स्त्रियांचे हक्क पुरुषसत्तेच्या जोडीने राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असतात. आज जगभरात अनेक देशांत धार्मिक कट्टरपंथीय राजसत्ता प्रबळ होत आहेत. लोकशाहीची पीछेहाट होते आहे. कष्टकरी आणि स्त्रिया यांचा संघर्ष बिकट होत आहे. आज अफगाण स्त्रियांना जे वास्तव झेलावे लागत आहे ते अतिशय बिकट आणि अस्वस्थ करणारे आहे..

अफगाणिस्तानची ओळख रवींद्रनाथ टागोरांच्या प्रत्ययकारी ‘काबुलीवाला’ कथेतून आपल्यापकी अनेकांच्या लहानपणीच्या आठवणींचा खास भाग असते. त्यानंतरच्या शतकभरात अफगाणिस्तानात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या. परकीय तसेच स्वकियांमधील अनेक टोळ्या यांच्यामधील सततची युद्धे आणि अमली पदार्थाचा अवैध व्यापार यामध्ये अनेक पिढय़ांची तरुणाई होरपळत राहिली. ब्रिटन, अमेरिका आणि रशिया या देशांच्या परराष्ट्र धोरणांचा परिणाम येथील सामान्य जनता झेलत राहिली. ९/११च्या ट्वीन टॉवरवरील हल्ल्यानंतर इस्लाम आणि इस्लामिक जग यांना अमेरिकन सत्तेने आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वीपणे दहशतवादी ही प्रतिमा चिकटविली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकशाहीचे आकुंचन झाल्याने इस्लामिक कट्टरपंथीय प्रबळ होत राहिले. त्या प्रमाणात कष्टकरी आणि स्त्रिया यांची कोंडी वाढत गेली. इस्लामिक जगामधील अन्याय, शोषण, मागासलेपणा, स्त्रियांना मिळणारी अमानुष वागणूक याबद्दल असलेल्या लिखाणाला बाजारपेठ मिळाली. या वातावरणात नादिया हाशिमी या अमेरिकन-अफगाण लेखिकेची ‘द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल’ ही पहिली कादंबरी शतकभराचा पट उभा करीत विघटनाच्या मार्गावर असलेल्या अफगाणिस्तानची कोंडी फोडायची असेल तर काय करायला पाहिजे याचा निर्देश करते. अन्याय, अत्याचार स्त्रिया मुकाट सहन करतात हा सर्वमान्य नियम. पण जगण्याच्या चिवट प्रेरणेतून तो सर्वमान्य नियम तोडण्याचा जिवटपणा सामान्य स्त्रिया दाखवतात त्याचा आलेख कादंबरी परिणामकारकतेने मांडते.
कादंबरीची नायिका रहिमा आपल्या शायिमा या मावशीकडून स्वत:च्या खापर-खापरपणजी शेकीबाची प्रेरणादायी गोष्ट ऐकत मोठी होते. वर्तमानातील रहिमाच्या आयुष्यातील उण्यापुऱ्या १५-१६ वर्षांचा काळ आणि शेकीबाच्या आयुष्याचा १९३० पर्यंतचा काळ कादंबरी एकत्र गुंफते. व्यक्तिगत आयुष्य आणि समाज या दोन्हींत घडणाऱ्या प्रसंगावर टिप्पणी करणारी शायिमा मावशी रहिमा आणि शेकीबाच्या कथेला जोडणारा दुवा आहे.
शेती करणारे शेकीबाचे प्रेमळ कुटुंब १९०३ मधील प्लेगच्या साथीत बळी गेल्याने ती अनाथ होते. शेती करीत तग धरणारी शेकीबा अनेक अत्याचार सहन करीत एका छोटय़ाशा खेडय़ातून काबूल शहरापर्यंत प्रवास करते. ‘एका अनाथ मुलीच्या वाटय़ाला यापेक्षा चांगले काय आले असते,’ असे म्हणत झालेल्या अन्यायाचा स्वीकार करते. एकदा पतीच्या सहकाऱ्याच्या पत्नीबरोबर राजा अमानुल्ला आणि राणी सुरैया यांचे जाहीर भाषण ऐकायला जाते. राणी सुरैया जाहीरपणे बुरखा काढत म्हणते, ‘इस्लाम आणि बुरखा याचा काही संबंध नाही. स्त्रियांना समतेचे हक्क..’ हे शब्द ऐकल्यावर आश्चर्यचकित झालेली शेकीबा सर्व स्त्रियांसाठी एक स्वप्न पाहते. ती मनाशी म्हणते, ‘सुरैया बुद्धिमान आहे. ती म्हणते तसे झाले असते तर माझ्या जमिनीचे कागद फाडले गेले नसते. माझ्या आजीने मला शाळेत घातले असते. मला मुली असत्या तरी त्यांचेही संगोपन प्रेमाने झाले असते. मी अल्लाकडे फारसे काही मागत नाही. अनिष्ट रीतिरिवाजांचे जाच झुगारणाऱ्या मुलींना अल्लाने धर्य द्यावे. त्याही माणुसकीच्या हकदार आहेत.’ साधारण १९३० च्या सुमारास शेकीबाची कहाणी संपते. त्याच सुमारास सुलतान अमानुल्लाचे वर्चस्व प्रस्थापित झालेले असते. स्त्रियांना काही प्रमाणात हक्क मिळालेले असतात.
