पालकमंत्री गिरीश बापट यांनी हट्टाने दौंड आणि इंदापूरसाठी कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुणे शहरात आणखी पाणीकपात केली जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र गेले दोन आठवडे मध्य पुण्यातील पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आल्यासारखी परिस्थिती असून मध्य पुणे, तसेच कोथरूड भागात पाण्याचा दाब आणि पाणीपुरवठा कमी झाल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.
खडकवासला धरणातून कालव्यावाटे दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्याचा निर्णय शहरात वादग्रस्त ठरला आणि त्या निर्णयानंतर जरी एक टीएमसी पाणी सोडले जाणार असले तरी त्यामुळे पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ात आणखी कपात केली जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. प्रत्यक्षातील परिस्थिती मात्र तशी नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मध्य पुण्यातील बहुतेक सर्व पेठांमध्ये गेले बारा-पंधरा दिवस कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून तशाच प्रकारच्या तक्रारी कोथरूड भागातूनही येत आहेत. सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी या परिस्थितीसंबंधीचे एक पत्र सोमवारी महापालिकेला दिले. विविध भागातील नागरिकांकडून पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याच्या तक्रारी पाहता एक प्रकारची अघोषित पाणीकपात केली जात आहे, असा नागरिकांचा समज होत आहे. याबाबत चौकशी करून आपण खुलासा करावा, अशी मागणी सजग नागरिक मंचने महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
गेल्या सप्टेंबर महिन्यात पुणे शहरात पाणीकपात लागू झाल्यानंतर संपूर्ण शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्या निर्णयानुसार महापालिकेने ज्या भागांना ज्या दिवशी व ज्या वेळेला पाणीपुरवठा केला जाईल, असे जाहीर केले होते, त्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा होत होता. दौंड आणि इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय झाल्यानंतर ४ मे रोजी प्रत्यक्ष पाणी सोडण्यात आले. पुढे १८ मे पर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येत होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनुसार गेला पंधरवडा पाणी येण्याचे, तसेच पाण्याच्या दाबाचे प्रमाण कमी झाले असून त्यात सुधारणा करण्यात आलेली नाही.

संपूर्ण शहराचा पाणीपुरववठा गुरुवारी बंद
पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर जलकेंद्र येथील विद्युत व पंपिंग विषयक अत्यावश्यक देखभाल व दुरुस्तीची कामे गुरुवारी (२६ मे) केली जाणार असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार असल्याचे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे. या दुरुस्ती कामामुळे बुधवारी (२५ मे) तसेच शुक्रवारी (२७ मे) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.