समयोचित कव्हरस्टोरी

जागतिक आणि देशांतर्गत सुरू असणाऱ्या आर्थिक आणि राजकीय घडामोडींचा समयोचित असा आढावा घेणारे दोन्ही लेख वाचले. देशातील सत्तांतरानंतर अच्छे दिनांची वाट पाहणाऱ्या अनेकांना थेट उत्तर आणि अच्छे दिन आणणाऱ्यांना जाब विचारणारे असे हे प्रबोधनात्मक लेख होते. महत्त्वाचे म्हणजे आपण आपल्याकडे असलेली अर्थनिरक्षरता आणि राजकीय लुडबुड यामुळे सद्य:स्थितीकडे फारसे गांभीर्यांने पाहीलेच जात नाही. किंबहुना सध्या केवळ चर्चा, घोषणा आणि विरोधाचा टिपेचा सूर यातच सारी व्यवस्था वाहून जाते की काय, असे वाटत आहे. सारेच राजकीय पक्ष एकाच तराजूत तोलण्यासारखे आहेत. खरं तर मोदींच्या अनेक स्वप्नांना जागतिक तेलबाजारातील तेलदराच्या घसरत्या किमतीनीच सध्या काही प्रमाणात तरी सावरून धरले आहे. त्यांना याची जाणीव असेलच, पण त्याचे रूपांतर धोरणात्मक निर्णयात फारसे दिसत नाही. म्हणूनच मंदीतील संधी साधणं गरजेचे असल्याचं लेखातील प्रतिपादन पटते. त्यामुळेच अच्छे आहेत कोठे, हा प्रश्न सर्वानाच पडतो.
अनिकेत जोशी, औरंगाबाद.

विज्ञानाचे महत्त्व कळेल तो सुदिन..
कधी कधी वाटते की आपली भारतीय मानसिकता तद्दन ढोंगी आहे. तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती करत एकीकडे मंगळावर पाऊल टाकायचं आणि दुसरीकडे वाटेवरच्या देवतेला त्यासाठी नवस बोलायचा. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विज्ञान भरुन राहिले आहे. आपल्या जगण्याच्या व्यापात त्याच्याशिवाय पानदेखील हलत नाही. विज्ञानाचे हे सारे फायदे ऐहिक सुखासाठी घ्यायचे, पण दुसरीकडे विज्ञानावर विश्वास न ठेवता बाबा-बुवांच्या भजनी लागायचे. हेच सारं काही सायन्स काँग्रेसमध्ये दिसून आलं. विज्ञानाच्या क्षेत्रात पुरावे, परीक्षण, परिमाण अशा अनेक कसोटय़ांवर घासूनपुसून एखादी घटना सिद्ध होते. पण हे सारं काही ध्यानात न घेताच केवळ लोकानुनयाई भूमिका घेत आंधळेपणाने फालतू मुद्दय़ांना मोठे करायचे हेच या परिषदेच्या निमित्ताने दिसून आले. जग एकीकडे जातंय आणि आपण तिसरीकडेच जातोय की काय असे वाटत होतं.
अंजली देसाई, ठाणे.

जबाबदारी आल्यावर कॅप्टन हॉटही कूल होईल
१६ जानेवारीच्या अंकातील मुखपृष्ठकथा ‘कॅप्टन कूल ते कॅप्टन हॉट’ शब्द न् शब्द वाचली. कॅप्टन कूल म्हणजे महेंद्रसिंग धोनी याने आपल्या शांत, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध, सांघिक खेळातून भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस मिळवून दिलेले आहेत. धोनी हा मैदानातील परिस्थितीचा अभ्यासक असल्याने त्यानुसार त्याने गोलंदाज व क्षेत्ररक्षकांना वापरून सामने जिंकले. विराट कोहली हा हॉट आहे, परंतु धोनीच्या निवृत्तीनंतर दुसरा कोणी कर्णधारपदाच्या स्पर्धेत नाही. त्यामुळे कर्णधारपदाची माळ कोहलीच्या गळ्यात पडली, ते योग्यच आहे.
आता कोहलीवर जबाबदारी आल्यामुळे तो निश्चितच छान खेळेल, यात शंका नाही. त्याच्याबाबतीत असे म्हणता येईल की ‘ कोहली जरी आहे हॉट, खेळेल मात्र कूल शॉट’..
कोहलीच्या अंगी नेतृत्वक्षमता जरूर आहे. कारण त्यांनी अनेक सामने प्रभारी कर्णधारपदावरून जिंकून आपली क्षमता दाखवली आहे. कोहली आपल्या सहकाऱ्यांचा विश्वास संपादन करून भारतीय क्रिकेटला उज्ज्वल यश मिळवून देईल एवढे निश्चित.
धोंडीरामसिंह ध. राजपूत, वैजापूर, जि. औरंगाबाद.