लढाईवर जाणे हेच उपजीविकेचे साधन असलेले रहिमाचे वडील पाच मुली झाल्याने पत्नीवर नाराज असतात. आजूबाजूच्या समाजावर तालिबानी आपली पकड बळकट करीत असतात. आईचा लळा असणाऱ्या रहिमाचा प्रवास ‘बच्चा पोष’ प्रथेप्रमाणे मुलगा होणे, मावशीच्या मध्यस्थीमुळे सुटलेले शिक्षण काही काळ सुरू होणे, मर्जीविरुद्ध विवाह, मातृत्व ते काबूलच्या पार्लमेंटमध्ये पतीच्या पहिल्या निरक्षर पत्नीला सरकारी कागदपत्रे वाचण्याचे मदतनीसाचे काम करण्यापर्यंत होतो. तालिबानी नियंत्रण ढिले होऊन काही प्रमाणात प्रातिनिधिक सरकार येण्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. त्यामुळे स्त्रियांनाही आरक्षणातून राजसत्तेमध्ये हिस्सा मिळतो. काबूलमध्ये तिला संगणक प्रशिक्षणाची संधी मिळते. तेथील प्रशिक्षकेच्या मदतीने ती अन्यायकारक आयुष्यातून सुटकेचा मार्ग स्वीकारत महिलाश्रमात आश्रयाला जाते.
रहिमा आणि मावशी यांच्यामधील पुढील संवादाला कादंबरीचा गाभा म्हणता येईल :
रहिमा : ‘आपण आपले नशीब बदलू शकतो? आई म्हणाली होती अब्दुल खालिकशी लग्न होणे हे माझे नशीब होते. नशीब बदलणे म्हणजे अल्लाला धोखा देणे आहे.’  
मावशी : ‘रहिमा, तू अनेक अडचणी झेलत आहेस. अल्लावर आपली श्रद्धा आहे. लक्षात ठेव, तुझ्यात शेकीबाचे रक्त वाहते आहे. आपले नशीब बदलण्यासाठी ती धडपडली. माणसाच्या जगण्याच्या ऊर्मीबद्दल काय म्हणतात माहीत आहे का? ती कातळाहून कठीण आणि फुलाच्या पाकळीहून कोमल असते.’
एका शतकाचे अंतर असलेल्या शेकीबा आणि रहिमा यांच्या आयुष्यातील पुरुषसत्तेचे ताण बरेचसे समान आहेत. शेकीबाच्या काळात फटक्यांची शिक्षा करणे, मर्जीचा विचार न करता लहान वयात लग्न होणे, सवती आणि सासुरवास असणे यासारखी िहसा आहे. शतकानंतर रहिमाची मोठी बहीण परवीन पितृसत्तेचे काच सहन न झाल्याने आत्महत्या करते. कादंबरीतील अनेक स्त्रिया आपले ‘नशीब’ म्हणत सर्व प्रकारचे अन्याय मुकाट स्वीकारताना दिसतात. जनानखान्यातील एका स्त्रीला आपले प्रेम व्यक्त केल्याच्या गुन्हय़ासाठी दगडाने ठेचून मारले जाते. विवाहात शरीरसंबंधासाठी स्त्रीच्या संमतीचा मुद्दा सर्रास गरलागू राहतो. कादंबरीत एकमेकांशी प्रेमळपणे वागणाऱ्या सवती आहेत. स्त्रियांवर ‘तलाक’ची टांगती तलवार आढळत नाही. स्त्रिया पुरुषसत्तेत आपले स्थान पक्केकरताना इतर स्त्रियांवर सत्ता गाजविताना दिसतात, प्रसंगी िहसा करतात. सहजसुलभ लैंगिक आकर्षणाची भावना स्त्रियांना अनुभवायला येताना दिसत नाही. शेकीबाच्या मनातील अशा भावना निसटत्या रूपात उमटलेल्या आहेत.
