चार्ल्स डिकन्स या ब्रिटिश कादंबरीकाराच्या ‘द पिकविक पेपर्स’ या कादंबरीने युरोपातील प्रकाशनव्यवहाराचं स्वरूप पालटून टाकलं! ही कादंबरी मार्च १८३६ ते ऑक्टोबर १९३७ या १९ महिन्यांच्या काळात दर महिन्याला काही प्रकरणं अशी हप्त्याहप्त्यानं प्रकाशित झाली. तशी ती होत असतानाच तिला लंडन आणि त्याबाहेर मोठी प्रसिद्धी मिळू लागली. लोक दर महिन्याची मोठय़ा आतुरतेनं वाट पाहू लागले. त्यात सर्वसामान्यांपासून न्यायाधीशांपर्यंत सर्व थरांतील वाचकांचा समावेश होता. तेव्हा ही गोष्ट काहीशी आश्चर्यकारक आणि बरीचशी अद्भुत होती. या कादंबरीचा लेखक डिकन्स हा तेव्हा अवघा २४ वर्षांचा तरुण होता. तोवर त्याचे लंडनविषयीचे केवळ काही लेख प्रकाशित झाले होते. नुकतंच लेटरप्रेसचं तंत्रज्ञान विकसित झालं होतं. त्याचा फायदा उठवत ही कादंबरीमालिका डिकन्सने लिहायला सुरुवात केली. पिकविक हा या कादंबरीचा नायक. तो पिकविक क्लबचा अध्यक्ष असतो. तो आणि त्याचे इतर तीन साथीदार फिरायला निघतात आणि त्या प्रवासाचा वृतान्त इतर सदस्यांना कळवतात, ही या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना. कादंबरीचं मूळ नाव आहे, The Posthumous Papers of the Pickwick Club.. ही कादंबरी नंतर एक-दोन महिन्यांनी म्हणजे १९३७ च्या शेवटी शेवटी पुस्तकरूपाने प्रकाशित झाली. तोवर युरोपात प्रकाशनव्यवसाय हा एक स्वतंत्र व्यवसाय आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं. पुस्तकविक्रेतेच जोडधंडा म्हणून पुस्तकं छापत असत. शिवाय खुद्द लेखकाला पुस्तकाच्या प्रकाशनाच्या खर्चाचा बराचसा भाग उचलावा लागत असे. पण ‘द पिकविक पेपर्स’ला अफाट यश मिळत गेलं. तिचे हप्तेच विक्रमी पद्धतीने विकले गेले आणि पुस्तकही. त्यामुळे पुस्तकांचा स्वतंत्रपणे व्यवसाय होऊ शकतो आणि त्यातून चांगले पैसे मिळू शकतात, हे सिद्ध झालं. प्रकाशन हा जोड व्यवसाय नाही, तो स्वतंत्रच व्यवसाय आहे, याची प्रचीती युरोपला आली आणि नव्या लोकांनी स्वतंत्रपणे प्रकाशनाकडे वळायला सुरुवात झाली. त्यामुळे लेखकाकडून त्याच्याच पुस्तकासाठी पैसे घेण्याची पद्धतही बंद झाली. म्हणजे ‘द पिकविक पेपर्स’ने युरोपातल्या प्रकाशनव्यवसायात एकप्रकारे क्रांतीच केली. गतवर्षी डिकन्सची जन्मद्विशताब्दी साजरी झाली आणि आता या कादंबरीला पावणेदोनशे वर्ष झाली आहेत. डिकन्स अजूनही वाचला जातोच आहे..