धोनीचा निर्णय धक्कादायक, पण योग्यच
१६ जानेवारीच्या अंकातील ‘कॅप्टन कूल ते कॅप्टन हॉट’ ही कव्हरस्टोरी वाचली. धोनीची निवृत्ती सर्वानाच चकित करून सोडणारी होती. पण संघाच्या दृष्टीने विचार केला तर धोनीने कर्णधारपद सोडले ते ठीकच होतं, एकतर यश त्याच्यापासून दूर चालले होते व त्याची फलंदाजी पण ठीक होत नव्हती. पण त्याने खेळापासून दूर जायला नको होते. कारण सध्याची भारतीय फलंदाजी ठीक होत असली तरी मधली फळी वारंवार कोसळत असते. मधळी फळी सांभाळून घेऊन व शेवटच्या खेळाडूला बरोबर घेऊन फलंदाजी करणे धोनीला शक्य असायचे व तसे त्याने अनेक वेळा केलेदेखील आहे. त्यामुळेच धोनी संघात असणे गरजेचे होते. धवन, पुजारा, रैना, शर्मा हे सगळे बेभरवशाचे फलंदाज आहेत. त्यांच्या उपस्थितीत मधली फळी वारंवार कोसळली आहे. आता धोनी नाहीच म्हटल्यावर निदान यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिक किंवा उत्तप्पा यांना एक संधी द्यायला हरकत नाही. अर्थात कोहली हुशार व धोरणी खेळाडू आहे, तो निश्चितच एक उत्तम कर्णधार म्हणून सिद्ध होईल.
डॉ. अनिल पी. सोहोनी, दोंडाइचा (धुळे).

खरंच मुंबई समृद्ध होईल का?
१९ डिसेंबरच्या अंकातील ‘समृद्ध मुंबईसाठी’ हा मथितार्थ वाचला. मुंबई शहर जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाणार असल्याचे वक्तव्य केले. तसेच मुंबईसाठी स्वतंत्र मुख्याधिकारी नेमण्याचा विचार मांडला गेला. मुंबईच्या विकासाच्या वादाला नवा उजाळा मिळाला. हे वाद नवीन नाहीत. तर ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून त्यांचा ऊहापोह झालेला आहे. परंतु यातून होणारे आरोप-प्रत्यारोप कोणी रोखू शकत नाही. मात्र असे वाद निर्माण करून मुंबईच्या जटिल समस्या खरोखरच मार्गी लागणार आहेत काय, हा खरा कळीचा मुद्दा आहे. कारण गेल्या काही दशकांत मुंबईच्या समस्यांवर उपाययोजना केल्या गेल्या. त्यातून मुंबईचे प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचे होत गेले. लोकसंख्येचा प्रश्नसुद्धा गहन होत गेला. शिवाय इतर राज्यांतील लोंढे मुंबईत येतच आहेत. मुंबईचा विकास व्हावा याबद्दल कोणाचे दुमत नाही. पण ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ ठरेल असे काही घडू नये. परंतु मुंबईचा विकास करण्यापूर्वी देशातील मोठय़ा शहरांचासुद्धा विकास केला तर, मुंबई शहर जागतिक दर्जाचे होईल. मुंबईला मोकळा श्वास घेता येईल. तसेच आपण लेखात म्हटले आहे की, सरकारी मालकीच्या गिरण्यांच्या जमिनीवर सरकारने विकास करायला पाहिजे होता. आपले म्हणणे योग्य आहे. परंतु आपल्या देशातील आतापर्यंतची सर्व सरकारे ही सर्वसामान्य जनतेपेक्षा भांडवलदारांचाच विकास करणारी आहेत. आताचे भाजप सरकार हे गरिबांपेक्षा भांडवलदारांच्या बाजूचे आहे.
सुनील कुवरे, शिवडी, मुंबई.

