‘साहेब, मी तुमचाच’, देव्हाऱ्यातही तुमचेच छायाचित्र!
शिवसेनेच्या संपर्कात, भाजपच्या उंबरठय़ावर अशा ‘संपर्क’ मोहिमेनंतर माजी आमदार विलास लांडे यांनी, राजकीय संभ्रमावस्था संपवून पुन्हा राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ‘मी तुमचाच आहे’, अशी ग्वाही त्यांनी दिली. शरद पवार माझे दैवत आहे, त्यांचे छायाचित्र माझ्या घरात, देव्हाऱ्यातही आहे आणि अजितदादा माझे नेते आहेत, असे सांगत लांडे पुन्हा पवारांनाच शरण गेले आहेत.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून विलास लांडे मुख्य राजकीय प्रवाहापासून दूर होते. राष्ट्रवादीशी ते खूपच अंतर ठेवून होते. या कालावधीत ते शिवसेनेच्या संपर्कात होते तसेच ते भाजप प्रवेशाच्या पूर्ण तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. एक जूनला वाढदिवसानिमित्त त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तेव्हाही कोणती राजकीय भूमिका घेणार, याविषयीची संभ्रमावस्था ठेवली होती. मात्र, शुक्रवारी थेरगावात झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पक्षश्रेष्ठींपुढे भावना व्यक्त करत त्यांनी ही संभ्रमावस्था संपवली. भाषण करणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव नव्हते. मात्र, मला भाषण करायचे आहे, अशी चिठ्ठी त्यांनी दिली.
तटकरेंच्या आधी त्यांना संधी देण्यात आली. तेव्हा ‘विलास, तू कोणत्या पक्षात आहेस, असे साहेब विचारतात’, या शब्दात अजितदादांनी गुगली टाकल्याने लांडे थोडेसे दचकले. मात्र, नेहमीच्या शैलीत भाषण करत त्यांनी रंगत आणली. मी कालही तुमचाच होतो आणि आजही आहे. नगरसेवक, महापौर, आमदार असे पक्षाने भरपूर दिले. मी निष्ठा सोडलेली नाही. काही चुका झाल्या असतील. मात्र, पूर्णपणे चुकलेलो नाही. १९९२ आणि २००२ ला अपक्ष निवडून आलो, तेव्हा दादांकडेच गेलो. पक्षातील काही मंडळी मला बाहेर काढण्यासाठी टपलेली आहेत. मात्र, मी पक्षातच राहणार आहे. शरद पवार माझे दैवत आहे, त्यांचे छायाचित्र माझ्या घरातील देव्हाऱ्यातही आहे. राष्ट्रवादी विकासकामे करते आणि काहीजण त्याचे आयते श्रेय घेतात, हे थांबवले पाहिजे. स्थानिक नेत्यांची कार्यपध्दत चुकीची आहे, ती सुधारली पाहिजे.
अन्यथा चांगल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होईल. नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्या अडीअडचणी विचारल्या पाहिजे व त्या सोडवण्यासाठी तातडीने कार्यवाही केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. लांडे यांचा आतापर्यंतचा इतिहास पाहता ‘ते बोलतात, ते करतीलच’ असे नाही’. मात्र, ते पक्षात राहिल्यास निश्चितपणे राष्ट्रवादीचे बळ वाढणार आहे.