काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी हे अबोल म्हणून प्रसिद्ध आहेत. ते जे काही थोडेफार बोलतात, तेव्हाही मनातले सगळे सांगून टाकत नाहीत. परंतु लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडाल्यानंतर हे विपरीत कसे घडले, याचा अभ्यास करून पुढील दिशा ठरवण्यासाठी काही सूचना देण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी याच अँटनींची निवड केली. सोनियानिष्ठ  अशी ख्याती असणारे अँटनी काय अहवाल देतील, अशी शंका अनेकांना होती. या शंकांचे निरसन त्यांनी मोठय़ा खुबीने आणि क्लृप्तीने केले आहे. पोपट तर मेला आहे, पण राजाला तसे स्पष्टपणे सांगता तर येत नाही, अशी जी अवस्था असते, अगदी तशीच अवस्था अँटनी यांचीही झाली. त्यामुळे सरळ विषयाला हात न घालता, पक्षाच्या भीषण आणि ऐतिहासिक पराभवाला ‘चुकीच्या उमेदवारांची निवड’ असे कारण त्यांनी शोधून काढले. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागण्याच्या अगोदरपासूनच राहुल गांधी यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट करण्याच्या हालचाली करण्यात आल्या आणि निवडणुकीची सर्व धुरा त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली. पक्षाच्या उपाध्यक्षपदासाठी याच अँटनी यांनी राहुल यांचे नाव पुढे केले होते. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत संपूर्णपणे राहुल यांचाच वरचष्मा राहील, अशी तजवीज तेव्हाच करून ठेवण्यात आली होती. निवडणूक संपेपर्यंत काँग्रेसमधील जे नेते राहुल यांची आरती ओवाळण्यात मग्न होते, ते निवडणूक संपताच वेगळी भाषा बोलू लागले. काँग्रेस ही एक चळवळ आहे आणि तेथे सामूहिक नेतृत्वालाच महत्त्व असते, निवडणूक निकालाची जबाबदारी ही कुणा एकाची नसून सर्वाची आहे, अशी ही वक्तव्ये तेव्हाही सामान्य कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकणारी होती. निकालानंतर पराभवाची सारी जबाबदारी सोनिया यांनी स्वत:वर घेतली, तरीही कार्यकर्त्यांचे त्यामुळे समाधान होत नव्हतेच. अँटनी यांनी काँग्रेसच्या पराभवाची मीमांसा करणाऱ्या अहवालात, प्रत्यक्षपणे राहुल गांधी यांचे नाव न घेता, अपयशाचे सारे खापर त्यांच्याच डोक्यावर फोडले आहे. त्या अर्थाने हा अहवाल कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवणारा आहे. उमेदवारी वाटपात झालेला गोंधळ आणि कमकुवत प्रचार हे अपयशाचे प्रमुख कारण असल्याचे या अहवालात नमूद आहे. गेली काही वर्षे सोनिया गांधी पक्षाच्या विविध स्तरांवरील नेत्यांशी संपर्क साधताना ‘एकदा राहुलशीही बोलून घ्या’, असे हमखास सांगत असत. गेल्या काही दिवसांत त्यांनी हे सांगणे बंद केले आहे. आता पुन्हा राहुलच, की सोनिया की प्रियंका अशा चर्चेत सध्या काँग्रेसजन मश्गूल असले, तरीही महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर यांसारख्या महत्त्वाच्या राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबाबत ते सारे अतिशय सावधपणे प्रतिक्रिया देताना दिसतात. अँटनींनीच यापूर्वी राहुल यांचे पक्षातील स्थान पक्के करण्यासाठी पुढाकार घेतल्याने, तोंडदेखले का होईना सोनिया आणि राहुल वगळता पक्षातील कुणीही प्रभावी प्रचार केला नाही, असे म्हणणे त्यांना भागच होते. अर्थात पराभवातून बाहेर पडण्याची मानसिक तयारी करण्यासाठी अँटनी यांचा हा अहवाल कितपत उपयोगी पडेल याबद्दल शंका असली, तरीही यापुढील निवडणुकांमधील राहुल गांधी यांच्या भूमिकेबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण करण्यास तो मदत करेल, अशी काँग्रेसजनांची भावना आहे. प्रियंका यांना रॉबर्ट यांचा अडसर आहे, तर राहुल यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीच मर्यादा आहे. अशा स्थितीतही सोनिया यांची पक्ष आपल्या हातून सोडण्याची तयारी नाही. काँग्रेसमध्ये असलेले व्यक्तिपूजेचे स्तोम अँटनी यांचा अहवाल कमी करू शकेल, अशी आजची तरी अवस्था नाही.