जम्मू-काश्मिरात मतपेढीतील दरी बुजवण्याऐवजी पीडीपी व भाजपने आपापल्या मतपेढय़ांना खूश राखण्याचे राजकारण आरंभले. ते कायम ठेवायचे आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही म्हणायचे, हा सत्तेत असूनही विरोधकांसारखे वागण्याचा प्रकार झाला..
महाराष्ट्रात शिवसेनेचे जे झाले आहे तसे जम्मू-काश्मीरमध्ये भाजपचे झाले आहे. मुफ्ती मोहंमद सईद यांच्या पीडीपी पक्षासह भाजप त्या राज्यात सत्तेत सहभागी झाल्यापासून या दोन्ही पक्षांत सतत कुरबुरी सुरू असून मसरत आलम या वादग्रस्त नेत्याच्या सुटकेनंतर या दोन्ही पक्षांत विशेषच तणाव निर्माण झालेला दिसतो. या आलम यांनी २०१० साली त्या राज्यात भारत सरकारविरोधात निदर्शनांचे आयोजन केले होते. त्यात शंभरभरहून अधिकांचा बळी गेला. तेव्हापासून तो तुरुंगात होता. सईद यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटायच्या आत त्याची तुरुंगातून मुक्तता झाली. भाजप त्यामुळे चांगलाच दुखावला. राज्य भाजपने तर या सरकारातून बाहेर पडण्याची मागणी केली असून त्या पक्षाच्या अन्य शाखांतही याबाबत तीव्र रोष आहे. काश्मिरातील प्रत्येक मुसलमान हा जणू फुटीरतावादी आहे, अशी भाजपची आतापर्यंतची धारणा. असे असताना या पक्षाने एकदम मुफ्ती मोहंमद सईद यांच्याशीच सत्तेसाठी घरोबा केला. एका अर्थाने ते अब्रह्मण्यमच. पोथिबद्ध विचारात बांधल्या गेलेल्या संघीयांना तो अद्यापही पटलेला नाही. परंतु जम्मू-काश्मिरातील दुभंगलेल्या वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर खरे तर तो निर्णय राजकीय वास्तवाचे भान येत असल्याचा निदर्शक होता. आम्हीही त्या निर्णयाचे स्वागतच केले. याचे कारण इतक्या वर्षांनंतरही भाजपची धाव त्या राज्यातील िहदुबहुल जम्मू प्रांतापलीकडे जाऊ शकली नाही, तसेच पीडीपी आदी पक्षांनाही िहदुबहुल भागात आपली विश्वासार्हता सिद्ध करता आलेली नाही. याचा अर्थ या दोन्ही पक्षांनी.. खरे तर दोन्ही धर्मीयांनी, या काळात आपापली मतपेढी तेवढी राखली. अशा वेळी या मतपेढीतील ही दरी बुजवून भाजप आणि पीडीपी आघाडी करणार असतील तर ती घटना प्रागतिकच ठरते. त्यामुळेच त्या प्रांतातील साचलेले राजकारण प्रवाही होईल अशी अटकळ होती. परंतु तसे झाले नाही आणि पुढेही होणार की नाही असा प्रश्न आहे.
याचे कारण उभय पक्ष आपापल्या मतपेढय़ांच्या पलीकडे विचार करावयास तयार नाहीत. सईद यांनी सत्ता हाती घेतल्या घेतल्या जी विधाने केली ती या मतपेढय़ांना सुखावणारी होती. किंबहुना तोच त्यांचा उद्देश होता. भाजप या िहदुआग्रही पक्षाशी हातमिळवणी केली म्हणून आपण आपल्या विचारात कोणत्याही प्रकारची तडजोड केलेली नाही हे दाखवणे सईद यांच्यासाठी गरजेचे होते. त्यामुळे शांततेत पार पडलेल्या निवडणुकांसाठी पाकिस्तानचे आभार मानणे वा अफझल गुरू याच्या पाíथवाची मागणी करणे हे सारे आपल्या मतदारसंघास चुचकारण्यासाठीच होते. मसरत आलम याची सुटका हे त्याच मतदारसंघानुनयी राजकारणाचा भाग आहे. तो पीडीपीने चोख पार पाडला. तसा तो पार पाडला जाणे त्या पक्षासाठी आवश्यक होते. अन्यथा पीडीपी स्थानभ्रष्ट होण्याची भीती होती. त्याच वेळी सईद यांच्या या कृत्यांच्या विरोधात जमेल तितकी जोरात बोंब ठोकणे हे स्थानिक भाजपसाठी गरजेचे होते. कारण तो भाजपच्या मतदारसंघाचा प्रश्न आहे. पीडीपीशी घरोबा केला म्हणून हिंदुहिताबाबत तडजोड केलेली नाही वा आपण बाटलेलो नाही, हे सिद्ध करत राहणे भाजपसाठी गरजेचे आहे. तेव्हा हे दोन्ही पक्ष सध्या आपापल्या मतदारसंघांना चुचकारण्याचेच धोरण अवलंबीत असून त्याकडे खरे तर ज्येष्ठांनी दुर्लक्ष करणे आवश्यक होते.
