पुण्यात वाहतुकींच्या नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यावर र्निबध ठेवण्यासाठी अपघात करणाऱ्या आरोपीला शिक्षा होणे आवश्यक आहे, असे निरीक्षण एका खटल्यात न्यायालयाने नोंदविले आहे.
दुचाकीस्वाराला ठोकर देऊन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल शिवनेरी व्होल्वो चालकास एक महिना कारावासाची शिक्षा प्रमथवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.कानकदंडे यांनी सुनावली. त्या वेळी हे निरीक्षण व्यक्त केले.
महेंद्र शिवाजी जाधव (वय ३१, रा. खानापूर, जि. सातारा) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. त्यांच्या बसची ठोकर बसल्याने २५ मे २०११ रोजी विशाल मदन दरेकर (वय २५, रा. महर्षीनगर) याचा मृत्यू झाला होता. सेव्हन लव्हज हॉटेलजवळ हा अपघात झाला होता.
या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू झाला. सहायक सरकारी वकील विद्या विभुते यांनी पाच साक्षीदार तपासले व बसचालकास शिक्षा देण्याची मागणी केली. या खटल्याचा निकाल देताना कानकदंडे यांनी म्हटले, की चालकास वाहन चालविताना आपल्या जबाबदारीचे भान असायला हवे. अपघाताची घटना रात्री दोन वाजता घडली होती. रात्रीच्या वेळी रस्त्यावर गर्दी नसल्यामुळे भरधाव वाहनाचा अपघात होऊ शकतो, याची जाणीव चालकास असायला हवी. चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात एका तरुणाला जीव गमवावा लागला. तो घरातील एकमेव कमावता असल्यामुळे आरोपीच्या चुकीची शिक्षा तरुणाच्या कुटुंबीयांना भोगावी लागत आहे. पुण्यात वाहतुकींच्या नियमांचे पालन होत नसल्याने अपघाताच्या घटना वाढत आहेत. त्यावर र्निबध ठेवण्यासाठी अपघात करणाऱ्या आरोपीला शिक्षा होणे आवश्यक आहे.