प्रज्ञाच्या बोलण्यावर वैतागून कर्मेद्र उद्गारतो..
कर्मेद्र – अवघा भारत असाच सदोदित द्विधा मनोदशेत जगत असतो.. अरे आधी एखाद्या पदार्थाचं किती कौतुक करायचं, मग लगेच त्याच्या धोक्यांची यादी सांगत सुटायची.. आयुर्वेदात अमक्या विकारावर केळं खावं, असा सल्ला आणि त्या पाठोपाठ पण केळ्यानं तमका विकार मात्र उद्भवू शकतो, हा वैधानिक इशारा लगेच जोडायचा..
योगेंद्र – पण तेच तर खरं आहे! याचाच अर्थ असा की कोणतीही गोष्ट ही प्रमाणात असते तोवरच निर्धोक असते.. प्रमाणाबाहेर औषध घेतलं तरीही रोग बळावतोच!
प्रज्ञा – योगेनचं बरोबर आहे.. आणि मी म्हटलं ना? आहाराचा शरीराशी थेट संबंध आहे, त्यामुळे आहारात समतोल हवाच.. आता सध्या लोक आहारशास्त्र, डाएट वगैरेची टरही उडवतात.. पण त्याकडे गांभिर्यानं पाहिलं पाहिजे. मला तर वाटतं प्रत्येक गृहिणीनं आहारशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे.. असं झालं तर प्रत्येक घराचं आरोग्य कितीतरी पटीनं सुधारेल..
कर्मेद्र – पण प्रत्येक स्त्री कसा काय अभ्यास करू शकेल?
प्रज्ञा – सहज करू शकेल.. ऑनलाइन अभ्यासक्रमही खूप आहेत की.. तर कांद्याबाबत म्हटलं ना? की दोन मतप्रवाह आहेत.. तरी मला वाटतं कोणतीही गोष्ट प्रमाणात योग्य आहे.. मुळ्याचंही तेच आहे.. फायबरचं प्रमाण.. तंतूजन्य घटकांचं प्रमाण चांगलं असल्यानं मुळा हा पचनक्रिया चांगली व्हायला मदत करतो तसंच मूत्राचं प्रमाणही वाढवतो, त्यामुळे मूत्रासंबंधी जे विकार असतात, विषाणूसंसर्ग वगैरे यात त्याचा लाभ होतो.. वजन कमी करायलाही तो मदत करतो तो पॉवरफुल डिटॉक्सिफायर आहे त्यामुळे काविळीसारख्या विकारात चांगला आहे.. क जीवनसत्त्वही त्यातून चांगल्या प्रमाणात मिळतं.. आता भाज्यांचं सांगायचं तर भाज्यांनुसार त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत.. तरी सर्वसाधारणपणे सांगायचं तर पालेभाज्या आणि फळभाज्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात मिळतात आणि सध्याच्या जीवनशैलीतून जे अनेक रोग जडतात त्यावरही भाज्या खाणं, हा मोठा उपाय आहे.. कच्च्या भाज्याही खाल्ल्या पाहिजेत.. (कर्मेद्र हसतो) का? काय झालं हसायला?
कर्मेद्र – ख्यातिनं एकदा भाजी केली होती आणि बरीचशी कच्ची राहिली होती.. मी बोललो तर फणकारून म्हणाली, तुम्हीच म्हणता ना? डॉक्टरांनी कच्च्या भाज्या खायला सांगितलंय म्हणून?
हृदयेंद्र – (हसत) बिचाऱ्या ख्यातिच्या नावावर काहीही खपवू नकोस.. एकतर इथला स्वयंपाकही मन लावून शिकली आणि चांगला करतेही.. बरं, पण मी काय म्हणतो.. या सगळ्या माहितीची सांगड ‘अवघी विठाबाई माझी’शी कशी घालणार?
कर्मेद्र – थांब थांब.. अजून लसूण मिरची कोथिंबीर आहे ना?
योगेंद्र – कम्र्या लेका.. सगळा अभंग लक्षात राहिलाय?
ज्ञानेंद्र – खाण्याच्या गोष्टींशी संबंध आहे ना म्हणून!
प्रज्ञा – लसूणही हृदयविकार रोखते, हे हृदू तुझं म्हणणं खरं आहे.. हृदयविकाराप्रमाणेच फुप्फुस आणि मूत्रपिंडाच्या काही विकारात लसूण गुणकारी आहे.   अजीर्ण, खोकला, कफ, कृमी, वातविकारातही  ती उपयुक्त आहे. अण्णाही लसणीचे खूप गुण सांगायचे. मिरचीत अ आणि क जीवनसत्त्वं आहेत.. हिरव्या मिरचीतून क जीवनसत्त्व मोठय़ा प्रमाणात मिळतं म्हणून शेतकरी मिरचीचा खर्डा खात असावेत, पण ते तेवढं कष्टही करत असत, हे विसरू नका.. आपल्याला मिरची टाळलेलीच बरी.. अपचन, त्वचेचे काही विकार, तोंडातला अल्सर, अतिसार अशा काही विकारांना आटोक्यात आणण्यासाठी कोथिंबीर गुणकारी आहे.. पण शहरात कोथिंबीर ज्या पद्धतीनं रस्त्यावर कशीही पडलेली असते आणि ती वितरित होत असते, ते पाहिलं की भीतीच वाटते.. रोगापेक्षा उपाय भयंकर, अशी सध्याची गत आहे.. ना कोणती फळं चांगली मिळतात ना भाज्या..
हृदयेंद्र – बरं, आता या सर्व माहितीचा सांधा ‘अवघी विठाबाई माझी’शी कसा जोडायचा?
बुवा – सूनबाईंनी सांगितलं ना? त्याप्रमाणे दोन बाजू आहेत या!
चैतन्य प्रेम