वर्षभर तुलनेने स्वच्छ असणाऱ्या पुण्यातील महाविद्यालयाच्या भिंती मार्च-एप्रिल महिना उजाडल्यावर आता ‘रंगल्या’ आहेत. महाविद्यालयांमध्ये सुरू झालेल्या परीक्षांच्या पाश्र्वभूमीवर महाविद्यालयांच्या वर्गातील भिंतींवर महत्त्वाचे प्रश्न, गणिताची सूत्रे, व्याख्या अशा माहितीने या भिंती भरून गेल्या आहेत. जी कथा भिंतींचीच तीच कथा वर्गातील बाकांचीही झाली आहे.. कारण परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे.
महाविद्यालयाच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे सुविचार, मोठय़ांची वाक्यं दिसतात. विद्यार्थ्यांच्या अंगी शिक्षणाची प्रेरणा, नम्रता, सर्जनशीलता यावी हा यामागचा उद्देश. मात्र, याच भिंती परीक्षेच्या काळात पेन, शिसपेन्सिलच्या लिखाणामुळे रंगीबेरंगी झाल्या आहेत. सध्या सर्व महाविद्यालयात वार्षिक परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये महत्त्वाची व अवघड वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे भिंतींवर व बाकांवर लिहून ठेवलेली दिसत आहेत.  कॉपी करण्याचा सोपा आणि राजरोस मार्ग म्हणून या भिंती आणि बाके विद्यार्थ्यांना खुणावत आहेत.
पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये सध्या कला, वाणिज्य, विज्ञान शाखेच्या परीक्षा सुरू आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून बहुतेक महाविद्यालये या कालावधीत एक महिन्याची सुटी देतात. या सुटीचा उपयोग करून विद्यार्थी अभ्यासात मग्न झालेले दिसतात. मित्रांकडून नोट्स मिळवणे, एकत्र अभ्यास करणे अशी तयारी करण्यामध्येही विद्यार्थी आघाडीवर दिसतात. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे कॉपी करण्याच्या नव्या नव्या क्लृप्त्या शोधण्यात विद्यार्थी मग्न आहेत. अशाच विद्यार्थ्यांनी सध्या आपापल्या महाविद्यालयाच्या भिंती आणि बाकोंवर परीक्षेत महत्त्वाच्या वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, प्रमेये, व्याख्या लिहून ठेवल्या आहेत. किमान पास होता येईल इतपत तयारी विद्यार्थ्यांची झाली आहे. यामुळे वर्षभर मेहनत करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची मात्र आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे.
परीक्षा संपल्या की नव्या शैक्षणिक वर्षांच्या सुरूवातीला महाविद्यालयांकडून भिंती रंगवल्या जातात. पण या भिंतीवर दिलेला रंग हा एका वर्षांतच उडून जातो. वर्षांच्या अखेरीस परीक्षेच्यावेळी या भिंती पुन्हा रंगलेल्याच दिसतात. वर्षांनुवर्षे महाविद्यालय आणि विद्यार्थी यांच्यात हाच लपाछपीचा खेळ सुरू आहे. आता त्यातील महत्त्वाचा टप्पा पुण्यातील बहुतांश महाविद्यालयांच्या भिंतींवर पाहायला मिळत आहे.