बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढय़ात हजारो जणांच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपावरून विशेष लवादाने बुधवारी जमात-ए-इस्लामी या मूलतत्त्ववादी संघटनेचा प्रमुख मतिऊर रेहमान निझामी याला फाशीची शिक्षा ठोठावली. लवादाच्या या निर्णयामुळे बांगलादेशात हिंसाचाराचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाच्या न्यायमूर्तीच्या तीन सदस्यीय लवादाचे अध्यक्ष इनायेतूर रहीम यांनी निझामी याला फाशीची शिक्षा ठोठावली. निझामी याच्या गुन्ह्य़ाचे स्वरूप पाहता त्याला फाशीशिवाय अन्य कोणतीही शिक्षा देता येणार नाही, असे लवादाने स्पष्ट केले.
निझामी याच्यावर ठेवण्यात आलेले १६ पैकी आठ आरोप हे नि:संशय सिद्ध झाले आहेत. या आरोपांमध्ये बुद्धिजीवींची हत्या, मोठय़ा प्रमाणावरील हत्याकांड, बलात्कार आणि लूट यांचा समावेश आहे. शिक्षा ठोठाविण्यात आली तेव्हा निझामी न्यायालयात उपस्थित होता आणि त्याच्या चेहऱ्यावर बेदरकारपणा दिसत होता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
जोपर्यंत निझामी याला फासावर लटकविण्यात येत नाही तोपर्यंत कायद्याचे अपयश ठरेल. अत्याचार करण्यासाठी निझामी याने इस्लामचा वेगळा अर्थ लावला. त्या वेळी निझामी हा इस्लामी छात्र संघाचा अध्यक्ष होता आणि त्याने या संघटनेचे रूपांतर अल-बद्र दहशतवादी संघटनेत केले आणि हजारो जणांची कत्तल केली, असेही लवादाने म्हटले आहे.
युद्धातील गुन्ह्य़ांच्या सुनावणीप्रकरणी निझामी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. त्यानुसार तशी दाद मागण्याबाबतचा विचार सुरू असल्याचे निझामीच्या वकिलांनी सांगितले.