गाडी थांबली तेव्हा उत्सुकतेनं हृदयेंद्रनं पाहिलं.. भुसावळ आलं होतं.. तो खाली उतरला.. गाडी वीसेक मिनिटं थांबणार होती.. चहाच्या स्टॉलवर गर्दी होती.. त्यानंही एक चहा घेतला.. गरम घोट घेता घेता त्याला वाटलं, किती उच्च विचारांत मन गढलं होतं आणि तेच स्टेशन पाहाताच खाली आलं.. फलाटावरच्या गर्दीत सुखावलं!  पुन्हा त्याच्या मनात जनाबाई यांच्या त्या अभंगातले पुढले चरण आले.. ‘‘संत म्हणसी तरी देवाचा हा गळा। जेणें रस आगळा वेदादिकां।। संत जरी पुससी तरी देवाचें वदन। माझे ते वचन संत झाले।।’’ या चरणांवर बुवा जे बोलले होते, ते त्याला आठवलं..
बुवा – संत हा देवाचा गळा आहेत, देवाचं तोंड आहेत.. वेदादिक म्हणजे वेद, उपनिषदे आदींतील जे तत्त्वज्ञान आहे ना? त्यातला खरा रस, खरा अर्थ केवळ त्यांच्याच मुखानं प्रकट होतो.. वेदादिकांना त्यांच्या वाणीमुळे रसमयता लाभते.. परमेश्वर सांगतो की संत हे माझेच वदन आहेत.. माझं जे वचन आहे, जे बोलणं आहे ते त्यांच्याच मुखातून प्रकटतं!! हृदयेंद्रजी या अभंगातले जे पुढचे दोन चरण आहेत ना? त्यांचं विवरण करू नका.. त्यावर सर्वानीच चिंतन करू आणि पुढे कधीतरी त्यावर चर्चा करू.. पण ते चरण वाचा जरूर..
हृदयेंद्र – (उत्सुकतेनं) पहा.. काय सांगतात, ‘‘पराविया चारी सांडूनि मीपणीं। संता बोले वाणी विठोबाची।। परेचिया चारी आनंदामाझारीं। संत झाले अंतरीं पडजीभ देवा।।’’ (उजळलेल्या चेहऱ्यानं) खरंच बुवा काहीतरी विलक्षण आहे हे..
कर्मेद्र – इतर चरण थोडे तरी कळले यातलं काहीच कळलं नाही.. सांगूनच टाका अर्थ.. उगाच चिंतन आणि मग चर्चेचं लोढणं कशाला?
बुवा – थोडा संकेत देतो, पण अर्थ चिंतनानंतरच उलगडेल बरं का.. इथे वैखरीपासून परेपर्यंतच्या चार वाणींचा उल्लेख आहे आणि संतांना जे पडजीभ म्हटलं आहे ते एका वाणीचं स्थानही आहे आणि उच्चारासाठीही पडजीभेचं महत्त्व अनन्य साधारण आहे!
हृदयेंद्रला ती चर्चा आठवून एकदम हसू आलं.. मग जाणवलं गाडी सुटायची वेळ झाली आहे.. धावतच तो डब्यापाशी गेला.. खूप मागे अचलदादांसोबत इलाहाबाद स्थानकात घडलेला किस्साही त्याला या धावपळीत आठवला.. गर्दीचे दिवस होते.. वातानुकूलित डब्यातले तिकिट होतं म्हणून बरं.. इलाहाबादला चहासाठी म्हणून तो अचलदादांसोबत उतरला होता.. डब्यात दोन गुरुबंधू होते, त्यांच्यासाठीही चहा घ्यायचा होता. हृदयेंद्र आणि अचलदादांनी प्रत्येकी दोन चहाचे प्लॅस्टिकचे पेले घेतले आणि गाडी सुटली! दोघं धावले पण जवळचा डबा होता तो साधारण दर्जाचा.. अर्थात खच्चून भरलेल्या गर्दीचा.. त्यातून वाट काढत कसेबसे ते आपल्या डब्यात पोहोचले तेव्हा सुटकेचा निश्वास सोडला.. गावी गेल्यावर गुरुजींना हा प्रसंग हसत हसत सांगितला तेव्हा गुरुजींनी विचारलं, त्या धावपळीत मनात नामस्मरण कुणाचं सुरू होतं? दोघंही गप्प झाले.. त्या धावपळीत नाम कुठलं आठवणार? पण परमध्येयाची सदोदित आठवण देणारं नाम किती जपलं पाहिजे, याचा धडाच या प्रसंगातून सद्गुरुंनी उकलून दाखवला होता.. हृदयेंद्र डब्यात शिरला.. इटारसी यायला अजून काही तास बाकी होते.. तोवर वेळ काढणार कसा? त्यानं मनातल्या मनात नामस्मरण करीत वरचा बर्थ गाठला.. डोळे मिटून तो विचारही करू लागला.. ज्या पंढरीत संतांच्या मेळ्यात सेना महाराज जात होते त्या विलक्षण वारीचा.. तीर्थस्थळी जाऊन चालत्याबोलत्या देवाची म्हणजे संतांची भेट होणं, यातच खरं सार्थक आहे.. ज्ञानेश्वर माउलीही म्हणतात ना? ‘‘निर्जिवां दगडांची काय करिसिल सेवा। तो तुज निर्दैवा देईल काय।। कवणे गुणें भुली पडली गव्हारा। तीर्थाच्या माहेरा नोळखिसी।। अष्टोत्तरशें तीर्थे जयाच्या चरणीं। तो तुझ्या हृदयी आत्मारामु।। देह देवळीं असतां जासीं आना तीर्था। मुकलासि आतां म्हणे ज्ञानदेवो।।’’ त्या दिवशीही हा अभंग त्यानं म्हटला होता.. बुवा म्हणाले होते, सत्पुरुष म्हणजे जणू तीर्थाचंही माहेर आहे! त्याची सेवा करा, निर्जीव दगडांच्या सेवेनं मुळात निर्दैवी असलेल्याला काय लाभ? या चालत्याबोलत्या देवाच्या चरणींच सर्व तीर्थ आहेत.. त्याच्याच देहात परमतत्त्वं प्रकटलं आहे!
चैतन्य प्रेम