भविष्य विशेषांक कशासाठी?
‘पावलोपावली विज्ञान’ आणि नंतर ‘कॅप्टन कूल’ हे दोन्ही लोकप्रभाचे अंक लोकप्रभाच्या परंपरेला साजेसे झाले. ‘लोकप्रभा’ सतत नवनवीन विचारांना योग्य दिशा देत असते. मात्र दर शुक्रवारी अंकाची आतुरतेने वाट पाहणारा मी ‘भविष्य विशेषांक’ पाहिल्यावर ‘लोकप्रभा’कडून हा विशेषांक कसा निघू शकतो, ही कल्पना करू शकलो नाही. ‘लोकप्रभा’सारख्या अंकाची समाजप्रबोधनासाठी खरेच गरज आहे. दाभोलकर गेल्यानंतर ‘अंनिस’कडून काही भरीव, ठोस होताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना नवीन सरकारच्या गर्दीत तथाकथित भोंदू साधूंना भगव्या कपडय़ात उपस्थित पाहून मन हादरले. भराडीदेवीच्या दर्शनाला निवडणूकीपूर्वी जाणारे उद्धवजी ‘आमचे सरकार आल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करू,’ असे जाहीरपणे सांगत होते. हे देवालाच मंजूर नसावे. म्हणूनच योग्य ते झाले. ‘भविष्य विशेषांक’ न काढता ‘लोकप्रभा’ने विज्ञानाची कास धरून समाजप्रबोधन करावे हीच अपेक्षा!
सुहास राजाराम सावंत, भांडुप, मुंबई.

गजलेचा मथितार्थ उलगडला
कोणत्याही क्षेत्रात गुरू हा महत्त्वाचा असतो. गजल रचना स्फुरणं, कल्पना व्यक्त करणे हे जरी रचनाकारास सहजशक्य असले तरी त्यात फेरफार करून ती रचना सुंदर करणे म्हणजे इस्लाह हे लेखातील उदाहरणांवरून पुरेपूर पटलं. बहुतांश वेळा ऐकायला खूप छान वाटते, पण अर्थ कळत नाही, अशीच अनेकांची तऱ्हा असते. अशा गजलेची रचना कशी तावूनसुलाखून तयार होते हे या लेखावरून लक्षात आले. एका नव्या विषयाची ओळख करून दिल्याबद्दल ‘लोकप्रभा’चे धन्यवाद.
अजित भोसले, पुणे.

मराठी ज्ञानभाषा व्हायला हवी
२६ डिसेंबरच्या अंकातील गणेश साळुंखे यांचा ‘म. मराठीचा’ हा मातृभाषेबद्दलचा लेख खूपच सुरेख होता. ‘लोकप्रभा’ नेहमीच वाचकांना प्रभावीत करणारे लेख देत असते. मातृभाषा म्हणून मराठीचे स्थान आणि मातृभाषा हीच एकमेव ज्ञानभाषा असते हे लेखकाने व्यवस्थित पटवून दिले आहे. पण आपण आत्ता इंग्रजी हीच ज्ञानभाषा करुन ठेवली आहे. किंबहुना आपण आपल्याच लोकांना पटवून देण्यात कमी पडतो आहोत की काय? असे वाटते. असो, लोकप्रभाने असेच वैचारिक लेख देत जावेत.
जन्मेश बिराडे, ई-मेलवरून.

वाचकांतले लेखक
मी ‘लोकप्रभा’चा नियमित वाचक आहे. अंकातील वेळोवेळी होणारे परिवर्तन गेली २५ वर्षे जाणवत असते. मागील वर्षांपासून आपण अनेक लेखकांना ‘वाचक लेखक’ सदरात स्थान देऊन दर्जेदार लेखनास प्रवृत्त केले आहे. इंदोरच्या राजा सोवनींचा याच सदरातील ‘गंप्या, नाद आणि स्वरा’ हा विनोदी लेख वाचण्यात आला. वर्तमान तरुण-तरुणीत होत असलेले परिवर्तन पाहून स्वर्गस्थ देवादिकांनासुद्धा पृथ्वीतलावर येऊन या आनंदात सहभागी व्हावे, असे नारदादिकांना, अप्सरांना वाटल्यास नवल नाही. नारदाचा ‘नाद’ आणि अप्सरेची ‘स्वरा’ आवडली. व्यंगात्मक सूक्ष्म निरीक्षणातून उतरलेली ही फॅण्टसी छान आहे. लेखकाला शुभेच्छा.
– मधुसूदन म. तपस्वी, इंदोर.