सत्तेला पर्यायी विचारांचे वावडे असते. कारण अशा विचारांना सत्ता भिते. म्हणूनच असे विचार मारले जावेत यासाठी ती सदा प्रयत्नशील असते. त्याकरिता ती सत्ता फॅसिस्टांची असणे आवश्यक नसते. लोकशाहीवादी म्हणविणारेही असे करू शकतात. विचार दाबण्याची साधने अनेक असतात. उदाहरणार्थ बंदी घालणे, भय घालणे, छळ करणे, आपले समर्थक अंगावर सोडणे, हत्या करणे. तर हे शेवटचे साधन सबिना मेहमूद यांच्यासाठी वापरण्यात आले. सबिना पाकिस्तानच्या कराचीतील मानवतेसाठी लढणारी चळवळी कार्यकर्ती. तिची चळवळ ही वैचारिक होती.  एवढी की, कराचीसारख्या धगधगत्या शहरात ती एक कॅफे चालविते. द सेकंड फ्लोअर त्याचे नाव. एका स्वयंसेवी संस्थेचा हा कॅफे.  तसा तो महागडाच कॅफे आहे. दोन्ही अर्थानी. याचे कारण त्या कॅफेत जाणे-येणे होते ते बव्हंशी कलाकार, विचारवंत, अभ्यासक, कार्यकत्रे अशा मंडळींचे. तेथील कलादालन वा पुस्तकालयात त्यांचे कार्यक्रम, परिसंवाद, चर्चासत्रे होत. धर्मसत्ता, दंडसत्ता यांच्या पसंती-नापसंतीची पर्वा तेथे केली जात नसे. तेथे कधी आयएसआयचा पर्दाफाश करणाऱ्या ‘मिलिटरी इन्क’ या पुस्तकाच्या लेखिका आयेशा सिद्दिका यांच्याशी गप्पा मारल्या जात, कधी लष्कराच्या अत्याचारांचा भांडाफोड करणारा वृत्तपट दाखविला जाई, तर कधी व्हॅलेंटिन डेसारख्या आधुनिक सणांना होणाऱ्या विरोधाविरोधात आवाज उठविला जाई. त्यामुळे हा कॅफे, स्वत: सबिना आणि तिची स्वयंसेवी संस्था हे पाकिस्तानातील अनेकांच्या मते देव, देश आणि धर्मद्रोहीच. तशात ती मुहाजीर. असे असूनही सबिनाने तेथे शस्त्रसज्ज रखवालदार कधी नेमला नाही. तो तिच्या िहसाविरोधी उदारमतवादी निष्ठेचा भाग होता. त्या निष्ठेपायीच परवा तिला गोळ्या घालून मारण्यात आले. कॅफेमध्ये तिने एक चर्चासत्र भरवले होते. त्या कार्यक्रमानंतर आपल्या आईसमवेत कारमधून घरी परतत असताना मारेकऱ्यांनी त्या दोघींनाही गोळ्या घातल्या. आई बचावली. सबिनाचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील उदारमतवादी शक्तींना हादरा देणारी अशीच ही घटना. त्यामागे कोणाचा हात आहे? ते समजणे कठीण. परंतु पाकिस्तानी तालिबान्यांनी आपण हे कृत्य केले नसल्याचे म्हटले आहे. तेव्हा संशयाची सुई आता आयएसआयवर जात आहे. त्याची कारणे अनेक. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे सबिनाची बलुचिस्तानातील स्वातंत्र्यवादी लढय़ाप्रती असलेली सहानुभूती. आपल्या देशातील एक प्रांत फुटून निघण्याची गोष्ट करतो म्हणजे देशद्रोहच. त्यांना स्वतंत्र होण्याचा अधिकार असताच कामा नये. स्वातंत्र्य मागत असतील तर त्यांना चिरडलेच पाहिजे. कारण माणसे महत्त्वाची नसतात. त्यांची मते महत्त्वाची नसतात. जमीन महत्त्वाची असते. या राष्ट्रवादी भावनेतून सध्या बलुचिस्तानात आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कर शांतता राखण्याचे काम करीत आहे. या लढय़ाला ‘रॉ’ या भारतीय संघटनेची मदत असल्याचे बोलले जाते. तेव्हा हे काम अधिक काळजीकाटय़ाने केले जाते. त्यातून तेथील विचारस्वातंत्र्य आणि जिवंत माणसे नाहीशी होऊ लागली आहेत. त्या विरोधात आवाज उठविण्याचे काम सबिना करीत होती. त्यामुळे तिला संपविणे भागच होते. सत्तेची ती गरज होती. उदारमतवाद असाच संपविण्यात येत असतो. तो धर्मसत्तेने संपविला की दंडसत्तेने याला तसा काहीच अर्थ नसतो..