तरुण भारतीय वाचकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक पुस्तके आज लिहिली जात आहेत. या पुस्तकांची परीक्षणे ‘बुकमार्क’मध्ये येतीलच असे नव्हे.. पण म्हणून तशा पुस्तकांच्या लेखकांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी हे अधूनमधून प्रकटणाऱ्या मुलाखतींचे सदर..  पहिले मानकरी आहेत, ‘विक्रमादित्य कादंबरीमाले’तील ‘द गार्डियन्स ऑफ हलाहला’ या कादंबरीचे  लेखक शत्रुंजय नाथ.
बुकमार्क प्रतिनिधी : तीन पुस्तकांनी लेखकावर शिक्का बसतोच, तुम्हीदेखील ‘विक्रमादित्य कादंबरीत्रय’ लिहिणार असल्याच्या जाहिराती सुरू आहेत. किमान दोन लेखक ‘पुराणाधारित इंग्रजी’च्या शिक्क्यातून अद्याप बाहेर येऊ शकलेले नसताना तुम्ही यासाठी कसे काय तयार झालात?
शत्रुंजय नाथ : असे होऊ शकते, याची कल्पना मला आहे. पण याला अपवादही आहेत, याकडे मी लक्ष वेधेन! सर्वात मोठे उदाहरण आहे जे. के. रोलिंगचे. तिने हॅरी पॉटर कादंबरीमालिका लिहिली. तरुणांमध्येच नव्हे तर आबालवृद्धांत रोलिंगला लोकप्रियता मिळाली ती हॅरी पॉटरसाठीच. तरीही, नवे पुस्तक तिने निराळय़ा विषयावर लिहिले आणि तेही यशस्वी झालेच.
माझ्याबाबत सांगायचे तर, माझे ‘कराची डिसेप्शन’ हे पहिले पुस्तक पुराणाधारित नव्हते. कल्पनाविलासही त्यात कमी होता. ‘कराची डिसेप्शन’मध्ये हेरगिरीची कथा होती. आता पुराणकथांचा आधार. याप्रकारचे वैविध्य यापुढेही मी देऊ शकेन.
बु.प्र. : हिंदू पुराणकथांचा खप वाढला आहे, किंवा अशा पुस्तकांची चलती आहे, याची कारणे काय असावीत?
श. ना. : पुराणांमधील आणि महाकाव्यांमधील पात्रे भारतात  परिचयाची असतात. ती कशी वागणार, हे जणू ठरलेले असते. माझ्याही कथेत नारद, उर्वशी, हिरण्याक्ष आदी पात्रांचा आधार आहे तो तेवढय़ापुरताच. कथा मात्र माझी, स्वतंत्र आहे. त्या अर्थाने, हे हिंदू कथांचे पुनर्कथन नाही.
बु. प्र. : हिंदू महाकाव्यांमध्ये नैतिक प्रश्नांची मांडणी आणि उकलही अगदी वैशिष्टय़पूर्णरीत्या दिसू शकते. तुमचे पुस्तक – किंवा तुमच्या कादंबरीची कथा ही ‘फँटसी’ आहे.  अशा कल्पनाविलासी कथांमधून नैतिक बाजू कितीशी उलगडणार?
श. ना. :  मानवी स्वभाव आणि वर्तन यांवर प्राचीन कथा प्रकाश टाकतात, हे खरे आहे. किंबहुना म्हणूनच, मी विक्रमादित्याच्या कहाणीतून काही तपशील उसने घेतले आहेत. महत्त्वाचा भाग असा की, योग्य आणि अयोग्य, चूक आणि बरोबर- नैतिक आणि अनैतिक, असे ठराविक साचे कोणत्याही काळात, वास्तव जीवनासाठी तयार करता येत नाहीत. माणसाच्या परिस्थितीगणिक उत्तरे बदलतात, त्यामुळे वास्तव धूसर असते. माझ्या कादंबरीत्रयीत, ‘द देवाज्’ हा समूह नेहमी योग्य प्रकारेच वागतो असे नव्हे. ‘द देवाज्’ आणि ‘द असुराज्’ या दोन्ही समूहांत योग्य आणि लबाड वर्तन दिसेल, असे कथानक आहे.  राजा विक्रमादित्याचे नऊ दरबारी-जन, नऊ गुणांची प्रतीके आहेत. हे गुण माझ्या कादंबऱ्यांच्या कथानकांत उलगडत जातील. मात्र चांगले काय आणि वाईट काय हे वाचकांनीच ठरवायचे आहे.
बु. प्र. : हे वाचक कोण? विविध वयाच्या वाचकांना तुमच्या या पुराणांवर आधारित ‘देवाज्’- ‘असुराज्’च्या कथा आवडतील का?
श. ना.  : ज्याला चांगली गोष्ट चांगल्या प्रकारे सांगितलेली आवडते, असे कुणीही माझे वाचकच. माझ्या कथांत युद्ध आहे, अ‍ॅक्शन आहे, म्हणून ती फक्त तरुणांनाच आवडेल, असे नव्हे. विक्रमादित्याचे शहाणपणही या कथेत आहेच. शिवाला विक्रमादित्याने दिलेले वचन तो कसे पाळतो, हेही आहे. ही कथानके कुणालाही भावणारी, या अर्थाने वैश्विक आहेत.
बु.प्र. : ‘मुंबईत परग्रहावरील मानवसदृश प्राणी येतात’ असे कल्पित कथानक तुम्हाला लिहायचे होते म्हणे.. त्याचे काय झाले? ते अधिक रंजक नव्हते का?
श. ना. : लिहीन, तेही कधीतरी. त्या कथेत सामाजिक- राजकीय ‘कॉमेंट’चीही बीजे आहेत. पण सध्या तरी विक्रमादित्य कादंबरीत्रयाला मी पूर्ण वेळ देतो आहे!