गुप्तवार्ता विभागात बरीच र्वष काम केल्यानंतर लिहिलेलं हे पुस्तक आहे.. ‘तुकडय़ातुकडय़ांतून आजवर मिळत गेलेल्या माहितीची संगतवार मांडणी करणे’ हा गुप्तचराला शोभणारा गुण या पुस्तकातून दिसेलच, पण.. या माहितीच्या पुढे काय आहे? ‘आतली माहिती’ हे पुस्तक देतं का?

हेरगिरीच्या आणि युद्धाच्या कथांमध्ये सर्वानाच रस असतो. शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेची सीआयए आणि सोव्हिएत युनियनच्या केजीबी (आता एफएसबी) या गुप्तहेर संघटनांनी एकमेकांविरुद्ध, तसेच विरोधी गोटातील देशांमधील राजवटी उलथवून टाकण्यासाठी जे काही उद्योग केले त्यातून या पडद्यामागील जगाविषयी कुतूहल वाढलेले असते. इस्रायलच्या मोसाद या गुप्त संघटनेच्या खऱ्या-खोटय़ा साहसकथा ऐकून आपला देशही अशा कारवाया का करत नाही असा प्रश्न कधीतरी मनात उपस्थित झालेला असतो. जेम्स बाँडच्या चित्रपटांनी ब्रिटनच्या एमआय-५ आणि एमआय-६ या हेर संघटनांबद्दल गूढ आकर्षण निर्माण केलेले असते. आपल्या देशात होणाऱ्या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर गुप्तचर संघटनांच्या यशापयशाचे गणित मांडले जाते आणि बहुतेक वेळा अपयशाचे खापर त्यांच्या माथी फोडले जाते.
पण हेरगिरी हा काही रंजनाचा विषय नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्याकडे आर्य चाणक्यापासून ते शिवाजी महाराजांचे हेर बहिर्जी नाईक यांच्यापर्यंत त्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. चांगल्या गुप्त माहितीमुळे एखाद्या देशाची सुरक्षा भक्कम केली आहे तर तिच्या अभावी देश रसातळाला गेला आहे. दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या ‘एनिग्मा कोड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांकेतिक लिपीची दोस्तराष्ट्रांनी फोड केल्याने युद्धाच्या निकालावर झालेले परिणाम जगाने पाहिले आहेत. त्यामुळे आपल्या शत्रूंबरोबरच मित्रांच्याही हेतूंची आणि तयारीची बित्तंबातमी बाळगणे महत्त्वाचे ठरते.
पण हेरगिरीचे हे जग सामान्य लोकांना वाटते तसे रंजक नसते. तर गुप्त माहिती मिळवणे, तुकडय़ातुकडय़ांत मिळालेली माहिती एकत्र करून त्याची संगती आणि अन्वयार्थ लावणे, त्याचा देशाच्या हितासाठी योग्य वापर करणे हे जिकिरीचे, किचकट आणि कौशल्याचे काम आहे. त्याबाबत सामान्यजनांना अधिकृत माहिती अभावानेच मिळते.
देशांतर्गत हेरगिरीच्या जगतावर प्रकाश टाकणारे आणि गुप्तचरांचे देशाच्या समग्र सुरक्षेसाठी महत्त्व विशद करणारे ‘इंटेलिजन्स – अ‍ॅन इनसायडर्स व्ह्य़ू’ हे अशोक कर्णिक यांचे पुस्तक उपयुक्त आहे. कर्णिक हे इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) म्हणजेच गुप्तवार्ता विभागात ३७ वर्षे सेवा बजावून १९९० साली उपसंचालक पदावरून निवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे प्रतिबिंब पुस्तकात उमटले आहे.
