योग्य चाचणीमार्ग उभारण्याचा न्यायालयाचा आदेश धाब्यावर

वाहनांची तंदुरुस्ती चाचणी (फिटनेस टेस्ट) घेऊन संबंधित वाहन रस्त्यावर धावण्यासाठी सुस्थितीत असल्याचे तपासण्यासाठी ‘आरटीओ’त तांत्रिकदृष्टय़ा योग्य चाचणी मार्ग उभारण्याचे आदेश वर्षांपूर्वीच उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, अद्यापही नव्या चाचणी मार्गाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे जुन्या व अयोग्य चाचणी मार्गावरच वाहनांची चाचणी होत असल्याने शहरात धावणाऱ्या वाहनांचे ‘फिटनेस’ अद्यापही धोक्यात आहे.

आरटीओमध्ये योग्य चाचणीमार्गाचा अभाव असल्याने वाहनांची तंदुरुस्ती चाचणी न होताच प्रमाणपत्र दिले जात असल्याने अनेक धोकादायक वाहने रस्त्यावर धावत असल्याची बाब पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत कर्वे यांनी निदर्शनास आणून देत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामुळे सहा महिन्यांत योग्य चाचणीमार्ग सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आदेश न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच दिले होते. मागील वर्षी ऑगस्टमध्ये पुन्हा हा विषय न्यायालयासमोर आला. त्या वेळेसही चाचणीमार्गाबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने न्यायालयाने शासनाला फटकारले व योग्य चाचणीमार्ग व यंत्रणा नसेल, तर तंदुरुस्ती प्रमाणपत्र बंद करावेत, असे स्पष्ट आदेशही दिले होते.

न्यायालयाच्या आदेशामुळे परिवहन आयुक्तांनी आदेश काढून मागील वर्षी ऑगस्टमध्ये काही दिवस आरटीओतील वाहनांची चाचणी थांबविली होती. त्यानंतर न्यायालयात सहा महिन्यांची मुदत मागण्यात आली. चाचणीमार्गाच्या कार्यवाहीबाबत न्यायालयाने मुदत दिली, मात्र त्या मुदतीतही नव्या चाचणी मार्गाची उभारणी झाली नाही. पुणे आरटीओकडून आळंदी रस्ता येथील कार्यालयात वाहनांच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यात येते. या ठिकाणचा चाचणीमार्ग नियमानुसार नसल्याचे मागेच स्पष्ट झाले आहे. न्यायालयाकडे मुदतवाढ मागत चाचणी मार्गासाठी जागांचा शोध घेतला जात असला, तरी ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे जुन्या व तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसलेल्या चाचणीमार्गावरच अद्यापही वाहनांची चाचणी घेतली जात आहे.

अडीचशे मीटरचा चाचणीमार्ग हवा

जड आणि मालवाहू वाहने तसेच प्रवासी बसेसची तंदुरुस्ती चाचणी घेण्यासाठी नियमानुसार अडीचशे मीटरच्या चाचणी मार्गाची आवश्यकता असते. या चाचणीमार्गावर संबंधित वाहन निरीक्षकाने स्वत: वाहन चालवून त्याच्या ब्रेकसह इतर गोष्टी तपासणे अपेक्षित आहे. पुणे आरटीओकडे दोनशे मीटरचा चाचणी मार्ग आहे. या अपुऱ्या व तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसलेल्या चाचणीमार्गावर वाहनांची चाचणी होते. एका दिवसात शेकडो वाहनांची चाचणी घेऊन तंदुरुस्ती प्रमाणपत्र दिले जाते.