दहावीत चांगले गुण मिळाले की तो किंवा ती डॉक्टर वा इंजिनीअर होणार, हेच समीकरण रूढ असताना ९७ टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आता कला शाखेकडे जात आहेत. आपली सगळी हुशारी अशी  ‘वाया’ घालवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर करायलाच हवे, पण त्यांनी हे धाडसी पाऊल का उचलले असेल, याचाही विचार करायला हवा.
ना. सी. फडक्यांच्या कादंबऱ्यांतला नायक नेहमी महाविद्यालयातील कला शाखेचा विद्यार्थी असे. नायकाने सहसा कला शाखेचाच अभ्यास करायचा असतो, हे त्या काळी सर्वानी समजून घेतलेले आणि मान्य केलेले वास्तव होते. कला शाखा ही तेव्हा अतिशय प्रतिष्ठेची समजली जायची. मराठी, इंग्रजी यांसारख्या भाषा काय किंवा तत्त्वज्ञान, समाजशास्त्र यांसारखे विषय काय, त्यामध्ये आपली सारी शक्ती पणाला लावून अभ्यास करणारे विद्यार्थीही तेव्हा होते. महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांच्या तासांना दांडी न मारता पूर्ण वेळ बसून राहण्याची तेव्हाची रीत होती. पुण्याच्या स. प. महाविद्यालयात मराठी विषय शिकवणाऱ्या पु. ग. सहस्रबुद्धे किंवा श्री. म. माटे यांच्यासारख्या मातबर प्राध्यापकांच्या तासाला बाहेरील महाविद्यालयांचे विद्यार्थीही तेव्हा आवर्जून येत. इंग्रजी, मराठी विषय शिकवणारे प्राध्यापक अभ्यासक्रमाच्या बाहेरचे इतके काही सांगत, की विद्यार्थी त्यांच्या ज्ञानाने अक्षरश: दिपून जात. तेव्हा अभ्यासक्रमाबाहेरील वाचन या प्रकाराला ‘रॅपिड रीडिंग’ असे संबोधले जाई. त्याचाही अभ्यास मुले अगदी मन लावून करीत. हे असे अगदी भालचंद्र नेमाडे यांच्या शिक्षणापर्यंत चालूच राहिले होते. त्यांचा पांडुरंग सांगवीकर हाही कला शाखेचाच! तेव्हाचे हे वातावरण पुन्हा एकदा २०१५ मध्ये निर्माण होते आहे की काय, अशी शंका येण्यासारखे आक्रीत शिक्षणविश्वात घडते आहे. गेली काही दशके कला विद्याशाखा वळचणीला गेली होती. सहसा मुलांना तिकडे जाण्यात रस नसे. एवढेच नव्हे, तर शैक्षणिक जगतात कला शाखेकडे जरासे हिणकस नजरेनेच पाहिले जाई. विज्ञान शाखेकडे जाणाऱ्यांची ‘कॉलर’ ताठ तर वाणिज्य शाखेकडे जाणाऱ्यांना वृथा अभिमान, असे ते वातावरण.
दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांवर कोणती विद्याशाखा निवडायची हे ठरवणाऱ्या महाराष्ट्रातील असंख्य पालकांचा विज्ञान शाखेवर डोळा असण्याचे कारण त्यांना आपल्या पाल्यांना फक्त डॉक्टर किंवा इंजिनीअर करण्यातच रस असतो. ही क्षेत्रे निवडली, की साऱ्या आयुष्याचा प्रश्न सुटला, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे दहावीचे वर्ष अख्खे कुटुंब परीक्षामय होऊन जाते. चित्रपट नाहीत की मालिका नाहीत. गोष्टीची पुस्तके नाहीत की मैदानी खेळ नाहीत. अभ्यास एके अभ्यास. हे सारे कशासाठी? तर विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी. त्या बापुडय़ा पाल्याचा मेंदू शिणला तरी हरकत नाही, पण त्याने अमुक महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी तमुक टक्के गुण मिळवायलाच हवेत, असा हा हट्ट असतो. त्याची तयारीही नववीपासूनच होते. त्या वर्षी महत्त्वाच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश किती गुणांना बंद झाले, याची ‘कट ऑफ’ आकडेवारी हे पालकांसाठी सर्वात महत्त्वाचे आकडे असतात. त्या कट ऑफपेक्षा जास्त गुण मिळवले, तरच आपली धडगत, अशी त्या पालकांची भावना असते. ती खरीही असते. पण हे सारे केवळ विज्ञानाच्या प्रेमापोटी नव्हे, तर त्यातून मिळणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेपायी होत असते. विज्ञान शाखेत गेलेली किती मुले डॉक्टर किंवा इंजिनीअर होऊ शकतात, याचा अभ्यास जर या पालकांनी केला, तर कदाचित त्यांची झोपही उडेल. पण आपले असे काही करून घ्यायचे नाही, असे त्यांनी मनोमन ठरवलेलेच असते.
