काळावर छाप सोडणाऱ्या कलावंताची पुढली पिढी शोकांतिकांच्या चक्रव्यूहात अडकण्याची उदाहरणे जगामध्ये सर्वच ठिकाणी सारखीच आहेत. आदल्या पिढीने उभारलेल्या कर्तृत्वशिखराच्या ओझ्याखाली दडपून वैश्विक नाकारलेपणाचा गंड बाळगत जगण्याची वेळ कालसम्राटाच्या वारसदाराबाबत अटळ असते. भारतीय चित्रपटसृष्टीत द्रष्टेपणाची सर्व बिरुदे लागणाऱ्या गुरू दत्त यांचे वारसदार अरुण दत्त शोकांतिकांच्या चक्रव्यूहाशी लढणाऱ्या अभिमन्यूंचेच प्रतिनिधी.
दंतकथा बनलेल्या गुरू दत्त यांनी अकाली आयुष्य संपविले, त्या वेळी अवघ्या आठ वर्षांच्या असलेल्या अरुण दत्त यांना  कोवळ्या वयातच आणखी एक झटका बसला तो आईच्या जाण्याचा. चित्रपट क्षेत्रातील टक्केटोणपे खाल्लेल्या गुरू दत्त यांनी आपल्या मुलांनी चित्रपट क्षेत्रात जाण्याबाबत तीव्र आक्षेप नोंदविला होता. मात्र अरुण दत्त यांनी चित्रपट क्षेत्रापासून स्वत:ला लांब ठेवले नाही. प्रचंड सिनेप्रेमी असलेल्या अरुण दत्त यांनी १९७८ साली गुरू दत्त फिल्म्सचा वारसा पुढे नेण्यासाठी तरुण दत्त या आपल्या भावासोबत चित्रनिर्मितीमध्ये उडी घेतली. त्यांनी ‘िबदिया चमकेगी’ नामे रेखा, विनोद मेहरा या तत्कालीन तारांकित चेहरे असलेला चित्रपटही बनविला. मात्र तो चित्रपट अल्पावधीत विस्मृतीअधीन झाला.
अरुण दत्त यांना पुढे आणखी मोठा झटका बसला, तो तरुण दत्त यांच्या आत्महत्येचा. शोकांतिकेच्या चक्रव्यूहाशी लढाई सुरू ठेवतच या सिनेभक्ताने ‘खुले आम’ हा आणखी एक चित्रपट तयार केला. चंकी पांडे, नीलम, धर्मेद्र, शम्मी कपूर या कलाकारांची अभिनय पुण्याईही अरुण दत्त यांच्या कामी आली नाही. पुण्यामध्ये त्यांनी ‘गुरू दत्त फिल्म्स अ‍ॅिक्टग अकॅडमी’ सुरू केली. चित्रपट दिग्दर्शन, संकलन आणि सिनेमॅटोग्राफी यांमध्ये आपल्या वडिलांची छबी  उतरलेल्या अरुण दत्त यांचे नाव व्हायला हवे तितके जनपरिचित झाले नाही.  गुरुदत्त यांच्या कृष्ण धवल चित्रपटांची जादू आज त्या चित्रपटांना टिकवून आहेच, पण त्याचबरोबर त्या चित्रपटांच्या प्रसाराची पणती अरुण दत्त यांनी कायम तेवत ठेवली, तेही महत्त्वाचे होते.
 पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयामध्ये ते कार्यरत होते.   आरंभकालीन चित्रपटांना गतस्मृतीत जाण्यापासून वाचविण्यासाठी ते काम पाहत होते. ‘बाज़्‍ाी’ वगळता गुरू दत्त यांच्या सर्व चित्रपटांची मालकी असलेले, अमेरिकेसह जगभर गुरू दत्त यांच्या चिरतरुण चित्रपटांना महोत्सवांमधून पोहोचवणारे, साहिब-बीबी और गुलाम या चित्रपटाला रंगीत करण्यासाठी धडपडणारे अरुण दत्त आता या जगात नसतील. त्यांच्या जाण्याने शोकांतसूर्याच्या वारसदाराची चक्रव्यूह भेदण्याची एक लढाई संपलेली असेल.

Girls sexually assaulted by bakery owner in Nalasopara
नालासोपार्‍यात बेकरीचालकाकडून लहान मुलींवर लैंगिक अत्याचार, आतापर्यंत ४ पीडितांच्या तक्रारी
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम