी मात्र त्यांना बळी पडतो. त्याचप्रमाणे भाडे नाकारण्याचे प्रकारही सातत्याने होत असतात. अमुक एका भागामध्ये परवडत नाही, हे कारण देऊन तिकडे रिक्षा नेली जात नाही. परतीच्या वेळी भाडे मिळत नाही, असे कारण देऊन दिवसाही दीडपट भाडय़ाची आकारणी काही ठिकाणी केली जाते.
सर्वच शहरात समप्रमाणात रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे प्रवाशांची गैरसोय होते. शहरात नव्या रिक्षा दाखल झाल्यानंतरही त्यांच्याकडून ठराविक ठिकाणीच व्यावसाय झाल्यास प्रवाशांचा प्रश्न कायम राहणार आहे. त्यातून शहराच्या वाहतूककोंडीत भर पडण्याशिवाय काहीही साध्य होणार नसल्याचे मत काही प्रवासी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे रिक्षांची संख्या वाढविण्याबरोबरच या वाहतूक व्यवस्थेतून प्रवाशांची खऱ्या अर्थाने सोय होईल, या दृष्टीने प्रशासनाने व रिक्षा संघटनांनीही पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.