रत्नांग्रीसूर्याला केल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला अन् तो माफी मागता झाला हे चांगलेच झाले असे म्हणावयास हवे. मात्र, यानिमित्ताने राष्ट्रवादीकारांचीही झोप उडू शकते याची जाणीव या महाराष्ट्रास, म्हणजे अर्थातच आम्हास झाली. ती झाल्याच्या परमानंदात आम्हीही उत्साहाने काही काळ जागलो.
रत्नांग्रीसूर्य जे की भास्करराव जाधव यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. राष्ट्रवादीचे अध्यक्ष रा. रा. शरदचंद्रजी पवार या आपल्या प्रमुखाची रात्रीची झोप हराम करण्याचे पाप रत्नांग्रीसूर्य जाधव यांच्याकडून घडले, ते क्षम्य नाही. आपल्या कन्या आणि पुत्राचे दोनाचे चार होत असताना रत्नांग्रीसूर्यानी जी बहार उडवून दिली त्यामुळे समस्त महाराष्ट्राचेच डोळे दीपले. कोकणी माणूस इतके दिवस सगळय़ातच मागे होता. मग तो भ्रष्टाचार असो की आणखी काही वादग्रस्त प्रकरणे. जनाब अब्दुल रेहमान अंतुले यांच्यानंतर कोकणवासीयास इतके तेज:पुंज नेतृत्व कधीच मिळाले नाही. आता कोकणाचा हा बॅकलॉग नियतीने घाऊकरीत्या भरून काढला. नारायणराव राणे, सुनीलजी तटकरे आणि आता रत्नांग्रीसूर्य भास्करराव जाधव अशी एकापेक्षा एक पॉवरफुल नररत्ने कोकणाच्या मातीने महाराष्ट्राला दिली. त्यामुळे समस्त राज्यास धन्यधन्य झाल्याची भावना दाटून आली आहे. तेव्हा या कृतकृत्यतेच्या भावनेत या रत्नांग्रीसूर्यानी आपल्या चिरंजीवांच्या विवाहाचा घाट घातला. वास्तविक रत्नांग्रीसूर्यास तशी समारंभांची तीव्रच हौस. नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात अशाच जेवणावळी घालून साहित्यसंस्कृतीच्या विकासास हात लावण्याचा त्यांचा मानस होताच. तसा तो त्यांनी बोलूनही दाखवलेला होता. तेव्हा त्यांना त्यांच्याच पक्षातले सुनीलजी आडवे आले. त्यामुळे त्यांना हात आखडता घ्यावा लागला. वास्तविक त्या वेळी त्यांना ती संधी मिळाली असती तर आता कदाचित त्यांनी लग्नातील पान कमी ठेवले असते. त्या वेळी त्यांना पंगती मांडता आल्या असत्या तर साहित्यशारदाही तृप्त झाली असती आणि त्या शारदेच्या दरबारी आपली काव्यलेखनादी कला पेश करण्यासाठी येणाऱ्या लेखकूंनीही तृप्तीचे चार ढेकर दिले असते. असो. तेव्हा जे साध्य करता आले नाही, ते रत्नांग्रीसूर्यानी आता करून दाखवले. मुळात कोकणात विवाह असो वा अन्य काही. सणासमारंभात असते काय? अळूचे फदफदे नी जास्तीतजास्त जिलबीची मरतुकडी कडी. तेव्हा हे सोडून आपण काहीतरी भव्यदिव्य करावे असे रत्नांग्रीसूर्याच्या मनाने घेतले आणि त्यांच्या स्वप्नांना साथ देण्यास सरकारी कंत्राटदार समर्थ असल्याने त्यांनी हा एवढा मोठा घाट घातला. प्रसारमाध्यमांच्या वखवखलेल्या कॅमेऱ्यांनी तो जरा जास्तच टिपला. मुदलात कोकणातून बातमीचाही तसा दुष्काळ. काजूच्या बोंडांवर पडलेली अळी नाहीतर करपलेला मोहर किंवा पावसाळय़ात घसरणारी कोकण रेल्वे याशिवाय कोकणातून बातम्या त्या काय येणार. तेव्हा