गेल्या गुरुवारी जळगाव रेल्वे स्थानकावर घडलेल्या एका अपघाताने अनेक नवी प्रश्नचिन्हे अधोरेखित केली आहेत. स्थानकावरून सुटून वेग घेऊ लागलेल्या एका गाडीत चढताना उज्ज्वला पंडय़ा नावाच्या महिलेचा मृत्यू झाला आणि संपत साळुंके नावाच्या तिकीट तपासनीसाच्या शांत आयुष्यात अचानक अस्थिरतेच्या लाटा उसळू लागल्या. धावत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात असताना ही महिला तोल जाऊन गाडीखाली गेल्याचे रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने टिपलेल्या प्रसंगावरून स्पष्ट झाले नसते, तर संपत साळुंके यांच्या साऱ्या भविष्यालाच कदाचित अप्रिय कलाटणी मिळाली असती. साळुंके यांनी या महिलेस गाडीत चढण्यासाठी दिलेला मदतीचा हात या महिलेच्या दुर्दैवास रोखू शकला नाहीच, उलट साळुंके यांनीच या महिलेला गाडीत चढण्यापासून रोखल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आणि कोणतीही शहानिशा होण्याआधीच जमावाने साळुंके यांना मनसोक्त चोप दिला. जमावाचे मानसशास्त्र बऱ्याच वेळा वास्तवाचे भान विसरते, हे अनेक प्रसंगांमध्ये निष्पन्न झालेले सत्य या प्रसंगातही विदारकपणे पुढे आले. तो काही तासांचा प्रसंग आता संपत साळुंके यांच्या संपूर्ण भविष्याला छळत राहणार यात शंका नाही. केवळ जमावाच्या उतावळेपणामुळे मिळालेल्या या कलाटणीतून अनेक प्रश्न पुढे आले आहेत आणि त्याची उत्तरे  संपूर्ण समाजाला शोधावी लागणार आहेत. वस्तुत: साळुंके यांनी या महिलेस धावत्या गाडीत चढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता आणि तिच्यासोबत फलाटावरून धावणाऱ्या एका नातेवाईकास बहुधा हे लक्षातही आले होते; तथापि जमावाच्या प्रक्षुब्ध मानसिकतेपुढे त्या नातेवाईकाचा समजूतदारपणाही थिटा झाला आणि साळुंके यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी न मिळता, केवळ जमावाच्या रोषाचे फटके सोसावे लागले. या प्रसंगामुळे निर्माण झालेला दुसरा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. या घटनेची बातमी प्रसार माध्यमांपर्यंत जशी पोहोचली, तशी ती समाजापर्यंत पोहोचविण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत, घटनेमागच्या वास्तवाची शहानिशा करण्याचे भानही माध्यमे विसरली.  साळुंके यांनीच तिकिटाच्या वादातून महिलेला बाहेर ढकलले, अशी बातमी पसरली. साळुंके यांनी मद्यप्राशन केले होते, असा मसाला लावून ती चटपटीत करण्याचा प्रयत्नही काही माध्यमांनी केला आणि मारहाणीमुळे खचलेल्या साळुंके यांना अटक झाली. त्यांची जामिनावर सुटका झाली असली तरी या धक्क्यातून साळुंके सावरलेले नाहीत. मदतीचा हात पुढे करण्याचीदेखील केवढी जबर किंमत मोजावी लागते, या भावनेने ते खचून गेले आहेत. अनेक रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेरे अनेकदा नावापुरतेच असतात. त्या फलाटावरील तो कॅमेरादेखील त्या दिवशी असा नादुरुस्त असता, तर काय झाले असते ही कल्पनाच थरकाप उडविणारी आहे. जमावाच्या मानसिकतेपुढे एक व्यक्ती कशी असाहाय्य होते, याची दोन उदाहरणे या प्रसंगातून पुढे आली. केवळ कॅमेऱ्याच्या कृपेने साळुंके बचावले, तर या प्रसंगानंतर जमावाच्या दबावाखाली सत्यदेखील गाडले गेले. एक असाहाय्य व्यक्ती, विवेकबुद्धी हरवलेला जमाव आणि उतावीळ माध्यमे असे त्रिकोणी चित्र या प्रसंगामुळे जगासमोर आले आहे. साळुंके बचावले असले तरी अशा प्रसंगांमध्ये वास्तवाकडे पाठ फिरविण्याची जमावाची मानसिकता कधी बदलणारच नाही का, हा प्रश्न कायमच राहिला आहे. शिवाय, मसालेदार बातमीसाठी खऱ्याखोटय़ाची तमा न बाळगता परस्परांशी जीवघेणी स्पर्धा करणारी माध्यमे कधी बदलणार, हा प्रश्नही अधोरेखित झाला आहे. हतबल माणूस, बेकाबू जमाव आणि उतावीळ माध्यमे असा विचित्र त्रिकोण समस्या अधिक चिघळवतो, एवढाच या घटनेनंतरचा बोध आहे.