कादंबरीची रचना करताना शेकीबाचा अर्धा चेहरा भाजलेला असणे, मावशीला कुबड असल्याने तिचे लग्न न होणे, परवीनसारख्या हळुवार मुलीच्या पायात व्यंग असणे, रहिमाचा मुलगा जहांगीर छोटय़ाशा आजाराने मरणे, शेकीबा आणि रहिमा या दोघींचे पती राजकीय वर्तुळातील असणे, दोघींचा प्रवास छोटय़ा खेडय़ातून काबूलपर्यंत होणे, त्या दोघींना ‘मुलगा’ होणे, त्यांना रहीम आणि शेकीब होण्याचा म्हणजेच पुरुष होण्याचा अनुभव येणे या साऱ्या गोष्टी जाणीवपूर्वक केलेल्या आहेत. रहिमा किंवा शेकीबा अशी शीर्षके असणारी एकूण छोटेखानी ६९ प्रकरणे आहेत. लेखनातील सहजता आणि रचना या दोन्हीमुळे शतकाचे अंतर असणाऱ्या दोघींच्या आयुष्यात वाचकाला एकाच वेळी सहज संचार करता येतो. रहिमामध्ये तयार होणाऱ्या धर्याची सूक्ष्म प्रक्रिया या रचनेमध्ये चपखल पकडली आहे. शेकीबा आपले नशीब काही प्रमाणात स्वीकारते. रहिमा नशीब बदलणारा सुटकेचा मार्ग शोधते. त्यांचा हा प्रवास, त्यातील जीवघेणी वळणे, त्यांची घालमेल, कोंडी, त्यावर त्यांनी केलेली मात, त्यांचे धर्य हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे.
तेराव्या शतकातील प्रसिद्ध पर्शियन कवी रूमीच्या कवितेतील ‘सागराचे पाणी मोत्याला, िशपला तोडण्याची याचना करते’ या ओळीवरून कादंबरीचे शीर्षक सुचले आहे. कादंबरीचे मुखपृष्ठ अत्यंत कलात्मक आहे. आपल्या आधीच्या पिढीतील स्त्रिया अफगाणिस्तानमध्ये उच्चशिक्षित झाल्या. वर्तमानात मात्र अनेक स्त्रियांच्या वाटय़ाला इतके कठीण वास्तव का यावे, या विचाराने लेखिका अस्वस्थ आहे. तसेच तिच्या वाटय़ाला प्रेमळ संगोपन आणि सुस्थिती आली आहे याची उतराई होणेही तिला गरजेचे वाटते. लेखिका कादंबरीबद्दल म्हणते, ‘रहिमामध्ये तयार झालेली जगण्याची ऊर्मी असंख्य अफगाण स्त्रियांमध्ये आहे. या देशातील परिस्थिती बदलण्याची तीच एक आशा आहे. म्हणून मला या धर्याची गोष्ट सांगायची होती.’
लेखिकेने शेकीबा आणि रहिमाच्या स्वप्नांची आणि धर्याची गोष्ट नेटकेपणाने सांगितली आहे. आपल्या जमिनीचे कागद मिळवून वकिलाकडे जाण्याचे धर्य शेकीबात कसे आले? कदाचित लहानपणी तिला मिळालेल्या प्रेमातून तिच्यात आत्मसन्मानाची जाणीव पक्की झाली असणार. रहिमाला शेकीबाची गोष्ट सांगणाऱ्या मावशीकडून हिंमत मिळाली असणार.
स्त्रियांचे हक्क पुरुषसत्तेच्या जोडीने राजसत्तेच्या मर्जीवर अवलंबून असतात. आज जगभरात अनेक देशांत धार्मिक कट्टरपंथीय राजसत्ता प्रबळ होत आहेत. लोकशाहीची पीछेहाट होते आहे. कष्टकरी आणि स्त्रिया यांचा संघर्ष बिकट होत आहे. आज अफगाण स्त्रियांना जे वास्तव झेलावे लागत आहे ते अतिशय बिकट आणि अस्वस्थ करणारे आहे. त्यांच्या सुटकेचा मार्ग अंधूकपणेसुद्धा नजरेच्या टप्प्यात दिसत नसल्याने सर्वसामान्य अफगाण स्त्रीने किती काळ वाट पाहायची? महिलाश्रमात दाखल झालेल्या रहिमाचा संघर्ष सुकर राहणार आहे? गुंतागुंतीच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीतून निर्माण झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यातील बिकट समस्यांना हे सोपे उत्तर तर नाही? असे प्रश्न वाचकांच्या मनात तयार करणारी ही कादंबरी महत्त्वाची आहे. सर्वसामान्यांमधील स्वप्ने पाहण्याची आणि धर्याची ऊर्मी जगणे अर्थपूर्ण करीत असते. स्त्रियांच्या जिवटपणाचा धांडोळा घेत सामान्यांच्या धर्याच्या आणि स्वप्नांच्या कथा सांगत राहायला हव्यात. या संदर्भात कवी पाशच्या ओळी आठवतात, ‘स्वप्ने मरून जाणे हे सर्वात धोक्याचे.’

‘द पर्ल दॅट ब्रोक इट्स शेल’
लेखिका – नादिया हाशिमी
पृष्ठ संख्या – ४५२
प्रकाशक – विलियम मोरो
हार्पर कोलिन्सची प्रत २०१४
किंमत – यूएस डॉलर १५.९९
अरुणा बुरटे – aruna.burte@gmail.com