तेथील बातमीदारांच्या हातांवर आणि कॅमेऱ्यांच्या लेन्सांवर बुरशीची पुटे चढलेली. ती घालवण्यासाठी त्यांना रत्नांग्रीसूर्याच्या घरच्या विवाह सोहळय़ांची संधी मिळाली. ती त्यांनी साधली आणि या विवाहाचे रसदार वृत्तांकन साऱ्या महाराष्ट्राला दाखवले. त्यामुळे समस्त महाराष्ट्राचे मनोरंजन तर झालेच पण त्यामुळे कोकणाने किती प्रगती केली आहे त्याचेही यथार्थ दर्शन झाले. तशीही महाराष्ट्रातील जनता दुष्काळाने खपाटीला गेलेल्या विहिरी आणि करपलेल्या माणसांचे आणि जमिनींचे चित्रण पाहून नैराश्याच्या गर्तेत सापडली होती. त्यांच्या मनाला हुरूप आणण्याचे फार मोठे कार्य रत्नांग्रीसूर्याघरील विवाह सोहळय़ाच्या दर्शनाने केले. आपणच जणू त्या विवाह सोहळय़ांतील पंक्तीस हजर राहून आडवा हात मारीत आहोत असा भास तमाम मऱ्हाटी बांधवांस झाला. परंतु तोच पाहून जाणते राजे जे की शरदचंद्रराव पवारजी अस्वस्थ झाले आणि अशी उधळपट्टी करणाऱ्यांस रागेभरते झाले. विवाहात उठणाऱ्या पंक्ती, तो शाही थाट, राजवाडय़ाच्या पाश्र्वभूमीवरचा डामडौल आणि स्वर्गात मारल्या जाणाऱ्या गाठी घट्ट बसल्याचा आकाशातील आतषबाजीने वर पोहोचवलेला निरोप यामुळे राष्ट्रवादीकार पवार साहेबांचा जीव व्याकूळ झाला आणि त्याच वेळी मराठवाडा आदी परिसराला बसणाऱ्या दुष्काळाच्या झळांची सय येऊन ते अस्वस्थ झाले. तसे पाहू गेल्यास मराठवाडा वा तत्सम परिसरात दुष्काळ नवीन नाही. वाटेल त्याच्या धरणातले पाणी ओढून, हवे तसे आणि तितके बांध आपल्या शेताकडे वळवून ऊस लावून सहकाराचा मळा फुलवणारे दांडगेश्वर असे नेतृत्व या परिसरातून आले नाही. तेव्हा त्या परिसराचा विकास होणार कसा? या परिसरातून जे नेते आले, म्हणजे शिवराज पाटील, कै. विलासराव देशमुख वा आदर्श अशोक चव्हाण हे डोक्यावरचा केसाचा कोंबडा कुरवाळण्यातच धन्यता मानणारे निघाले. जमिनीत घाम गाळून त्या घामाची दाम चौपट वसुली करण्याची पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या भाऊबंदांची कला त्यांनी काही अवगत करून घेतली नाही. तेव्हा या परिसराचा विकास होणार कसा आणि तो दुष्काळातून बाहेर पडणार कसा? अशा परिसरास दुष्काळाने ग्रासावे यात नवल ते काय? सबब मथितार्थ इतकाच की या परिसरातील जनतेस तशी दुष्काळाची सवय असतेच. तेव्हा त्यांच्या हालअपेष्टांमुळे इतका जीव व्याकूळ करून घेण्याचे कारण नसते. पण तरी तो शरदरावजी पवार यांचा झाला. आता आपले प्रमुख हे जाणते राजे आहेत आणि त्यांचे हृदय जनतेच्या हालअपेष्टांमुळे विकल होऊ शकते याचे भान रत्नांग्रीसूर्याना राहिले नाही आणि त्यामुळे त्यांनी आपल्या चिरंजीवांच्या लग्नाचा इतका भव्य घाट घातला. त्याची दृश्ये पाहून शरदरावजी पवार यांना झोप आली नाही. तसे त्यांनी बोलून बोलून हात दुखवून घेणाऱ्या वृत्तवाचकांसमोर बोलून दाखवले. परिणामी रत्नांग्रीसूर्याना केल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि त्यांना माफी मागावी लागली.
