ती सचिन तेंडुलकरची चाहती आहे.. पण नुसतीच चाहती नाही, तर त्याच्यासारखीच उत्तुंग कामगिरी करण्याचं तिचं ध्येय आहे.. आणि त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही! ..ही आहे केंद्रीय लोकसेवा परीक्षेत महाराष्ट्राचा ठसा उमटवणाऱ्या अबोली सुनील नरवणे हिच्या जिद्दीची कहाणी. राज्यात ती पहिली आली आहे, तर देशात तिला ७८वा क्रमांक मिळाला आहे.
देशातील चार ते पाच लाख विद्यार्थी दरवर्षी लोकसेवा परीक्षा देतात. भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न ही परीक्षा देणारा प्रत्येक जण पाहत असतो. मात्र दरवर्षी परीक्षा देणाऱ्यांपैकी जेमतेम एक टक्का विद्यार्थीच आपले ध्येय गाठू शकतात.. ते काही नशिबाच्या भरवशावर नाही. या विद्यार्थ्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांचे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आणि त्याला आत्मविश्वासाची जोड! याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अबोली. अर्थशास्त्रात एम.ए. केलेल्या अबोलीने आपले कथ्थक नृत्याचे शिक्षणही सुरू ठेवले. त्याच वेळी कठीण समजल्या जाणाऱ्या तमीळ भाषेतील लय आणि त्याचे ऐतिहासिक स्थान तिला खुणावत होते. तिने तमीळ भाषाही आत्मसात केली आहे. ‘सचिन तेंडुलकर खूप आवडतो. त्याच्यावर टीका झाली तरी तो कधीही डगमगला नाही. त्याने आपल्या कामातून उत्तर दिले. माझ्यासाठी तीच प्रेरणा होती,’ असे अबोली सांगते.
अबोली मूळची पुण्याचीच. वडील सुनील नरवणे र्मचट नेव्हीमधून निवृत्त झाले असून आई डॉ. मीनल नरवणे या ‘यशदा’ येथे कार्यरत आहेत.  शाळेत असल्यापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याचे अबोलीचे ध्येय होते. हुशार असूनही शालेय शिक्षणानंतर अबोलीने कला शाखेला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. फग्र्युसन महाविद्यालयातून अर्थशास्त्रात एमए केले. त्या वेळी परीक्षेची तयारीही सुरूच होती. गेल्या वर्षीही अबोलीची प्रशासकीय सेवेत निवड झाली होती. त्या वेळी १६३वा क्रमांक मिळवून भारतीय महसूल सेवेत ती दाखल झाली होती. मात्र भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे तिने या वर्षीही परीक्षा दिली होती. ‘गुणवत्ता नसेल तरी कष्ट करून यश मिळवता येते, मात्र कष्ट करण्याची तयारीच नसेल तर गुणवत्ता असूनही उपयोग होत नाही,’ या आईने दिलेल्या कानमंत्रातच माझ्या यशाचे श्रेय आहे, असे अबोली सांगते. प्रशासकीय सेवेतील स्थान मिळवण्याचे स्वप्न पूर्ण झाले असले, तरी यापुढे देशाच्या सर्वोच्च सेवेत पारदर्शी काम करण्याचे आव्हान पेलण्यासाठी अबोली आता सज्ज आहे.