बेहिशेबी संपत्ती, बेनामी मालमत्ता, खोटी कागदपत्रे तयार करणे, फसवणूक अशा आरोपांचे गाठोडे शिरावर असलेले काँग्रेसचे एके काळचे वजनदार नेते कृपाशंकर सिंह यांच्यावर अखेर गेल्या महिन्यात आरोपपत्र दाखल झाले. कृपाशंकर यांच्या ‘लक्ष्मीपूजना’च्या असंख्य लीलांची वर्णने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चवीने चर्चिली जात होती. पण पक्षात थेट ‘वपर्यंत’ हात पोहोचलेल्याचे कोण काय वाकडे करणार, असा समज जनतेच्या मनात दिवसागणिक दृढ होण्यापलीकडे त्यातून फारसे काही निष्पन्न होत नव्हते. एके काळी मुंबईच्या रस्त्यावर पोटापाण्यासाठी पडेल ते काम करणारा हा एक सामान्य सिंह, कोणत्या तरी एका क्षुल्लक निमित्ताने राजीव गांधी यांच्यासमोर येतो आणि त्याची राजकीय भरभराट सुरू होते, हा राजकारणातील एक चमत्कारच होता. एकदा ‘वरचा’ वरदहस्त लाभला, की भरभराटीचे दिवस सहज सुरू होतात. या सिंहांच्या बाबतीतही तेच झाले, असे बोलले जाऊ लागले. गांधी घराण्याशी परमनिष्ठ असलेल्या सिंह यांनी बघता बघता महाराष्ट्राच्या राजकारणात जम बसविला आणि राज्यात सत्ता असताना मंत्रिपदेही उपभोगली. पण हा त्यांच्या राजकीय नशिबाचा भाग झाला. पुढे हे राजकीय नशीब फिरले आणि सिंह यांच्या राजकीय कारकीर्दीतील उपद्व्याप उजेडात येऊ लागले. त्यांच्या संपत्तीची आणि मालमत्तांची गणिते सोडविताना अनेकांचे डोळे विस्फारले जाऊ लागले, हा ताजा इतिहास आहे. सिंह यांच्यावर गेल्या महिन्यात दाखल झालेल्या आरोपपत्रातील तपशीलही याच्याशी बराचसा मिळताजुळता आहे. आता कायद्यानुसार त्यांच्या भविष्याचे जे काही व्हायचे ते होईल, पण कृपाशंकर यांच्या फळफळलेल्या नशिबाबाबत जो तपास झाला, त्याचा तपशील आरोपपत्रामुळे अधिकृतपणे बाहेर आला आहे. बेहिशेबी मालमत्ता नियमित करण्यासाठी सिंह कुटुंबाने केलेल्या उद्योगांचा लेखाजोखा या आरोपपत्रात सविस्तरपणे मांडलेला दिसतो. कमावलेला पैसा योग्य मार्गाला वळविण्यासाठी कितीही मखलाशी केली, तरी काही कच्चे दुवे मागे राहतातच, आणि सारे काही पचून जात नाही. सिंह यांच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्रातील तपशील पाहिला, तर याची सत्यताही पटू लागते. कृपाशंकर सिंह यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एका जनहित याचिकेतील आरोपानुसार, कृपाशंकरांचे कुटुंब ३२० कोटींच्या बेहिशेबी मालमत्तेचे धनी आहेत; तर ताज्या आरोपपत्रानुसार, या कुटुंबाकडे त्यांच्या ज्ञात उत्पन्नस्रोतांहून १९.९५ टक्के अधिक मालमत्ता आहे. सिंह कुटुंबांची मालमत्ता, त्यांचे खरेखोटे उद्योग यांबद्दलच्या तक्रारी, खटले, याचिका यांवरील निर्णय न्यायालयीन पातळीवर होतीलच; पण या निमित्ताने राजकीय पुढाऱ्यांच्या आश्चर्यकारक उदयास्ताचे एक अखंड प्रकरण मात्र रंजकपणे महाराष्ट्राच्या समोर उभे राहिले आहे. राज्यात सत्ताबदल झाला आणि कृपाशंकर यांच्याभोवतीचा कारवाईचा पाश अधिक घट्ट झाला. हा केवळ योगायोग आहे, असे अजाणतेपणामुळे काही वेळ गृहीत धरले, तरी राजकीय वरदहस्त लाभल्यानंतर एखाद्याच्या आयुष्याला कशी झळाळी येते आणि राजकीय चक्रे उलटी फिरताच या झळाळीला कशी काजळी येऊ लागते याचे एक मासलेवाईक उदाहरण मात्र या निमित्ताने महाराष्ट्राला पाहावयास मिळत आहे. अर्थात, हे प्रकरण काही ‘धडे गिरवावेत’ असे आदर्श नाहीच!