पण ज्येष्ठांना याचा विसर पडला आणि आपला राष्ट्रवादी चेहरा पुसला जातो की काय, अशी भीती भाजपच्या मनात निर्माण झाली. याचा अर्थ असा की भाजप या प्रश्नावर विरोधकांच्या हाती आपल्या राजकारणाची सूत्रे देऊन बसला. त्यामुळे आलम याच्या सुटकेच्या मुद्दय़ावर भाजपचे हसे झाले. या आलम याच्यावर २७ गंभीर गुन्हे आहेत आणि त्याची सुटका करताना मुख्यमंत्र्यांनी भाजपला विश्वासात घेतले नाही अशी तक्रार गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी करणे म्हणजे विरोधकांच्या हाती कोलीत देण्यासारखे होते. यामुळे भाजप दोन्ही आघाडय़ांवर उघडा पडला. यापैकी पहिली आघाडी पक्षांतर्गत. आपला सहकारी आपणास इतकीही किंमत देत नसेल तर काय अर्थ आहे सत्तेत राहण्यात अशा प्रकारे प्रतिक्रिया परिवारात राजनाथ सिंह यांच्या कबुलीने निर्माण झाल्या आणि त्या होणारच होत्या. त्याच वेळी भाजपने प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आघाडीवरही स्वत:स उघडे पाडले. बघा, भाजपच आता राष्ट्रविरोधी घटकांच्या सुटकेसाठी अनुकूल आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली. तेही अपेक्षितच होते. याचे कारण भाजपने काँग्रेसबाबत हेच केले होते. तेव्हा काँग्रेसने दया दाखवण्याचे काहीच कारण नाही. काँग्रेसच्या या राज्याबाबत झालेल्या ऐतिहासिक चुकांची सतत आठवण करून देत भाजप त्या पक्षाच्या काश्मीरविषयक भूमिकेवर कायमच हेत्वारोप करीत राहिला. आता ती संधी काँग्रेसला मिळाली. त्याचमुळे आलम सुटकेच्या मुद्दय़ावर भाजप इतका नाराज असेल तर त्यांनी पीडीपीशी असलेले संबंध तोडावेत असे आव्हान काँग्रेसने दिले. परिणामी एकाच वेळी प्रवीण तोगाडिया यांच्यासारखे आग्यावेताळ, परिवार आणि त्याच वेळी काँग्रेसजन या आघाडय़ांवर भाजपची चांगलीच कोंडी झाली. इतकी की खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी संसदेतील चच्रेत मध्यस्थी करून निवेदन करावे लागले. वस्तुत: अशा वेळी राजकीय प्रौढपणा दाखवत पंतप्रधानांनी आलमच्या सुटकेबाबत समजूतदार भूमिका घेणे आवश्यक होते. ते राहिले दूरच. उलट पंतप्रधानांनी आणखी टोकाची भाषा करीत चालवून घेणार नाही छाप इशारा दिला. जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरसाठी कसे आत्मसमर्पण केले ही जुनीच टेप याही वेळी पंतप्रधानांनी वाजवली आणि काँग्रेसने आम्हाला देशप्रेमाचे धडे देऊ नयेत असे विधान केले. हा सारा युक्तिवादच हास्यास्पद होता. त्याहूनही तो, पंतप्रधानदेखील विरोधी पक्षाने रचलेल्या सापळ्यात कसे अडकतात हे दाखवून देणारा होता. भाजपला स्वत:च्या राष्ट्रप्रेमाविषयी प्रमाणपत्र द्यावे लागावे यातच काय ते आले. संघ आणि तोगाडिया यांच्यासारखे वाहय़ात यांचे दडपण न घेता जम्मू-काश्मीरचे राजकारण करणे भाजप सोडत नाही तोपर्यंत ही वेळ त्या पक्षावर आणखी अनेकदा येईल. आलम याच्यापाठोपाठ सईद सरकार जमात उल मुजाहिदीन या संघटनेचा आघाडीचा नेता आशिक हुसेन फक्तू याची सुटका करण्याच्या तयारीत आहे. हा आशिक हुसेन गेली २२ वष्रे श्रीनगरच्या तुरुंगात विविध गुन्हय़ांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तेव्हा त्याचीही सुटका सईद सरकारने केली तर तेव्हाही आम्हाला मुख्यमंत्र्यांनी विचारलेच नाही, असे रडगाणे भाजप नेते गाणार काय?
तसे ते गाणे म्हणजे सत्तेत राहूनही विरोधी जागेवर हक्क कायम ठेवण्यासारखे आहे, हे भाजपला कळावयास हवे. तसे ते कळत नसेल तर त्यांनी राहुल गांधी वा अलीकडे शिवसेना यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवावे. सत्तेत सहभागी होऊनही विरोधी राजकारणाचा उपद्व्याप राहुल गांधी यांनी केला. आता महाराष्ट्रात शिवसेना तेच बालिश राजकारण करीत आहे. हे असे करणाऱ्या राहुल गांधी यांची अवस्था मतदारांनी काय केली ते पाहणे हा यावर उतारा असू शकतो. तेव्हा भाजपने हे बालबुद्धीचे राजकारण सोडावे आणि जम्मू-काश्मिरातील घटनांची मालकी घ्यावी. सईद यांच्या पीडीपीशी आघाडी करताना दाखवलेली प्रागतिकता भाजपने आणखी काही काळ तरी राखावी. त्यासाठी गरज असल्यास परिवार नियोजन करावे. ते अधिक शहाणपणाचे आहे.