‘तत्त्वज्ञान’, ‘फिलॉसॉफी’ आणि ‘दर्शन’ हे शब्द अनुक्रमे मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांत जणू एकाच अर्थाने आज वापरले जातात.. व्यवहारात ते ठीकही असेल; पण ‘फिलॉसॉफी’ची आणि ‘दर्शनां’ची  जडणघडण पाहता त्यांना या एकाच (त्रिभाषा) सूत्रात सहजगत्या ओवता येत नाही, हे समजेल. दर्शन आणि तत्त्वज्ञान हेही एकमेकांचे प्रतिशब्द नाहीत, हे शक्यतोवर सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा या लेखाचा उद्देश!
इंग्लिशमधील Philosophy या शब्दाचे मराठी भाषांतर म्हणून आणि आधुनिक काळात Philosophy चा सर्वमान्य पर्यायी शब्द म्हणून ‘तत्त्वज्ञान’ हा शब्द सर्व वैचारिक क्षेत्रात स्वीकारला गेला आहे. ग्रीक तत्त्वज्ञान, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वज्ञान, सामाजिक तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, पर्यावरणाचे तत्त्वज्ञान इत्यादी शब्द या अर्थाने येतात.
संस्कृत भाषेतून मराठीत अथवा अन्य भारतीय भाषांमध्ये ‘तत्त्वज्ञान’ या संज्ञेला दर्शन, ब्रह्मज्ञान आणि दर्शनशास्त्र हे आणखी काही पर्याय मानले गेले आहेत. त्यांनाही बऱ्याच वेळेस Philosophy या शब्दाचे मराठी भाषांतर मानले जाते. कल्ल् Philosophy, ही stern Philosophy यांचे भाषांतर ग्रीक दर्शन, पाश्चात्त्य दर्शन असे केले जाते. उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्टय़ात ‘दर्शन विभाग’ म्हणजे department of philosophy असे वापरले जाते. हे सारे शब्दव्यवहार वरकरणी चुकीचे वाटत नाहीत.
मात्र philosophy आणि ‘तत्त्वज्ञान’ या समानार्थक संज्ञा नाहीत. त्या संकल्पना तात्त्विक आहेत. पण त्यांचे अर्थ वेगळे आहेत. त्यांच्यात समान धागा गृहीत धरून त्यांना समान अर्थ दिला गेला आहे. philosophyहा शब्द मराठीत ‘फिलॉसॉफी’ असे लिहिणे हा भाषिक दृष्टीने इंग्रजी शब्दाचा उच्चार लिहिणे असा होईल. हे ‘लिप्यंतर’ ठीक आहे, पण ‘फिलॉसॉफी’ या मराठी उच्चाराचे भाषांतर म्हणून ‘तत्त्वज्ञान’ असे होत नाही. हा बारीक भेद लक्षात घेणे आवश्यक असते.
आता केवळ ‘तत्त्वज्ञान’ हा वेगळा सुटा शब्द घेतला तर त्याला खास विशिष्ट भारतीय पारिभाषिक अर्थ आहे. ‘तत्त्वज्ञान’ या शब्दाला भारतीय संदर्भात दर्शन, ब्रह्मज्ञान आणि दर्शनशास्त्र हे पर्यायी संस्कृत शब्द आहेत. ते खास देशी शब्द असून त्यांनाही विशिष्ट अर्थ आहेत. त्यांचे अर्थ समान नाहीत, पण परस्परपूरक आणि परस्परात गुंतलेले आहेत.
