परीक्षेतील अपयशाने खचून जाण्याचे प्रमाण देशात इतके वाढले याचे कारण आयुष्यातील अपयशाला सामोरे जाण्याचे शिक्षण देण्याचीच आपल्या व्यवस्थेला गरज वाटत नाही. देशात रोज सात विद्यार्थी आत्महत्या करतात, ही गोष्ट शिक्षणाचा विपरीत परिणाम दर्शवणारी आहे. त्यातही महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवणे हे येथील शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढणारे आहे. आठवीपर्यंत परीक्षाच न घेण्याच्या अशैक्षणिक निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अपयश म्हणजे काय, याची जाणीवच होत नाही आणि जेव्हा थेट परीक्षेला बसण्याची वेळ येते, तेव्हा मोठीच पंचाईत होते. सिस्कॉम या पुण्यातील स्वयंसेवी संस्थेने ‘प्राथमिक शिक्षण बदलाची दिशा’ या विषयावर तयार केलेला पाहणी अहवालदेखील या बाबीवर बोट ठेवतो. अनुत्तीर्ण न करण्याच्या धोरणामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक शिक्षणाविषयी बेफिकीर झाले आहेत. याला पालकांची शिक्षणाविषयी अनास्था कारणीभूत आहे, असे हा अहवाल सांगतो. परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण का होतो, हे समजल्याशिवाय उत्तीर्ण होण्यासाठी काय करायला हवे, हे समजणे शक्य नसते. एवढय़ाशा अपयशाने थेट मृत्यूला कवटाळण्याएवढा त्रागा करणाऱ्या युवकांना आणि विद्यार्थ्यांना कोणीही आवरत नाही. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आत्महत्येसंबंधीचा तपशील पाहिल्यानंतर केवळ परीक्षेतील अपयशच नव्हे, परंतु जगण्याच्या प्रत्येक पायरीवर येणाऱ्या अडचणींना कंटाळलेल्या भारतीयांचे प्रमाण वाढते आहे, हे लक्षात येते. कौटुंबिक अडचणींना कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण सर्वात जास्त म्हणजे २४ टक्के आहे. सततच्या आजारपणामुळे येणारे अस्वास्थ्य आणि प्रचंड प्रमाणात होणारा वैद्यकीय खर्च आर्थिकदृष्टय़ा परवडेनासा होतो आणि माणसे मृत्यूला सामोरी जातात. गेल्या वर्षांत देशात रोज २४८ पुरुषांनी आणि १२१ महिलांनी (त्यात ६२ गृहिणींचा समावेश) आत्महत्या केल्याचा निष्कर्ष या आकडेवारीवरून निघतो. त्याची जी कारणे सापडली आहेत, त्यामध्ये कौटुंबिक कारणे, आजारपण याबरोबरच प्रेमभंग, गरिबी, हुंडा, परीक्षेतील अपयश, नादारी, बेकारी अशांचा समावेश आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते आत्महत्या करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला धैर्य गोळा करणे आवश्यक असते. जेव्हा एखादी व्यक्ती मरून जाण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा तिला होणारा त्रास टोकाचा असतो. देशाचे मानसिक संतुलन किती आहे, हे या आकडेवारीवरून लक्षात येते. त्यासाठी शिक्षणातच मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. शालेय जीवनापासूनच संकटांना सामोरे जाण्याच्या क्षमता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले तर किरकोळ कारणावरून थेट आत्महत्या करण्यापर्यंत कुणाची मजल जाऊ शकणार नाही. शिक्षणाने होणारे सांस्कृतिक बदलही या सगळ्या घटना कमी करण्यासाठी मदत करू शकतात. शाळेत शिकणाऱ्या मुलांना अनुत्तीर्ण होणे हा सर्वात मोठा अपमान वाटतो. आपल्याला आयुष्यात काहीच जमणार नाही, अशा निर्णयाप्रत जेव्हा विद्यार्थी येतो, तेव्हा पाठीवर मायेने हात फिरवून त्याचा प्रश्न समजून घेणारे कुणीतरी हवे असते. अशिक्षित पालक आणि नोकरी करणारे पालक अशा दोन्ही गटांत या गोष्टींकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्यामुळे शाळेत जाणारे मूल तेथे नेमके काय करते, हे त्यांना समजत नाही. सगळी जबाबदारी ज्या शिक्षकांवर सोपवली जाते, ते पोटार्थी असल्यासारखे आपली कर्तव्ये पार पाडण्यात मग्न राहिल्यामुळे कोवळ्या वयातील मुलांच्या मानसिकतेमध्ये मोठा बदल होतो. त्यातूनच आत्महत्या होतात. परीक्षा हे विद्यार्थी आणि पालक या दोघांनाही लचांड वाटत असले, तरीही विद्यार्थ्यांला आयुष्याचे प्रश्न सोडवण्यास मदत करणारी ती एक यंत्रणा आहे, या दृष्टिकोनातून या विषयाकडे पाहायला हवे.