पुस्तकाची रचना दोन विभागांत आहे. एका विभागात कर्णिक यांनी सेवानिवृत्तीनंतर ‘फ्रीडम फर्स्ट’ या नियतकालिकात (जे त्यांचे वडील व्ही. बी. (वा. भ.) कर्णिक यांनी सुरू केले होते) लिहिलेले लेख आहेत. तर दुसऱ्या विभागात त्यांनी ठिकठिकाणी भाषणे, चर्चासत्रे असा कार्यक्रमांत भाग घेताना बोलण्यासाठी केलेली विषयवार टिपणे आहेत. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपयोगी अशा विस्तृत विषयांचा त्यात परामर्श घेतलेला आहे. त्यात भारत-चीन संघर्ष, भारत-पाकिस्तान संबंध, दहशतवाद, देशांतर्गत हेरसंस्था, आणीबाणी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नक्षलवाद, मुंबई हल्ला यापासून पुरुलिया शस्त्र प्रकरण, ऑपरेशन ब्लू स्टार, राडिया ध्वनिफिती, अण्णा हजारे आंदोलन, काश्मीर प्रश्न, तालिबान, ओसामा लादेनविरुद्ध अमेरिकेने केलेली कारवाई, काळा पैसा ते लव्ह जिहाद अशा विविध विषयांचा समावेश आहे. पुस्तकाला माजी आयपीएस अधिकारी आणि इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक (आणि कर्णिक यांचे एके काळचे वरिष्ठ अधिकारी) विद्याधर गो. वैद्य यांची प्रस्तावना आहे. वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे कर्णिक यांचे विवेचन क्लिष्ट भाषा टाळून स्पष्टपणे केलेले, मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ आहे, यात शंका नाही. लेखकाने प्रथमच या पुस्तकाचा आवाका आणि उद्दिष्ट स्पष्ट केले आहे. ‘गुप्ततेचा पडदा दूर करून काही गौप्यस्फोट करणे हा हेतू नाही’, तर देशवासीयांना ‘हेरगिरीच्या जगताची तोंडओळख करून देणे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दय़ांवर जागृती करणे’ असा हेतू आहे हे कर्णिक स्पष्ट करतात, तेव्हा केवळ कुतूहल म्हणून नव्हे, तर विषयांच्या जाणकारीसाठी हे पुस्तक वाचावे, अशी वाचकाची धारणा होते. कोणतीही बाजू न घेता सत्य वाचकांसमोर मांडणे आणि वाचकांना त्यांचे निष्कर्ष काढू देण्याची मुभा देणे ही भूमिकाही इष्टच आहे. पण इतके विषय हाताळून कोणत्याच विषयात फार खोलात न गेल्याची उणीव मात्र पुस्तकात जाणवते.
या पुस्तकात बहुतेक ठिकाणी यापूर्वी उपलब्ध असलेलीच माहिती केवळ संगतवार लावलेली दिसते. अनेक बाबतीत लेखक केवळ आजवर माहीत असलेले प्रश्नच मांडून उत्तर किंवा उपाय सुचवण्यापासून थोडय़ा अंतरावर थांबल्याचे जाणवते. त्यामुळे पुस्तकाचे स्वरूप एखाद्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांने आपल्या अभ्यासासाठी काढलेल्या टिपणांसारखे (नोट्स) झाले आहे. महत्त्वाच्या विषयावरील नोंदींचा लेखाजोखा या अंगाने ते उपयुक्त आहे यात शंकाच नाही. पण काहीसे अपुरे असल्याचेही जाणवते. त्यामुळे पुस्तकाचे जे शीर्षक आहे, त्यातील ‘अ‍ॅन इनसायडर्स व्ह्य़ू’ या भागाला पुरेसा न्याय दिला गेला आहे असे वाटत नाही. आणखी एक छोटी उणीव.. पुस्तकाचे मुद्रितशोधन फार चांगले झालेले नाही. स्पेलिंगच्या आणि व्याकरण चिन्हांच्या सहज टाळता येण्याजोग्या चुका दिसतात. पण या सगळ्यामुळे पुस्तकाचे महत्त्व कमी होत नाही.
सुरुवातीलाच लेखकाने भारत-चीन संघर्षांवर प्रकाशझोत टाकला आहे. सर्व भारतीयांच्या दृष्टीने चीनकडून १९६२ साली पत्करावा लागलेला पराभव ही अजूनही दुखरी नस आहे. त्यात पुरेशी संरक्षणसज्जता न करता पं. जवाहरलाल नेहरूंनी घाईगडबडीत राबवलेल्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’मुळे चिनी चिथावले गेले आणि त्यांनी हल्ला केला असे चित्र आजवर रंगवले जात आहे. जागतिक शांततेच्या अवास्तव स्वप्नापोटी नेहरूंनी तिबेटसारख्या मित्राचा घास चीनला दिला आणि देशाच्या सुरक्षेशी अक्षम्य खेळ केला अशी काहींची भूमिका आहे. पण कर्णिक यांनी नमूद केल्याप्रमाणे सीमा निश्चित करून तेथे सैन्य तैनात न केल्यामुळे आपण लडाख त्यापूर्वीच घालवला होता. मॅकमहॉन रेषेच्या पूर्व विभागात ‘नेफा’ (आजचा अरुणाचल प्रदेश) मध्येही परिस्थिती वेगळी नव्हती. तेथे लागू असलेल्या ‘इनर लाइन परमिट’शिवाय अंतर्गत भागात भारतीय सेनेची सोडाच पण प्रशासनाचीही उपस्थिती नव्हती. चीनने पूर्वीच तिबेट आणि लडाख गिळंकृत केले होते. ‘नेफा’ची तीच गत होऊ द्यायची नसती तर तेथे ताबडतोब भारतीय चौक्या उभारणे गरजेचे होते. पण संरक्षण करणे शक्य नसल्याने आणि नागरी जबाबदारी आहे म्हणून लष्कराने ती जबाबदारी नाकारली होती. अशा वेळी इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन प्रमुख बी. एन. मलिक यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि नव्याने भरती झालेले आयबीचे अधिकारी सीमेवरील दुर्गम चौक्यांवर तैनात केले. नंतरच्या आक्रमणात ते तग धरू शकले नाहीत, शहरी भागांत वाढलेल्या या सुशिक्षित आणि हुशार अधिकाऱ्यांना सीमेवर दुय्यम कामे दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला आणि नंतर अनेकांना शारीरिक आणि मानसिक व्याधी जडल्या हाही उल्लेख आला आहे. अशा वेळी देशाने मलिक यांचे आभार मानायचे की त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, हा प्रश्न लेखकाने उपस्थित केला आहे.