तत्त्वज्ञान म्हणजे तत्त्वाचे ज्ञान. तत्त्व हा शब्द ‘तत्’ म्हणजे ‘ते’ धातूपासून बनतो. या ‘तत्’चे  ‘असणे’ हे ‘तत्त्व’ आणि त्या ‘तत्त्वा’चे ज्ञान ते तत्त्वज्ञान. हा समान अर्थ वैदिक िहदू विचारसरणीत आहे. त्यानुसार तत्त्व म्हणजे पदार्थाचे यथार्थ स्वरूप, त्याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. पदार्थ म्हणजे समग्र अस्तित्व- जग व माणसे. जगाचे व माणसाचे साररूप जाणणे म्हणजे तत्त्व जाणणे; ते तत्त्वज्ञान. न्यायदर्शनात (वात्स्यायन १.१.१) तत्त्वज्ञान पदाची व्याख्या केली आहे : ‘तत्’ म्हणजे ‘सत्’ व ‘असत्.’  या दोन्हींचे यथार्थ व अविपरीत स्वरूपातील ज्ञान होणे, हे ‘तत्त्व’ होय. या अर्थाने कोणत्याही वस्तुस्थितीचे अथवा पदार्थाचे यथार्थ ज्ञान- ती जशी आहे तशीच समजणे म्हणजे तत्त्वज्ञान होय. वस्तुस्थिती म्हणजे असणे वा नसणे, याचे ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान. अशा सोळा तत्त्वांचे किंवा पदार्थाचे ज्ञान झाले की मुक्तिमार्ग खुला होतो. (तत्त्वज्ञानाद् दु:खान्त्योछेदलक्षणं..)
आदी शंकराचार्याच्या मते, ‘तदति सर्वनाम सर्व च ब्रह्म तस्यनाम / तद् भावस्तत्वं ब्रह्मणो याथात्म्यम’ म्हणजे ‘तत्त्व हे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे विश्वातील सर्व पदार्थाना लागू पडणारे तत्त्व. ब्रह्म व्यापक असल्याने सर्व पदार्थाना व्यापून आहे. म्हणून त्याचे ‘तत्’ हे नाव. थोडक्यात ‘तस्य भाव: तत्त्वं.’ त्याचे ज्ञान तेच ब्रह्मज्ञान. (पण पुढे मी म्हणजे ब्रह्म किंवा ‘मी नाहीच, ब्रह्मच’ असे रूपांतर होते. ते आत्मज्ञान हेच तत्त्वज्ञान बनते.)        
‘दर्शन’ ही ‘तत्त्वज्ञान’ या शब्दाप्रमाणेच विशिष्ट रचना आहे. ‘दर्शन’चा साधारण अर्थ भेटणे, कधी तरी भेटणे म्हणजे ‘दर्शन अलभ्यम्.’ दर्शनचा मूलार्थ दृष्टी. संस्कृत ‘दृश’ धातूपासून ‘दर्शन’ संज्ञा बनते. ‘दृश’पासून ‘दृश्य’ शब्द तयार होतो. जे दिसते तो पाहण्याचा विषय = ‘दृश्य’, ते पाहणारी व्यक्ती = द्रष्टा आणि या द्रष्टय़ाला जे दिसते ते ‘दर्शन.’ तेव्हा हे दर्शन ‘घेतो’ तो दार्शनिक.
‘दर्शन’चा हा अर्थ लक्षात घेऊन ‘योग्य अधिकारी साधकापुढे तात्त्विक विचार स्वत:हून प्रगट होऊन त्यास दर्शन देतात, अशी श्रद्धा बनली. प्राचीन ऋषींची अशी धारणा होती की मंत्र त्यांना प्रत्यक्ष दर्शन देतात – ‘ऋषिर्दशनात्.’ (सर्वदर्शन संग्रह – पं. र. प. कंगले). येथे ‘दर्शन’चा अर्थ विचार सुचणे, स्फुरणे असा घेतला पाहिजे. हे दर्शन दोन प्रकारे आले असावे. भारतीय दर्शनांची रचना अनेक शतके होत होती. त्यामुळे आधीच्या काळात काव्यात्म रूपात स्फुरलेले प्राथमिक विचार आणि नंतरच्या काळात त्यांना जाणीवपूर्वक दिलेले सुव्यवस्थित काटेकोर रूप, असे दोन अर्थ ‘दर्शन’चे करता येतील. दर्शनांची सुव्यवस्थित मांडणी केली की त्यांना ‘शास्त्र’ म्हणतात. ते जाणतो तो शास्त्री, दार्शनिक. अशी मांडणी पूर्ण झाली की ‘दर्शन’ किंवा ‘तत्त्वज्ञान’ या संकल्पनेची परिपूर्ण व्याख्या तयार होते. ती म्हणजे ‘जग आणि मानवी जीवनाकडे विचारपूर्वक पहिले असता चिंतकाला जाणवणारे त्यांचे स्वरूप म्हणजे दर्शन किंवा तत्त्वज्ञान.’    
