बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जनता परिवारातील सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा घेतलेला निर्णय अखेर बासनात बांधून ठेवावा लागला आहे. या परिवारातील नेत्यांमध्ये असलेला कमालीचा अहंभाव आणि राजकीय सत्तेची लालसा हे त्याचे खरे कारण. गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनता दल(युनायटेड)चे जे पानिपत झाले, त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी राजीनामा देऊन जितन राम मांझी यांना स्वत:हूनच त्या पदावर बसवले. मांझी वरचढ होऊ लागताच त्यांना दूर करून पुन्हा मुख्यमंत्री होण्याची खेळी नितीश यांनी केलीच आणि त्याच वेळी, येत्या निवडणुकीत जनता परिवारातील तथाकथित समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या कल्पनेचा खेळ करून पाहायचेही त्यांनी ठरवले. हे सारे करत असताना पुन्हा मुख्यमंत्री आपणच होणार असू, तरच त्याला आपला पाठिंबा असेल, असे त्यांनी ध्वनित केले होते. नेमकी त्यालाच लालूप्रसाद यादव आणि त्यांच्याच पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी टाचणी लावली. या जनता परिवाराचे एक शिल्पकार मुलायमसिंह यादव हेही होते. त्यांना तर राष्ट्रीय स्वप्ने पडत असल्याने अशी एक मोठी मोट बांधून आपण देशात क्रांती घडवून आणू शकतो, असे वाटत होते. जयप्रकाश नारायण यांचे आपण शिष्योत्तम आहोत, असे वाटणाऱ्या या सर्वाना आपापल्या ताकदीचा अंदाज असला तरीही एकमेकांवर कुरघोडी करण्याची त्यांची खोड जात नाही. त्यामुळेच निवडणुकांपूर्वी जनता परिवार ही कल्पना गुंडाळून ठेवणेच सर्वाचे अहंकार सुखावणारे ठरणार आहे. मुलायमसिंह यादव यांच्या कुटुंबातील तेरा जण सध्या राजकारणात विविध पदांवर कार्यरत आहेत. जनता परिवार अस्तित्वात आला, तर त्यातील अनेकांवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती त्यांच्याच पक्षाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी जेव्हा मुलायम यांना सांगितली, तेव्हा जनभावनेचे कारण पुढे करत त्यांनी परिवाराच्या कल्पनेचा नाद सोडून दिला. नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर होईपर्यंत, बिहारमध्ये भाजप आणि जदयू यांनी एकत्रितपणे राज्यकारभार केला होता. येत्या निवडणुकीत भाजपला त्याची पुनरावृत्ती व्हावी, असे वाटत होते. त्यासाठी आखणीही सुरू झाली. त्याचा एक भाग म्हणून मांझी यांच्या पाठीमागे उभे राहून नीतिश यांच्यावर दबाव आणण्याची कल्पना होती. नीतिश यांच्या धूर्तपणामुळे काँग्रेसने या राजकारणात उडी घेतली आणि त्यांना जाहीर पाठिंबा देऊ केला. जनता परिवारात मांझी यांचाही समावेश व्हावा, या लालूप्रसादांच्या खेळीला नीतिश यांचे हे उत्तर ठरले. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीच्या आधारे विधानसभा निवडणुकीतील जागावाटप व्हावे, असाही लालू यांचा आग्रह आहे. तो मान्य करायचा, तर जदयूच्या वाटय़ाला कमी जागा येण्याची शक्यता अधिक. अशा स्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्यापेक्षा एकमेकांच्या पायात पाय घालून आपापली संस्थाने सांभाळणेच अधिक उचित, असा राजकारणी विचार नीतिश यांनी केला नसता तरच नवल. बिहारमध्ये मागासवर्गीय आणि मुस्लीम यांना लालू आणि नीतिश एकत्र आणू शकतात, त्याला यादवांचाही हातभार लागेल, अशी जी अटकळ होती, ती या परिवाराच्या विस्कटण्याने फोल ठरणार आहे. विवाहाच्या आणाभाका घेताना, या सगळ्या नेत्यांना अहंगंडापायी आधीच घटस्फोट घेणे सोयीचे वाटले. याचा परिणाम म्हणून बिहारमध्ये तिरंगी लढती होतील आणि त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता अधिक.