असं म्हणतात की, जगातल्या जवळपास ५० टक्क्य़ांहून अधिक लोकांनी जेम्स बॉण्ड हे नाव ऐकलेलं आहे. जगातल्या इतर कुठल्याही चित्रपटाला बॉण्डपटांइतकी लोकप्रियता मिळालेली नाही. जेम्स बॉण्ड ऊर्फ ००७चे आजपर्यंत २३ चित्रपट आलेले आहेत. १९६२ साली ‘डॉ. नो’ हा पहिला चित्रपट आला तर २०१२ साली ‘स्काय फॉल’ हा २३वा चित्रपट आला. यातील सुरुवातीचे बॉण्डपट इयान फ्लेमिंग या ब्रिटिश लेखक-पत्रकाराच्या कथा-कादंबऱ्यांवर बेतलेले आहेत. त्याच्या ‘कॅसिनो रॉयल’ ते ‘ऑक्टोपसी अँड द लिव्हिंग डे लाइटस’ अशा १२ कादंबऱ्या व दोन कथा १९५३ ते ६६ या काळात प्रकाशित झाल्या. फ्लेमिंगचा मृत्यू १९६४ मध्ये झाला. त्यानंतर जेम्स बॉण्ड सीरिजचा पिता म्हणून किंग्जले अमिस यांना ग्लिडरोज पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेने पाचारण केले. त्यानुसार त्यांनी ‘कर्नल सन’ ही कादंबरी रॉबर्ट मर्खाम या टोपणनावाने लिहिली. पण पुढील कादंबऱ्या स्वत:च्याच नावाने लिहिल्या. त्यानंतर ख्रिस्तोफर वूड, जॉन गार्डनर, रेमंड बेन्सन, सॅबॅस्टियन फॉल्क्स, जेफ्री डेवर, विल्यम बॉयड या सात लेखकांनी बॉण्ड सीरिजमधल्या कादंबऱ्या-कथा लिहिल्या. त्या सर्वावर बॉण्डपट आले. तेही जगभर तुफान गाजले. या काळात जसा जेम्स बॉण्डचा पिता बदलत गेला तसे चित्रपटांत त्याची भूमिका करणारे शॉन कानरी, जार्ज लेझांबी, रॉजर मूर, टिमोथी डाल्टन, पिअर्स ब्रॉस्नन आणि डॅनिअल क्रेग असे अभिनेतेही बदलत आले आहेत. नुकतीच बॉण्डचा नवा, म्हणजे आठवा पिता म्हणून अँथनी होरोवित्झ यांच्या नावाची घोषणा झाली आहे. पुढील वर्षी त्यांची पहिली कादंबरी प्रकाशित होईल. आजतागायत बॉण्ड कादंबऱ्यांची दहा कोटींहून अधिक प्रतींची विक्री झाली आहे. त्यामुळे आजवर किशोरवयीन गुप्तहेर कादंबऱ्या लिहिणाऱ्या होरोवित्झना बॉण्ड कादंबरी पेलवते की नाही आणि तिच्या विक्रीत ते किती भर घालतात ते लवकरच कळेल.