माणसाला पाच ज्ञानेंद्रिये असली तरी कोणत्याही ज्ञानेंद्रियापेक्षा डोळा हे सर्वात विश्वसनीय म्हणून सत्याच्या जवळ जाणारे इंद्रिय असल्याने ‘दर्शन’ महत्त्वाचे मानले गेले. यासाठीच ‘चक्षुर्वैसत्यम’ किंवा ‘चक्षुर्वै प्रतिष्ठा’ म्हणतात. वरील अर्थ पाहता ‘तत्त्वज्ञानसाधनशास्त्रदर्शनम्’ म्हणजे ‘तत्त्वाचे ज्ञान होण्याला साधन असे शास्त्र म्हणजे दर्शन’ असे म्हटले आहे. दर्शनालाच बौध दर्शनात ‘दिठ्ठी’ म्हटले आहे.    
असे दर्शन प्रत्येकाला वेगवेगळे झाले. अशा विविध दृष्टिकोनांची चर्चा करते ते दर्शनशास्त्र होय. त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करता येत नाही. त्यामुळे चार्वाक दर्शन नीच आणि अद्वैत वेदान्त (नुसतेच श्रेष्ठ असे नाही तर) सर्वश्रेष्ठ असे म्हणणे चूक आणि दिशाभूल करणारे आहे. पण भेदनीती केली गेली. आणि भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान किंवा वेदान्त; म्हणजे ‘अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान’ असे एक लाडके समीकरण बनविले गेले. पण ‘भारतीय तत्त्वज्ञान’ ही एक पुन्हा व्यापक संकल्पना आहे. भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ ‘अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान’ हे कितीही लाडके समीकरण असले तरीही हे समीकरण हे ‘तत्त्वज्ञान’ या संकल्पनेच्या अनेक अर्थापकी एक अर्थ आहे.  
‘भारतीय तत्त्वज्ञान’ या संकल्पनेत िहदू वैदिक तत्त्वज्ञान, बौद्ध तत्त्वज्ञान व जैन तत्त्वज्ञान या तीन मोठय़ा विचारविश्वांचा समावेश होतो. आणि खुद्द ‘िहदू वैदिक तत्त्वज्ञान’ या संकल्पनेत न्याय, वैशेषिक, सांख्य, योग आणि पूर्वमीमांसा अशा आणखी पाच विचारसरणी येतात. अद्वैत वेदान्त हे सहावे तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे केवळ ‘अद्वैत वेदान्ताचे तत्त्वज्ञान’ हे कितीही लाडके समीकरण असले तरीही ते चुकीचे ठरते. केवळ एकाच्याच नावाने आपले थोर तत्त्वज्ञान जगात ओळखले जावे, हा आपणच पसरवत असलेला गरसमज आहे. उलट प्रस्तुत लोकशाही जीवनपद्धतीनुसार आज ‘भारतीय तत्त्वज्ञान’ ही संकल्पना आणखी व्यापक करणे गरजेचे आहे.
पाश्चात्त्यांना Philosophy या शब्दातून काय म्हणावयाचे आहे आणि भारतीय चिंतन विश्वात त्या अर्थाशी समान असणारा विचार कोणता आहे, ते पुढील लेखात पाहू.
लेखक संगमनेर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक व तत्त्वज्ञान विभागप्रमुख आहेत.

loksatta kutuhal features of self aware artificial intelligence
कुतूहल : स्वजाणीव- तंत्रज्ञानाची वैशिष्टये..
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र