कोणताही विचार व्यक्त करण्याची वेळ अयोग्य असेल, तर तो सुविचार असला तरी अवकाळी पडणाऱ्या पावसासारखा दु:खांवर डागण्या देणारा ठरतो. गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या अवकाळी लहरीपणामुळे शेतकरी पिचून गेला आहे. विदर्भात ३१९ आणि मराठवाडय़ात २१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आकडे आहेत. तशातच, भूमी अधिग्रहण कायद्याच्या भयाचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसू पाहात आहे. चहूबाजूंनी पिचलेल्या या शेतकऱ्याला दिलाशाचे चार शब्द आणि शक्य झाले तर कृतिशील सहकार्य यांची खरी गरज आहे. एका बाजूला, केंद्रातील रालोआ सरकार गरिबांचा कैवारी असल्याचा निर्वाळा पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार देत असतात. सत्तेचा वापर गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठीच केला जाणार, अशी ग्वाही देत शेतकरीहिताच्या निर्णयांची यादी देशासमोर मांडत असतात, तेव्हा दुसरीकडे त्यांच्याच सरकारचे वजनदार मंत्री नितीन गडकरी मात्र, शेतकऱ्यांना उपदेशाचे धडे देत असतात. सारे काही सरकारने करावे, सगळेच फुकटात मिळावे, ही सवय आता पुरे झाली. आता स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शेतकऱ्यांनाच काही तरी करावे लागेल, आपले कर्तृत्व दाखवावे लागेल, असा उपदेश गडकरी यांनी केला आहे. अनुदाने आणि पॅकेजची सवय झाल्याने, प्रत्येक संकटात सरकारवर विसंबून राहण्याची सवय झालेल्यांना गडकरी यांच्या उपदेशाचे हे शब्द कडवट वाटू शकतील. सरकारच्या तिजोरीची अवस्था पाहता गडकरी यांचा उपदेश अगदीच अयोग्य नाही, असेदेखील काहींना वाटेल, पण त्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणारा संभ्रम दूर कसा होणार, हा खरा प्रश्न आहे. मोदी म्हणतात ते खरे मानायचे, तर कोणत्याही संकटाच्या वेळी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा दिलासा मिळतो, तर गडकरी म्हणतात ते खरे मानले तर आता संकटे स्वत:च्या छातीवर झेलून ती परतवून लावण्याची हिंमत शेतकऱ्याला स्वत:लाच जमा करावी लागणार, असे स्पष्ट संकेत मिळतात. हेही खरे मानायचे, तर पंतप्रधान मोदी यांच्या मुखातून मिळणाऱ्या दिलाशाच्या आश्वासनांचे काय, हा प्रश्न संभ्रमावस्था वाढविणारा ठरतो. केंद्रीय मंत्री गडकरी हे स्पष्टवक्ते आहेत. अनेकदा आपल्या स्पष्ट बोलण्याच्या सवयीमुळे त्यांनी काही वादही ओढवून घेतले आहेत. निवडणूक काळात ‘लक्ष्मीदर्शना’च्या मुद्दय़ावरून ते असेच वादग्रस्त ठरले होते. त्यांच्या वक्तव्यातील वास्तवाबाबत फारसे मतभेद असतील असे नाही. कदाचित, अशी वक्तव्ये करताना काळ आणि वेळेची त्यांची अशी काही गणितेही असू शकतात, पण हे उपदेशाचे बोल ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या संदर्भात असतात, त्यांच्यासाठी मात्र ते ‘अवकाळी सुविचार’ ठरतात. आता आपल्या संकटात सरकार आपल्यासोबत नाही, ही गडकरी यांच्या वक्तव्यातून करून दिली जाणारी जाणीव संकटग्रस्त शेतकऱ्यासाठी लढण्याची उमेद देणारी नसेल. त्यामुळे अगोदर शेतकऱ्यांच्या आणि गरिबांच्या मनात परिस्थितीशी झुंजण्याची ताकद रुजवावी लागेल आणि योग्य वेळ आली, की त्यांना त्यांच्या शक्तिनिशी परिस्थितीसमोर उभे करावे लागेल. अचानक आधार काढून घेतला, तर संभ्रम आणि भयाची भावना अधिकच वाढेल आणि विचाराचा हेतू चांगला असला, तरी तो अवकाळी ठरेल.