त्यांचा आम्ही निषेध करतो तो यासाठीच. पवार साहेबांची झोप मुळातच कमी. मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही त्यांचे काम सुरूच असते आणि पहाटे पूर्वेस लालिमा पसरण्यापूर्वी साहेब सुस्नात होऊन वृत्तपत्रादी वाङ्मय पचवून प्रसन्नचित्ताने प्रजेस सामोरे जाण्यासाठी तयार असतात. तेव्हा इतकी कमी झोप असलेल्याची उरलीसुरली झोपही घालवणे हे महापाप म्हणावयास हवे. ते रत्नांग्रीसूर्याकडून घडले. खरेतर माफी मागण्याबरोबर रत्नांग्रीसूर्यानी या निद्रानाशाची कारणेही शोधून काढल्यास त्यांचेही डोळे रात्ररात्र छताचे निरीक्षण करण्यात मग्न राहतील. नुसती विवाहातीलच नव्हे तर साऱ्या राज्यकारभारातीलच उधळपट्टीने पवार साहेब अस्वस्थ आहेत हे त्यांना मग समजले असते. राष्ट्रवादीकारांचे पुतणे जे की अजितदादा पवार यांनी नेतृत्व केलेल्या पाटबंधारे खात्यातील उधळपट्टीनेही पवारसाहेब असेच अस्वस्थ झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या लागवडीखाली असलेल्या जमिनींत पाण्याची उधळपट्टी वर्षांनुवर्षे सुरू आहे. राष्ट्रवादीकारांच्या पक्षातीलच अनेक मंडळी हा बेजबाबदारपणा करीत आहेत. त्यामुळेही पवार साहेबांच्या रात्रीच्या रात्री जागे राहण्यात गेल्या आहेत. शिवाय अजितदादांचे निष्ठावान सुनीलजी तटकरे यांनीही असेच भव्यदिव्य समारंभ केले होते. त्याच अजितदादांच्या मांडलिकत्वाखालील पिंपरी चिंचवड परिसरात असे सोहळे वारंवार होत असतात. शिवसेनेतून पवार यांच्या राष्ट्रवादी कळपात दाखल झालेले गणेश नाईक यांच्या उपमांडलिकत्वाखालच्या नवी मुंबईचे उपमहापौर यांनीही अशाच सोहोळय़ाचे यजमानपद भूषविले होते. त्यानेही पवार साहेबांची एक रात्र जागण्यातच गेली. शिवाय पवार साहेब हे राष्ट्रीय स्तरावरील नेते असल्याने त्यांना बारामती वा महाराष्ट्रापल्याडच्या समस्यांकडेही अधूनमधून लक्ष द्यावे लागते. देशभरात असलेला अन्नधान्याचा तुटवडा, त्यात सोनिया गांधी लादू पाहात असलेल्या जनप्रिय योजनांमुळे वाढणारा ताण यामुळेही पवार साहेबांची झोप उडत असते. इतक्या सगळय़ा व्यापातून त्यांना जरा कुठे चार क्षण आरामाचे मिळाले असते तेही रत्नांग्रीसूर्यानी छिनावून घेतले.
असो. जे झाले ते चांगलेच झाले असे म्हणावयास हवे. त्यामुळे राष्ट्रवादीकारांचीही झोप उडू शकते याची जाणीव या महाराष्ट्रास, म्हणजे अर्थातच आम्हास झाली. ती झाल्याच्या परमानंदात आम्हीही उत्साहाने काही काळ जागलो. अशी जाग येण्याचा आनंद काही औरच. तो दिल्याबद्दल आम्ही समग्र मऱ्हाटी जनतेच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाचे आभार मानतो.