मुंबईतील अतिशय प्रतिष्ठेच्या महाविद्यालयांतील अकरावीच्या प्रवेशाची आकडेवारी म्हणूनच गालात हसू आणणारी आहे. काळ बदलतोय की तो नवे फासे टाकतो आहे, असे वाटण्यासारखी ही स्थिती आश्चर्य वाटावी अशीच. सेंट झेवियर्ससारख्या महाविद्यालयात कला शाखेला प्रवेश घेतलेल्या शेवटच्या मुलाचे गुण होते ९७.८० टक्के आणि रुईयातील शेवटच्या मुलाने मिळवले आहेत ९३.५३ टक्के. एवढे गुण मिळवून कला शाखेकडे जाणे ही एके काळची अवदसा या हुशार मुलांना कशी कळत नाही, असा प्रश्न सगळ्यांना पडू शकतो. काहीच जमत नसेल किंवा इतके कमी गुण मिळाले असतील, तर कला शाखेकडे जाण्याचा सल्ला देणाऱ्या शैक्षणिक सल्लागारांचीही बोलती बंद करणारी ही घटना म्हटली पाहिजे. आपली सगळी हुशारी अशी कला शाखेत ‘वाया’ घालवणाऱ्या या विद्यार्थ्यांचे अभिनंदन तर करायलाच हवे, पण त्यांनी हे धाडसी पाऊल का उचलले असेल, याचाही विचार करायला हवा. गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी विद्याशाखेची स्थिती, ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झाली आहे. इंजिनीअर होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रवेश मिळण्याची हमी मिळू लागली. असे सगळ्या इच्छुकांचे प्रवेश झाले, तरीही महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांअभावी ओस पडू लागली. वैद्यकीयची परिस्थिती नेमकी उलटी. तिथे सगळ्यांना प्रवेशच मिळू शकत नाही. अगदी देशात कुठेही जाण्याची मनोमन तयारी केली, तरी त्याची हमी नाही. हवा तिथे प्रवेश मिळवायचाच असेल, तर लाखो किंवा कोटीशिवाय चर्चेला सुरुवातही नाही.
अशा स्थितीत गेल्या काही वर्षांत तरुणांना भुरळ घातली ती स्पर्धा परीक्षांनी. राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांकडे देशातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील विद्यार्थी डोळे लावून बसू लागले. अभ्यास करून उत्तीर्ण झाले, तर थेट अधिकारपदाची शंभर टक्के हमी. दिमतीला मोटार, सरकारी निवास आणि सर्व सवलतींची सुविधा. हे आकर्षण कोटीभर रुपये मोजून डॉक्टर होण्यापेक्षा अधिक सुखकर आहे, यात शंका नाही. पण म्हणून काही लोकसेवा आयोगाची परीक्षा सोपी होऊ शकत नाही. अतिशय कठीण आणि उत्तीर्ण होण्यासाठी अवघड असलेली असेच तिचे वर्णन केले जाते. आकाशाखालील आणि वरीलही सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असलेला अभ्यासक्रम हे लोकसेवा परीक्षांचे वैशिष्टय़. कितीही अभ्यास केला,    तरी यश मिळेलच याची हमी नसणे ही या परीक्षांची खासियत. वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या मानाने कला शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जरासा कमी असतो. त्यांना विद्यापीठीय पदवी परीक्षा देता देताच लोकसेवा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठीही सवड मिळू शकते. हुशार मुलांना कला शाखेचा अभ्यास करता करता लोकसेवा परीक्षांचे शिवधनुष्य पेलणे शक्य होईल, या भरवशावर अनेक गुणी मुले या शाखेकडे वळली, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तो खराही असू शकेल. कला शाखेतून पदवी घेतलेल्यांचे भविष्य अंधकारमय असते या कल्पनेला यामुळे छेद गेला हे नक्की.
कारण काहीही असो, कलांच्या क्षेत्रात हुशार मुलांचे आगमन हीच मुळी साजरी करण्याची घटना आहे. कला शाखेचे महत्त्व कलेकलेने वाढत असून, कष्टसाध्य यशाचे महत्त्व वाढवणारी आणि एका नव्या शैक्षणिक वातावरणाची ही नांदी आहे असेच म्हटले पाहिजे. विज्ञानवादी समाज घडवण्याचा प्रयत्न करीत असतानाच भाषा, सौंदर्य, विचारक्षमता, सामाजिक भान यांसारखे विषय माणसाच्या जगण्याचा केवढा तरी भाग व्यापून असतात, याचे भान पुन्हा एकदा येण्याची चिन्हे त्यामुळेच आता दिसू लागली आहेत.