तसेच जून १९५४ मध्ये चीनशी झालेला करार आणि एप्रिल १९५५ मध्ये झालेल्या बांडुंग परिषदेतील पंचशील तत्त्वांचा पुरस्कार, लाल चीनला संयुक्त राष्ट्रसंघात कायम सदस्यत्व मिळवून देण्यासाठी केलेला पाठपुरावा या बाबी गृहीत धरूनही नेहरूंचा चीनविषयी भ्रमनिरास झाला होता आणि हिंदूी चिनी भाई भाईमधील फोलपणा कळून चुकला होता, असे लेखकाने नमूद केले आहे.  भारतीय राजदूत जीय पार्थसारथी यांच्याजवळ त्यांनी हे बोलून दाखवले होते आणि पार्थसारथी यांच्या दैनंदिनीत त्याची नोंद आहे. मात्र हे कटू सत्य नेहरू देशवासीयांसमोर स्वीकारू शकले नाहीत. तसेच ७ नोव्हेंबर १९५० रोजी सरदार वल्लभभाई पटोल यांनी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात चीनकडून असलेल्या धोक्याबाबत इशारा दिला होता, हा भागही विस्ताराने आला आहे.
दहशतवादाच्या बाबतीत त्यांचे विवेचनही मौलिक आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या हल्ल्यांतून दाखवून द्यायचे असते की सरकार त्यांच्या नागरिकांचे रक्षण करण्यास असमर्थ आहे. त्यातून नागरिकांचा सरकारवरील विश्वास डळमळीत होतो आणि दहशतवाद्यांचा उद्देश सफल होतो. त्यामुले दहशतवाद असफल करण्यात सुरक्षा यंत्रणांबरोबरच नागरिकांची आणि प्रसारमाध्यमांचीही महत्त्वाची भूमिका आहे हे अधोरेखित केले आहे.
हल्ल्यांसाठी हेरगिरी यंत्रणांना दोषी धरले जाते, पण टाळलेल्या कित्येक हल्ल्यांचे श्रेय मात्र त्यांना मिळत नाही, याकडेही लेखकाने लक्ष वेधले आहे. तसेच साम, दाम, दंड, भेदाचा वापर करून शत्रुराष्ट्राच्या हेरांना फोडणे, त्यासाठी सुंदर स्त्रियांचा वापर करून हेरांना जाळ्यात ओढणे (हनीट्रॅप), भारताच्या बाबतीतही झालेल्या अशा घटनांची उदाहरणे यांचे वर्णन रंजक आहे.   
मुंबई हल्ल्यांनंतर गुप्तचर यंत्रणांची फेररचना करणे, एनआयए (नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी), एनसीटीसी (नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर), नॅटग्रिड (नॅशनल ग्रिड) अशा उपाययोजना सुचवल्या गेल्या. त्यांच्या उपयोगितेबाबतही महत्त्वपूर्ण विवेचन पुस्तकात आहे. हेरगिरी संघटनांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी परदेशांत ‘इंटेलिजन्स ओव्हरसाइट कमिटी’सारख्या संसद सदस्यांच्या किंवा न्यायिक अधिकाऱ्यांच्या समित्या नेमल्या जातात. आपल्या देशात संसद सदस्यांचे एकंदर राष्ट्रीय सुरक्षेबाबत असलेले ज्ञान (खरे तर अज्ञान) आणि अनभिज्ञता पाहता त्याचा कितपत सकारात्मक उपयोग होईल आणि दुरुपयोग होणार नाही याची शाश्वती कशी देणार, हे प्रश्नही लेखकाने उपस्थित केले आहेत. ते महत्त्वाचे आहेत. पण एकूण पुस्तकाचे वर्णन उपयुक्त पण अपुरे असे करता येईल.

*इंटलिजन्स – अ‍ॅन इनसायडर्स व्ह्य़ू
लेखक :      अशोक कर्णिक
प्रकाशक :      फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी (फिन्स)
पृष्ठे :  २२८, किंमत :  ३०० रुपये